पवारांच्या नखावरची धूळही उडणार नाही; जितेंद्र आव्हाड यांचा बावनकुळेंना टोला

बावनकुळे यांनी शरद पवार यांचे बारामतीमध्ये विसर्जन करण्याची भाषा केली
Jitendra Awad criticize BJP leader Chandrasekhar Bawankule on sharad pawar statement thane mumbai
Jitendra Awad criticize BJP leader Chandrasekhar Bawankule on sharad pawar statement thane mumbaisakal
Updated on

ठाणे : ‘‘शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत. त्यांच्यावर आरोप केल्याशिवाय राजकारणात किंमत मिळणार नाही, या मानसिकतेतून टीका करण्यात येत आहे. कोणी उद्ध्वस्त तर कोणी विसर्जन करण्याची भाषा करीत आहेत. आम्ही आमच्या भाषेत सांगतो की, कितीही कुळे आली तरी शरद पवार यांच्या नखावरची धूळही उडवू शकणार नाहीत,’’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला.

बावनकुळे यांनी शरद पवार यांचे बारामतीमध्ये विसर्जन करण्याची भाषा केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा आव्हाड यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्राला १९९३ ते ९५ चा काळ आठवत असेल. मुंबईमध्ये गो. रा. खैरनार आणि भाजपचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर बेछूट आरोप केले.

तेव्हा एक लक्षात आले की पवारांवर आरोप केला, की पेपरची हेडलाईन मिळते; तसेच वाहिन्यांवर मुख्य बातमी म्हणून पुढील १२ तासांची सोय होते. त्यानंतर १९९९ ते २०१४ या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर होती. त्यानंतर आताही अडीच वर्षे आम्ही सत्तेत होतो; पण भारताच्या राजकारणात उद्ध्वस्त करू, विसर्जन करू, असे शब्दप्रयोग कधीही आणि कुणीही केलेले नाहीत. कल्याण लोकसभा मतदारसंघातूनच भाजपने ‘मिशन महाराष्ट्र’ सुरू केले आहे, त्याबाबत आव्हाड म्हणाले, प्रत्येक राजकीय पक्ष हा आपले पंख मजबूत करून उडण्याचा आणि वाढण्याचा प्रयत्न करीत असतो. भाजपने तसा प्रयत्न सुरू केला आहे. त्याबद्दल आश्चर्य वाटायला नको.

मारुतीने हसत विचारले...

‘आपणाला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की, एका ८३ वर्षांच्या तरुणाला हे लोक किती घाबरतात! बारामतीचा गड जिंकून दे, असे साकडे बारामतीच्या मारुतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातले. ६० वर्षे प्रत्येक निवडणुकीचा अर्ज शरद पवार याच मारुतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता, हे आता आलेले कोण होते, अशी फिरकी आव्हाड यांनी घेतली.

मतभेदांना शत्रुत्वाचे स्वरूप

नवी मुंबईमध्ये शिंदे आणि गणेश नाईक यांची भेट झाली, याबाबत विचारले असता, कोणी कोणाला भेटावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. भारतीय राजकारणाच्या इतिहासात मतभेद असतात; शत्रुत्व नसते. मात्र गेल्या काही दिवसांत मतभेदांना शत्रुत्वाचे स्वरूप येत आहे. ते अत्यंत धोकादायक आणि गलिच्छ आहे.

भाजपने लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत मिशन बारामती मोहीम हाती घेतली आहे. त्यापूर्वी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात. जिंकण्याचा आत्मविश्वास नसल्यानेच त्या निवडणुका लांबवल्या आहेत. यामुळे भाजपचे बारामती लोकसभेचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही.

- प्रदीप गारटकर, पुणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.