Marathi Bhasha Din: कशी निर्माण झाली मराठी भाषा? जाणून घ्या हजार वर्षांचा इतिहास

कशी निर्माण झाली मराठी भाषा? जाणून घ्या
Marathi Bhasha Din: कशी निर्माण झाली मराठी भाषा? जाणून घ्या हजार वर्षांचा इतिहास
Updated on

27 फेब्रवारी हा दिवस जगभरात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा ही महाराष्ट्रासह अनेक देशांमध्ये बोलली जाते. जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. मराठी साहित्याची मोठी व्याप्ती आहे. अनेक दिग्गज कवी, लेखक यांनी मराठी भाषेमध्ये उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती केली आहे.

मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांचा कायम प्रयत्न राहिला, म्हणून त्यांच्या जन्मदिनी आपण मराठी दिन साजरा करतो. या दिवसी राज्य सरकार, विविध संस्था, राजकीय पक्षांकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतं.

इतिहास-

भाषेचा इतिहास म्हणजे काळाच्या ओघात भाषेत घडून आलेल्या परिवर्तनाची पद्धतशीर मांडणी. यातील काही परिवर्तने स्वाभाविकपणे घडून येतात, तर काही सामाजिक परिस्थितीमुळे. ही परिस्थिती समाजातील अंतर्गत घटनांमुळे किंवा घडामोडींमुळे निर्माण होईल किंवा बाह्य संपर्कही तिच्या मुळाशी असू शकेल. मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे, म्हणजे ते संस्कृतचे काळाच्या ओघात विशिष्ट दिशेने परिवर्तित झालेले रूप आहे.

मूळ संस्कृत भाषा वायव्य भारतातून पूर्वेकडे व खाली दक्षिणेकडे पसरत गेली. एखादी भाषा पसरणे म्हणजे तिच्या भाषिकांनी नवनव्या प्रदेशांवर आक्रमण करणे वा इतर भाषिकांनी आपली मूळ भाषा टाकून तिचा स्वीकार करणे. संस्कृतच्या बाबतीत या दोनही गोष्टी घडल्या आहेत; एवढेच नव्हे, तर ज्या इतर भाषिकांनी तिचा स्वीकार केला, त्यांचे प्रमाण मूळ भाषिकांच्या कितीतरी पटीने जास्त आहे.

आज मराठी बोलणाऱ्या लोकांत मूळ आर्यवंशीय लोकांचे वंशज जवळजवळ नाहीतच असे म्हणता येते. उत्तरेकडील डोंगराळ भागात ऑस्ट्रिक, तर पूर्व व दक्षिण भागात द्रविड निम्नस्तराचा तिच्यावर बराच परिणाम झाला असावा. ऐतिहासिक काळात राजकीय वर्चस्वामुळे सुरुवातीला मुसलमानी सत्तेखाली तुर्की, अरबी व फार्सी, तर पुढे पोर्तुगीज व इंग्रजी यांचा फार प्रभाव पडला.

इंग्रजीच्या प्रभावाची आगेकूच अजून चालू आहे. ती फार्सीप्रमाणे केवळ राज्यकर्त्यांची भाषा नसून जागतिक महत्त्वाची सांस्कृतिक प्रतिष्ठा असलेली ज्ञानभाषाही आहे. मराठीने तिच्यातून शेकडो शब्द, वाक्यप्रयोग, विचार तर घेतले आहेतच; पण शिवाय ॲ व ऑ हे स्वरही उचलले आहेत. या प्रभावाचा कालखंड अजून संपलेला नाही. हा प्रभाव इतका खोलवर गेलेला आहे, की कोणताही सुशिक्षित किंवा अल्पशिक्षित माणूसही आवश्यक नसतानाही इंग्रजी शब्द, इंग्रजी वाक्याचे तुकडे, मराठी व्याकरणाप्रमाणे चालणारी इंग्रजी नामे, कर– किंवा हो– यांचे शेपूट लावून चालवलेली इंग्रजी क्रियापदे, तसेच इंग्रजी विशेषणे इत्यादींचा वापर केल्याशिवाय बोलूच शकत नाही.

महत्त्वाचे टप्पे : इतर आर्यभाषांप्रमाणेच मराठीच्या वेगळेपणाची जाणीव इ. स. १००० च्या आसपास होऊ लागते. यासंबंधीचा पुरावा कोरीव लेखांतून प्रारंभकाळातले स्पष्टपणे मराठी असे

(१) इ. स. १११६-१७ मध्ये कोरलेली श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येतील ही दोन वाक्ये : ‘श्रीचावुण्डराजें करवियलें’. ‘श्रीगंगराजे सुत्ताले करवियले’.

(२) भूलोकमल्ललिखित मानसोल्लास किंवा अमिलषतार्थचिन्तामणि या शके १०५१ (इ. स. ११२९) मधील ग्रंथातले दोन उतारे : ‘जेणें रसातळउणु मत्स्यरूपें वेद आणियले मनुशिवक वाणियले तो संसारसायरतरण मोह (हं) ता रावो नारायणु’. ‘जो गोपिजणे गा (?मा) यिजे बहु परि रूंपे निऱ्हांगो…’

(३) शके ११०८ (इ. स. ११८७) मधील शिलाहार अपरादित्याच्या (द्वितीय) परळ येथे सापडलेल्या लेखातील शापवचन : ‘अथ तु जो कोणु हुवि ए शासन लोपी तेया श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुंटुंबीआ पडें तेहाची माय गाढवें झविजे’.

(४) खानदेशामधील पाटणचा शके ११२९ (इ. स. १२०७) चा शिलालेख. या लेखातील एक वाक्य असे : ‘इयां पाटणीं जें केणें उघटे तेहाचा असि आउ जो राउला होंता ग्राहकापासी तो मढा दीन्हला…’

वरील सर्व उताऱ्यांतील मजकूर मराठीच आहे, याबद्दल शंका नाही, त्यामुळे इ. स. १००० ही ढोबळ मानाने मराठी भाषिक कालखंडाची सुरुवात मानायला हरकत नाही. प्रारंभापासून आजपर्यंतच्या या भाषिक प्रवाहाचे अभ्यासाच्या सोयीसाठी खंड पाडणे इष्ट आहे. त्याचप्रमाणे त्यामागील तत्त्व निश्चित करणेही आवश्यक आहे. सूक्ष्म आणि स्वतंत्र अभ्यासात हे काटेकोरपणे होईल. या ठिकाणी फक्त स्थूल मानाने हे शक्य आहे.

(१) प्राचीन कालखंड : (अ) कोरीव लेखांतून दिसणारे मराठीचे पूर्वप्राचीन रूप. (ब) यादवकाळात मुसलमानी सत्ता पसरू लागतानाचे महानुभाव, ज्ञानेश्वरी आणि त्यांना समकालीन असणारे उत्तरप्राचीन रूप.

(२) मध्य कालखंड : (अ) शिवपूर्व काल. मुसलमानी भाषांचा वाढता प्रभाव. (ब) शिवकाल. फार्सी वर्चस्वाची परिसीमा (क) शिवोत्तर काल. ऐतिहासिक कागदपत्रे, बखरी, लोकवाङमयातून जिवंत भाषेचे दर्शन घडविणारा काळ.

(३) अर्वाचीन कालखंड : (अ) अव्वल इंग्रजी. मराठीचा नवा अवतार. व्याकरणे, पाठ्यपुस्तके, शब्दकोश यांचा काळ. (ब) प्रबोधनकाल. साहित्य, वैचारिक वाङमय इ. मधून दिसणारे मराठीचे प्रचलित रूप.

पूर्वप्राचीन काळातील भाषिक पुरावा कोरीव असल्यामुळे थोडी मोडतोड सोडल्यास तो मूळ स्वरूपात आपल्याला मिळतो. त्यामुळे अभ्यासद्दष्टया तो विश्वासाई आहे. उत्तरप्राचीन रूपाचे तसे नाही. त्याची मुळ रचना तेराव्या शतकाच्या उत्तरार्धातली असली, तरी त्या काळातले कागदपत्र आपल्याकडे नाहीत. ज्या काही साहित्याच्या हस्तलिखित प्रती तयार होत ते टिकून राहिले, त्याचे मुळ स्वरूप नकलाकारांच्या हातून कळतनकळत इतके बदलले, की त्यातले मूळचे काय व बदलेले काय याचा अभ्यास करणे, तसेच त्यासाठी एक नवीन चिकित्सापद्धती निर्माण करणे अपरिहार्य झालेले आहे.

अर्थात नुसती अभ्याससामग्री जमवून काही होनार नाही. भाषा शास्त्राची तत्वे, भाषेच्या इतिहासाचीपद्धती आणि या अभ्यासाला उपकारक अशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इ. सर्व प्रकारची माहिती असली, तरच निश्चित स्वरूपाचे निष्कर्ष काढणे शक्य होईल.

कालेलकर, ना. गो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.