शेतीच्या मोजणीसाठी वाढले अर्ज! शेजारच्याला मोजणी मान्य नसल्यास शेतकऱ्याला करता येईल निमताना- सुपर निमताना मोजणी; उपअधीक्षक, अधीक्षक येतात शेतात

सध्या जमीन, जागांचे दर गगनाला भिडले असून त्यातून सख्खे भाऊ पक्के वैरी होत असून सख्खे शेजारचेही आता एकमेकांचे तोंड पाहत नसल्याची स्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यात दरमहा सरासरी ५५० शेतकरी जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करीत आहेत. जागांच्या मोजणीसाठीही अर्ज वाढले आहेत.
farm
farmई सकाळ
Updated on

सोलापूर : सध्या जमीन, जागांचे दर गगनाला भिडले असून त्याच कारणातून आता सख्खे भाऊ पक्के वैरी होत असून सख्खे शेजारचेही आता एकमेकांचे तोंड पाहत नसल्याची स्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यात दरमहा सरासरी ५५० शेतकरी जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करीत आहेत. जागांच्या मोजणीसाठीही अर्ज वाढले आहेत. मात्र, मोजणीवेळी शेजारचा हद्द, खुणा निश्चित करताना विरोध करतो. त्यावेळी संबंधित शेतकऱ्यास निमताना, सुपर निमताना मोजणीचा उत्तम पर्याय भूमिअभिलेख कार्यालयाने उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यात जमिनीच्या मोजणीसाठी ५० रोव्हर मशीन आहेत. तातडीची मोजणी चार महिन्यांत, अतितातडीची मोजणी दोन महिन्यांत आणि साधी मोजणी सहा महिन्यांत होणे अपेक्षित आहे. याशिवाय अतिअतिताडीची मोजणी १५ दिवसांत केली जाते. रोव्हर मशीनद्वारे मोजणीसाठी लागणाऱ्या वेळेत बचत झाली, पण त्या क्षेत्राच्या खुणा व हद्दी कायम करण्यासाठी लागणाऱ्या कामास आजही तेवढाच वेळ लागतो ही वस्तुस्थिती आहे.

मागील आठ महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील सहा हजार ५५६ शेतकऱ्यांनी मोजणीसाठी भूमिअभिलेख कार्यालयांकडे अर्ज केले. त्यातील तीन हजार १३९ शेतकऱ्यांची मोजणी अजूनही शिल्लक आहे. मोजणीनंतर त्या क्षेत्राचे रकॉर्ड तयार करणे, क्षेत्र कोणत्या दिशेने दिसेला सरकते, सध्याच्या वहिवाटीचे क्षेत्र, या बाबींचा विचार करून हद्द-खुणा निश्चित केल्या जातात. त्यासाठी मनुष्यबळ कमी असल्याने तातडी, अतितातडीची मोजणीस विलंब लागतो. दरम्यान, जागा, जमिनीच्या वादाच्या सर्वाधिक तक्रारी तथा गुन्हे पोलिसांत दाखल होत असल्याचीही स्थिती आहे.

मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करणे जरूरी

रोव्हर मशीनद्वारे मोजणीचा कालावधी कमी झाला, पण त्यानंतर संबंधित क्षेत्राचे रेकॉर्ड बनविणे, हद्द-खुणा कायम करण्यासाठी तेवढाच वेळ लागतो. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये मोजणीसाठी विलंब होतो, तरीदेखील तातडी, अतितातडी, अतिअतितातडीची मोजणी वेळेत पूर्ण केली जाते. ज्यांना त्यांच्या क्षेत्राची मोजणी करायची आहे, त्यांना आता ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ऑफलाइन अर्जाची पद्धत पूर्णत: बंद झाली आहे.

- दादासाहेब घोडके, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख, सोलापूर

निमताना, सुपर निमताना मोजणी म्हणजे काय?

एखाद्या शेतकऱ्याने मोजणीसाठी अर्ज केला, त्याच्या क्षेत्राची मोजणी करताना शेजारील खातेदार त्यास हरकत घेतो आणि मोजणी अमान्य करतो. त्यामुळे भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना मोजणी अर्ध्यावर ठेवून यावे लागते. अशावेळी संबंधित शेतकऱ्याला निमताना मोजणी करून घेता येते. पण, त्यासाठी पहिल्या मोजणीच्या तीनपट शुल्क भरावे लागते. त्या मोजणीवेळी तालुक्याचे भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक जागेवर येतात. याशिवाय सुपर निमताना मोजणीसाठी पाचपट शुल्क भरल्यास जिल्ह्याचे अधीक्षक त्या क्षेत्राच्या मोजणीसाठी तेथे जातात. त्यावेळी त्या क्षेत्राची मोजणी करून हद्द-खुणा कायम करून देतात.

मोजणीसाठी हेक्टरी दोन हजार रुपयांचे शुल्क

जमिनीच्या मोजणीसाठी हेक्टरी दोन हजार रुपयांचे शुल्क भरावे लागते. तर दोन हेक्टरसाठी तीन हजार रुपयांचा दर आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन असल्याने ते शुल्क ऑनलाइन भरावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.