''पप्पा मला घरी यायचंय''; युक्रेनमधील विद्यार्थांची आर्त हाक

युक्रेनमधील खारकीव्हच्या वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर बघितले तर सगळी युद्धाचीच परिस्थिती दिसतेय.
India Stuent In Ukraine
India Stuent In Ukrainesakal
Updated on

पुणे : ‘‘युक्रेनमधील खारकीव्हच्या वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर बघितले तर सगळी युद्धाचीच परिस्थिती दिसतेय. पप्पा, खुप भिती वाटतेय. इथे युद्धामुळे सगळे काही बंद आहे. आमच्याजवळ फक्त चार-पाच दिवस पुरेल, एवढेच अन्न शिल्लक आहे. पुढे काय होईल, माहिती नाही, पण खुप भिती वाटतेय. मला घरी लवकरात लवकर यायचेय,’’आपल्या लाडक्‍या मुलीचे, प्रकर्षाचे हे शब्द कानावर पडताच कणखर बापाचे काळीजचे पाणी झाले, डोळ्यांच्या कडा पाण्याने भरल्या, त्यातही त्यांनी (प्रकर्षाचे वडील) तिला धीर देत, परिस्थितीला संयमाने सामोरे जाण्याचा सल्ला दिला !

मुळची शिरूर येथील प्रकर्षा दुगड सध्या युक्रेनमधील खारकीव्ह नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तिचे वडील कन्हैयालाल दुगड औषध विक्रीचा व्यवसाय करतात. लेकीने डॉक्‍टर होऊन समाजाची सेवा करावी, अशी भावना मनात ठेवून त्यांनी त्यांची मुलगी प्रकर्षाला युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी पाठविले. आपल्या भावना मांडताना दुगड म्हणाले,‘‘शालेय वयातच प्रकर्षाने डॉक्‍टर व्हायचे स्वप्न उराशी बाळगले होते.

म्हणूनच तिला वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन देशातील खारकीव्ह येथे पाठविले. परंतु रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने मुलगी तिथे अडकून पडलीयं. युक्रेन देशातील बऱ्याच ठिकाणांहून विमानाची उड्डाणे बंद करण्यात आल्याने तिच्यासह पुण्यातील दोन मुली आणि सहा मुले वसतिगृहात अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी तातडीने विमान पाठवायला हवे आणि त्याची माहिती तेथील विद्यार्थ्यांपर्यंत पोचणे गरजेचे आहे.’’

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याने पूर्व युरोपात युद्धाची ठिणगी पडली खरी, परंतु त्याची झळ युक्रेन देशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या राज्यातील आणि जिल्ह्यातील विद्यार्थी आणि हे विद्यार्थी मायदेशी परतण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या त्यांच्या पालकांना सोसावी लागत आहे. डॉक्‍टर व्हायचे स्वप्नं उराशी बाळगत युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातून ७७ विद्यार्थी गेले आहेत. युक्रेनमधील विविध विद्यापीठांमध्ये सध्या ते अडकले आहेत. युक्रेनमधील बऱ्याच ठिकाणांहून विमानाची उड्डाणे बंद करण्यात आल्याने हे विद्यार्थी वसतीगृहात अडकून पडले आहेत. आपण लवकरच मायदेशी परतू, या एकमेव आशेवर सध्या ते तिथे राहात आहेत. दरम्यान, हे विद्यार्थी सुखरूप असले, तरीही त्यांच्या पालकांची मात्र काळजीने अक्षरशः झोप उडाली आहे.

बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिर्व्हसिटीमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला असणाऱ्या वरद कोंढरे आणि त्याच्यासह राज्यातील शंभरएक विद्यार्थी या विद्यापीठात अडकले आहेत. वरद याची आई मनीषा कोंढरे म्हणाल्या,‘‘विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाने त्यांचे सामान आवरुन ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु मायदेशी घेऊन येणारे विमान कधी असेल, याबाबत त्यांनी कुठलीच माहिती दिलेली नाही. हे विद्यार्थी स्वत: खूप घाबरले असले तरी आपल्या पालकांचा विचार करून तेच आम्हाला धीर देत आहेत.’’

हडपसर येथील हनुमंत खैरे यांची मुलगी सिद्धी ही युक्रेनमधील ओडिसा नॅशनल विद्यापीठात एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. ते म्हणाले,‘‘युक्रेनमध्ये किव्हसह ओडिसा येथे काल हल्ले झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी प्रचंड घाबरले आहेत. या विद्यापीठात देशातील १२०० विद्यार्थी असल्याचे सिद्धीने सांगितले आहे. हे विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात असले तरीही वसतिगृहातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये अडकले आहेत. भारतीय दूतावासाशी संपर्क साधला जात आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.