Sakal India Foundation : विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना अर्थसाह्याचे बळ ; ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या परदेशी शिष्यवृत्तीधारकांचा गौरव

शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न प्रत्येकाने उराशी बाळगले असते; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे थोड्या विद्यार्थ्यांनाच हे स्वप्न अनुभवायला मिळते.
Sakal India Foundation
Sakal India Foundationsakal
Updated on

पुणे : शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न प्रत्येकाने उराशी बाळगले असते; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे थोड्या विद्यार्थ्यांनाच हे स्वप्न अनुभवायला मिळते. अशा गुणवंतांच्या पंखांना कर्जाऊ शिष्यवृत्तीच्या माध्यमातून बळ देण्याचे काम ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने केले आहे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा शनिवारी गौरव करण्यात आला.

‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, उपाध्यक्ष पद्मनाभन, विश्‍वस्त प्राचार्य बी. जी. जाधव, विश्‍वस्त मृणाल पवार आणि खजिनदार रमेश बोडके उपस्थित होते. देशभरातील ५० विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांची कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. जाधव म्हणाले, ‘‘शिष्यवृत्तीच्या रकमेपेक्षा तुमची निवड मेरिटवर झाली आहे. ही अभिनंदनीय बाब आहे. आयुष्यात जिद्द, कष्ट आणि कटिबद्धता महत्त्वाची असून यशस्वी होऊन परत या.’’

मृणाल पवार म्हणाल्या, ‘‘तुमच्या जीवन प्रवासातील हा मैलाचा दगड आहे. भरपूर शिका, मित्र बनवा आणि समृद्ध बना. फाउंडेशनच्या संकेतस्थळावर जगभरातील माजी विद्यार्थ्यांची माहिती आहे. त्यांच्याही संपर्कात तुम्ही राहू शकतात. फाउंडेशन म्हणून आम्ही नेहमी मार्गदर्शन करू.’’

५० वर्षांपूर्वी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ची शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या व्ही. एल. केळकर यांनी फाउंडेशनला मोठा निधी दिला आहे. त्याच्या व्याजातूनही त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सरकारी नोकरी किंवा पोलिस पाल्यांना परदेशी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. गायत्री राजनकर यांनी सूत्रसंचालन केले.

पवार यांच्याकडून दीड कोटीची देणगी

प्रतापराव पवार यांनी नुकतीच विविध सामाजिक संस्थांना भरीव देणगी दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीबरोबरच शैक्षणिक मदतीसाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. म्हणूनच आजच्या समारंभाच्या निमित्ताने त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वातून ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला दीड कोटी रुपयांची भरीव देणगी दिली आहे, अशी माहिती खजिनदार रमेश बोडके यांनी दिली.

विद्यार्थ्यांसाठी पद्मनाभन यांचे सल्ले..

  • नवीन संस्कृती आत्मसात करा

  • लोकांमध्ये मिसळा, परदेशी विद्यार्थ्यांशी मैत्री करा

  • वैद्यकीय विमा, सुरक्षा मानके आदींची पूर्तता करा

  • वैयक्तिक माहितीचे जतन करा, गुप्तता पाळा

  • ‘आय सीक इंटरनॅशनल स्टुडंट’ ओळखपत्राची पूर्तता करा

‘‘जागतिक स्तरावर ‘चीन’ला समर्थ पर्याय म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. त्यामुळे परदेशात तुमचे स्वागत होईल. प्रामाणिक आणि मेहनती म्हणून भारतीयांची परदेशात ओळख असून, तुमच्या प्रयत्नांतून अधिक उजाळा द्या. परदेशातील शिक्षणातून समृद्ध व्हा आणि सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून परत या, भारताच्या विकासात भागीदार बना.’’

- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ इंडिया फाउंडेशन

‘‘जीवनाची दिशा बदलणारा क्षण आहे. परदेशी शिक्षणाला जाण्याचे धारिष्ट्य आम्ही करत असून, या शिष्यवृत्तीमुळे आत्मविश्‍वास मिळाला आहे.’’

- स्वराली देगावकर, नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी बॉस्टन, अमेरिका

‘‘शाळेत असताना मी ‘सकाळ’चा एनआयई पेपर वाचत असे. त्यामुळे ही शिष्यवृत्ती माझ्यासाठी भावनिक आहे.’’

- सिद्धार्थ घैसास, डेट्रॉईट, अमेरिका

‘‘परदेशातील मित्रांनीच मला या शिष्यवृत्तीबद्दल सांगितले. केंब्रिजसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठात शिक्षणासाठी मोठा निधी लागतो. मी माझे सामाजिक दायित्व नक्कीच पार पाडेन.’’

- निकिता भाकरे, केंब्रिज विद्यापीठ, ब्रिटन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.