राज्यात निवडणुकांचे वारे वाहु लागले आहे. प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. अशातच प्रचारसभेमध्ये बोलताना अनेकजण आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवारांचा दौरा सुरू आहे. काल शिरूरमध्ये एका सभेत बोलत असताना अजित पवार यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा टीका केली आहे. महायुतीसोबत जाताना त्यांना जो मुद्दा उपस्थित केला होता, त्याचाच पुनरुच्चार अजित पवारांनी केला आहे.
'मी शरद पवारांचा मुलगा असतो तर..',मी चुलत्याच्या घरी जन्मलो ही माझी चूक झाली का? असेही यापूर्वी ते म्हणाले होते. यातून आपल्या हातात पक्ष दिला नाही, हे अजित पवारांना सुचवायचे असल्याचे बोलले जाते. अजित पवारांच्या या आरोपानंतर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडीया एक्सवरती पोस्ट शेअर करत अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "राजराजवाडे कधीच संपले. मात्र, अजूनही काही लोकांच्या डोक्यातून सरंजामशाही काही जात नाही. रक्ताच्या वारसांनीच सिंहासनावर बसले पाहिजे; तो त्यांचाच हक्क आहे, अशीच मानसिकता अजित पवार यांच्या वाक्यातून दिसून येते. तुमच्यापेक्षा ज्येष्ठ, तुमच्यापेक्षा प्रगल्भ नेते २००४ मध्ये आदरणीय शरद पवार यांच्या जवळ होते. त्यामध्ये आर. आर. पाटील, जयंत पाटील, डॉ. पद्मसिंह पाटील, दत्ता मेघे, विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ आदी नेते होते. पण, तुम्ही केवळ रक्ताचे वारसदार आहात, म्हणून तुम्हालाच द्यायला पाहिजे, या भ्रमात तुम्ही का आहात? आणि सरंजामशाहीच्या विरोधातच आदरणीय शरद पवार आहेत. नाही तर त्यांनी उदयनराजेंविरोधात एक साधा माथाडी कामगार शशिकांत शिंदे दिला नसता."
"आता निवडणूक संपली. जेवढ्या शिव्या द्यायच्या होत्या. तेवढ्या शिव्या देऊन झाल्या. जेवढ्या गडबडी निवडणुकीत करायच्या होत्या. तेवढ्या करून झाल्या. आता कशाला शरद पवार... शरद पवार करताय? तुम्हाला जेवढं दिले; तेवढे त्यांच्या सख्या मुलीलाही दिलं नाही. केंद्रात मंत्री केले ते सुर्यकांताताई पाटील आणि आगाथा संगमा यांना! मात्र, सुप्रियाताई यांना केंद्रात असे कोणतेही मोक्याचे पद दिले नाही. कारण, शरद पवारसाहेबांचा संरजामशाहीवर विश्वासच नाही आणि तुमच्या विचारांतून सरंजामशाही जातच नाही."
"शरद पवार हे आमचे दैवत आहेत, पण प्रत्येकाचा काळ असतो. ८० वर्षांच्या पुढे गेल्यावर नव्या लोकांनाही संधी द्यायला हवी. मी आता साठीचा झालो आहे. मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण मी त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी नाही", असं अजित पवार म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.