महाराष्ट्र सरकारने डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ उपलब्ध करून देण्यास सुरवात केल्यामुळे हे उतारे ऑनलाइन मिळू शकतात.
सोलापूर : वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असते. तो उतारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. मात्र महाराष्ट्र सरकारने डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ उपलब्ध करून देण्यास सुरवात केल्यामुळे हे उतारे ऑनलाइन मिळू शकतात. त्यामुळे आता तुम्हाला 8-अ काढण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता तुम्हाला घरबसल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलवरूनही आपला स्वत:चा डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ काढता येणार असून, तो कसा काढावा याबाबत जाणून घेऊया. (Information on extracting 8-A of online digital literacy)
असा काढा ऑनलाइन डिजिटल 8-अ खाते उतारा
- डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ काढण्यासाठी आधी गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in असे सर्च करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Digitally Signed 7/12 किंवा "डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी इथे क्लिक करा' हा पर्याय दिसेल.
- यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर "Download facility for Digitally Signed 7/12, 8-A and Property card' या नावाचं नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. येथे डिजिटल स्वाक्षरीतला सातबारा, 8-अ आणि प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकता.
- पुढे या पेजवर स्पष्ट शब्दांत सूचना दिली आहे की, डिजिटल स्वाक्षरीत 7/12, 8अ आणि प्रॉपर्टी कार्ड सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल. याचाच अर्थ पीक कर्ज, पीक विमा आणि इतर अनेक शेतीसंबंधीच्या वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी डिजिटल सातबारा उतारा आणि 8-अ खाते उतारा अधिकृतपणे वापरू शकतात.
- आता तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, म्हणजे या अगोदर सातबारा उतारा काढला असेल तर लॉगइन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील इतर सेवांचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही प्रथमच येथे आला असाल तर अगोदर येथे "न्यू यूजर रजिस्ट्रेशन' या पर्यायावर क्लिक करा.
- येथे क्लिक केल्यावर एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल.
- यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती तुमचे नाव, मधले नाव आणि आडनाव भरायचे आहे. त्यानंतर जेंडर (मेल आहे की फिमेल), नॅशनॅलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर द्या.
- त्यानंतर Occupation यामध्ये तुम्ही काय करता ते सांगा, जसे की business, service की other म्हणजेच यापैकी वेगळे काही करता ते भरा.
- यानंतर मेल-आयडी आणि जन्मतारखेचा रकाना भरा.
- वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर पत्त्याविषयी द्या. यामध्ये Flat No (घर क्रमांक), Floor Number (गावाकडे राहात असाल तर ग्राउंड फ्लोअर), Building Name (घरावर काही नाव असेल तर ते टाका.)
- त्यानंतर Pincode टाकायचा आहे. पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचे नाव आपोआप फॉर्मवर येईल.
- त्यापुढे Street Road (गल्लीचे नाव), Location (गावाचे नाव), City Area (तालुक्याचे नाव) टाका.
- ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग आयडी तयार करायचा आहे.
- लॉग-इन आयडी टाकला की त्यानंतर Check availability या पर्यायावर क्लिक करून तो आयडी अगोदरच अस्तित्वात आहे की नाही ते पाहा. तो जर नसेल तर त्यानंतर पासवर्ड टाका. त्यानंतर येथे दिलेल्या चार-पाच सोप्या प्रश्नांपैकी एकाचे उत्तर द्या.
- त्यानंतर Captchaटाईप करायचा आहे. Captcha समोर दिसणारे आकडे पुढच्या रकान्यात जसेच्या तसे लिहा.
- शेवटी सबमिट बटण दाबा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर "रजिस्ट्रेशन कम्प्लिट' असा मेसेज येईल तेव्हा "क्लिक हिअर' या पर्यायावर क्लिक करा. रजिस्ट्रेशन करताना टाकलेले यूजर नेम आणि पासवर्ड वापरून परत लॉग इन करा.
- त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर "Digitally Signed 8-A" हा दुसरा पर्याय तुम्ही पाहू शकता. या पर्यायावर क्लिक केलं की "डिजिटल स्वाक्षरीत 8-अ' असे शीर्षक असलेले पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
- यामध्ये सर्वांत शेवटी सूचना दिलेली आहे की, "Rs.15 will be charged for download of every 8A. This amount will be deducted from available balance' याचा अर्थ प्रत्येक "8-अ'साठी 15 रुपये शुल्क आकारले जाईल आणि ते तुमच्या उपलब्ध बॅलन्समधून कापले जातील.
- आता तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलेले असल्यामुळे आपल्या खात्यात येथे काही बॅलन्स नसते. त्यामुळे सर्वांत आधी खात्यात पैसे जमा करणे गरजेचे असते. ते कसे करायचे तर त्यासाठी खाली असलेल्या "रिचार्ज अकाउंट' या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर 15 रुपये इतकी रक्कम टाकून Pay Now या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे confirm या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंग किंवा भीम ऍप असेल तर त्याद्वारे जमा करू शकता. तसे वेगवेगळे पर्याय येथे दिलेले असतात.
- त्यानंतर डिजिटल 8-अच्या फॉर्मवर परत गेलात तर तिथे तुम्हाला 15 रुपये तुमच्या खात्यात जमा झाल्याचे दिसेल.
- आता डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ मिळवण्यासाठी फॉर्मवर दिलेली माहिती भरा.
- यात जिल्ह्याचे, तालुक्याचे आणि गावाचे नाव निवडायचे आहे. त्यानंतर सर्व्हे किंवा गट नंबर, तुमचे पहिले, मधले किंवा शेवटचे नाव यापैकी काही एक माहिती टाका.
- त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ तुमच्यासमोर ओपन होईल.
- या 8-अ उताऱ्यावर स्पष्ट लिहिलेले असते की, "हा खाते उतारा अभिलेख सातबाराच्या डिजिटल स्वाक्षरीत डेटावरून तयार झाला असल्यामुळे यावर कोणाच्याही सही-शिक्क्याची आवश्यकता नाही.'
- या 8-अ वर तुम्हाला Digitally Signed या पर्यायावर मोठ्या आकारात बरोबरची खूण केलेली दिसेल. याचा अर्थ हा आठ-अ डिजिटल स्वाक्षरीत तयार झाला आहे.
(Information on extracting 8-A of online digital literacy)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.