अवैध दारू वाहतूक, निर्मिती नकोच! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘एक्साईज’चे ३ चेक पोस्ट; ढाबे, हॉटेलवरही होणार कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून अवैधरीत्या सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या दारूवर वॉच ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन तपासणी नाके तयार करण्याचे ठरविले आहे. नांदणी येथील चेक पोस्ट सोडून मरवडे (ता. मंगळवेढा) व वाघदरी (ता. अक्कलकोट) याठिकाणी अतिरिक्त दोन नाके उभारले जाणार आहेत.
दारू
दारूsakal
Updated on

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून विशेषतः गोव्यातून अवैधरीत्या सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या दारूवर वॉच ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन तपासणी नाके (चेक पोस्ट) तयार करण्याचे ठरविले आहे. नांदणी येथील चेक पोस्ट सोडून मरवडे (ता. मंगळवेढा) व वाघदरी (ता. अक्कलकोट) याठिकाणी अतिरिक्त दोन नाके उभारले जाणार आहेत. निवडणुकीवेळी होणारा अवैध दारूचा सुळसुळाट थांबविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आतापासूनच कामाला लागला आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक गावातील अवैध दारू विक्री व निर्मिती बंद व्हावी, यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांमार्फत ‘ऑपरेशन परिवर्तन’ राबविले जात आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ‘हातभट्टीमुक्त गाव’ हे अभियान राबविले जात आहे. अवैध दारू विक्री व निर्मितीवर कारवाईचा पहिला अधिकार राज्य उत्पादन शुल्क विभागालाच असल्याचे पोलिसांचे म्हणणे असते.

विशेष बाब म्हणजे दोन्ही विभागाकडून कारवाई सुरु असतानाही बहुतेक गावांमध्ये हातभट्टी तथा दारूविक्री सुरूच असल्याची वस्तुस्थिती आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी तयार होणारी हातभट्टी व परराज्यातून वाहतूक होणारी अवैध दारू, यावर विभागाचे विशेष लक्ष असणार आहे. त्यासाठी पंढरपूर, अकलूज, करमाळा व सोलापूर या चार विभागाचे प्रत्येकी एक पथक व दोन भरारी पथके निवडणुकीच्या काळात रात्रंदिवस कारवाया करतील, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.

नागरिक कधीही या क्रमांकावर तक्रार करू शकतात

एखाद्या गावात अवैधरीत्या दारूची विक्री किंवा एखाद्या ठिकाणाहून अवैध पद्धतीने दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच नागरिक देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे थेट तक्रार करू शकतात. त्यासाठी १८००२३३९९९९ हा टोल फ्री क्रमांक किंवा ८४२२००११३३ या व्हाट्‌सॲप क्रमांक देण्यात आले आहेत.

निवडणुकीवेळी जिल्ह्याच्या सीमेवरच नाकाबंदी

लोकसभेची आचारसंहिता आता काही दिवसात जाहीर होईल. निवडणूक काळात जिल्ह्यातील हॉटेल, ढाबे, अवैध दारू विक्री व निर्मिती करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सातत्याने छापेमारी केली जाणार असल्याचेही अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात २४ तास नाकेबंदी असेल, परराज्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी त्याठिकाणी होईल. दरम्यान, मद्यपान करणाऱ्यांना कोठेही बसून मद्यपान करता येणार नाही, मद्यपानासाठी त्यांच्याकडे परवाना नसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.