हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावल्या. २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. यासाठी अर्ज माघारीनंतर गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेला वादळी प्रचार आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आज शांत झाल्या. राष्ट्रीय, राज्यस्तरीय नेत्यांप्रमाणे स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक अक्षरशः ढवळून काढली.
Sharad Pawar, Prime Minister Narendra Modi, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Prime Minister Narendra Modi, Uddhav Thackerayesakal
Updated on

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावल्या. २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. यासाठी अर्ज माघारीनंतर गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेला वादळी प्रचार आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आज शांत झाल्या. राष्ट्रीय, राज्यस्तरीय नेत्यांप्रमाणे स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक अक्षरशः ढवळून काढली. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसकडून राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, सेलिब्रेटी अशी मोठी फलटणच निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा आज शांत झाला.

जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या-त्या पक्षातील राष्ट्रीय, राज्य पातळीवरील नेत्यांनी सोलापूर शहर-जिल्ह्यात प्रचारसभा घेऊन मैदान गाजविल्याचे पाहायला मिळाले. बहुतेक नेत्यांनी लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी व युवकांना रोजगार अशा राज्य स्तरावरील प्रश्नांनाच प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे विरोधातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य व केंद्र सरकारचे अपयश दाखवताना विद्यमान आमदारांच्या कामगिरीचा पाढाही वाचून दाखविला. मात्र, निवडणुकीच्या एकूण माहोलामध्ये स्थानिक प्रश्‍न दुर्लक्षित झाल्याचे दिसून आहे.

पंतप्रधान मोदींचा ‘हम एक है तो सेफ है’ ही घोषणा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा ‘गद्दारांना आता माफी नाहीच’ हे वक्तव्य राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा मुद्दा ठरला. नेत्यांच्या सभा ज्या उमेदवारांना मिळाल्या, त्यांचा आत्मविश्वास दुणावल्याची स्थिती आहे. तरीपण, आता प्रचार थांबला असून कोणत्या नेत्यांचा प्रभाव कोणत्या मतदारसंघातील उमेदवारांसाठी फायद्याचा ठरणार, याचे उत्तर २३ नोव्हेंबरला समजणार आहे.

‘या’ प्रमुख नेत्यांच्या पार पडल्या सभा

भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशिवाय माजी खासदार सिनेअभिनेते गोविंदा, हैदराबादच्या भाजप नेत्या माधवी लता यांनी सभा घेतल्या.

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, उद्योगमंत्री एम. बी. पाटील, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, इम्रान प्रतापगडी, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री विश्वजीत कदम आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत, ओमराजे निंबाळकर यांच्याही सभा झाल्या. याशिवाय मनसेप्रमुख राज ठाकरे, एमआयएम प्रमुख खासदार असदउद्दीन ओवैसी, वंचित बहुजन आघाडीप्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही त्यांच्या त्यांच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या.

विद्यमान मंत्रिमंडळातील मंत्री त्यांच्या मतदारसंघात

अडीच वर्षे सत्तेत राहिलेल्या राज्याच्या मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत हे तीन मंत्री वगळता अन्य कोणतेही मंत्री विधानसभेच्या प्रचारासाठी सोलापुरात येवू शकले नाहीत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही येता आले नाही. तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवारांनी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनाही आणण्याचा प्रयत्न केला, पण ते येवू शकले नाहीत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही येता आले नाही. भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही वेळ मागितली होती, पण त्यांनाही येता आले नाही. दरम्यान, सोलापुरात सभांसाठी आलेल्या बहुतेक नेत्यांना वेळेअभावी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात प्रचार करता आला नाही. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी सर्व उमेदवारांना एकाच व्यासपीठावर बोलावल्याचेही पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.