अपघाताने क्षणात संपविली काजल अन् प्रज्ञाची जिवलग मैत्री! सिमेंट घेऊन निघालेला बल्कर शाळेच्या कमानीवरच उलटला

सोलापूरच्या दिशेने येणारा सिमेंटचा भरगच्च बल्कर अचानक औज येथील बस थांब्यावर उलटला. तत्पूर्वी, जिल्हा परिषद शाळेच्या कमानीला बल्करची धडक बसली आणि त्याठिकाणी असलेल्या प्रज्ञा दोडतले (वय ९) व काजल माशाळे या जिवलग मैत्रिणींची मैत्री कायमचीच संपली.
south solapur accident
south solapur accidentsakal
Updated on

सोलापूर : सोलापूरच्या दिशेने येणारा सिमेंटचा भरगच्च बल्कर अचानक औज येथील बस थांब्यावर उलटला. तत्पूर्वी, जिल्हा परिषद शाळेच्या कमानीला बल्करची धडक बसली आणि त्याठिकाणी असलेल्या प्रज्ञा दोडतले (वय ९) व काजल माशाळे या जिवलग मैत्रिणींची मैत्री कायमचीच संपली. कमान डोक्यात पडल्याने प्रज्ञाने जागीच जीव सोडला तर काजल जखमी झाली, पण ती अपघातात बचावली.

नेहमीप्रमाणे आईला ‘बाय बाय’ करून शाळेला गेलेली प्रज्ञा पुन्हा घरी परतलीच नाही. शाळेत गेल्यावर प्रज्ञा व तिची जिवलग मैत्रीण काजल या दोघी कमानीजवळ थांबल्या होत्या. दोघींमध्ये काही फुटांचाच अंतर होता. अचानक भरधाव वेगाने येणारा सिमेंटचा बल्कर शाळेजवळील वळणातून पुढे येताना चालकाचा ताबा सुटला आणि बल्कर शाळेच्या कमानीला धडकला आणि पुढे जाऊन तो बस थांब्यावर उलटला.

कमानीचा काही भाग प्रज्ञाच्या डोक्यावर पडला आणि त्यात चिमुकली प्रज्ञा क्षणातच होत्याची नव्हती झाली. नेमकं काय झाले, हे काजलला कळलेच नाही, पण काळाने दोघींच्या जिवलग मैत्रीचा डाव अर्ध्यावरच मोडला होता. प्रज्ञाचा मृतदेह पाहून तिच्या आईसह नातेवाइकांनी, ग्रामस्थांनी टाहो फोडला. दुसरीकडे महेश इंगळे हा १६ वर्षीय मुलगा बस थांब्यावर गावी जायचे म्हणून थांबला होता. बस काही आली नाही, पण काळ मात्र आला. गिरजा बनसोडे (वय ५५) या देखील बस थांब्यावर थांबल्या होत्या. पण, त्यांच्या बाबतीत ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’, असे घडले. या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत. चालक देखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

राज्यातील सर्वाधिक अपघाताच्या जिल्ह्यात सोलापूर, तरीपण...

राज्यात दरवर्षी १३ ते १५ हजार जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. मागील दोन वर्षांत अपघाती मृतांची संख्या वाढली आहे. सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, मुंबई, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अपघाताचे प्रमाण जास्त असून सर्वाधिक रस्ते अपघात व अपघाती मृत्यू होणाऱ्या पहिल्या पाचमध्ये सोलापूरचाही समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी जवळपास आठशे जणांचा अपघाती मृत्यू होतो. परंतु, रस्ता सुरक्षा समित्यांच्या बैठकांनंतरही संबंधित यंत्रणांकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, हे दुर्दैवीच.

अंगणवाडी सकाळच्या सत्रात सुटल्याने मोठा अनर्थ

बस स्टॉपला लागूनच एका खोलीत गावातील चिमुकल्यांची अंगणवाडी भरते. अंगणवाडीतील मुले त्याठिकाणीच खेळत असतात. पण, सकाळीच अंगणवाडी सुटल्याने तेथे कोणताही मुलगा नव्हता. तर त्याबाजूलाच जिल्हा परिषदेची शाळा आहे. सिमेंट बल्करच्या धडकेत शाळेची कमान पडली. तेथे थांबलेल्या प्रज्ञाच्या डोक्यात कमान कोसळली आणि तिच्या मैत्रिणीला थोडे खरचटले. पण, प्रज्ञाचा जागीच मृत्यू झाला. तर रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी बहिणीकडून सोलापूरकडे येण्यासाठी त्याठिकाणी बसची वाट बघत थांबलेले तिघे बल्करखाली चिरडले. अपघातात दोघे जखमी झाले आहेत. अंगणवाडी सकाळच्या सत्रात सुटल्याने आणि जिल्हा परिषदेची शाळा जेवायला सुटली नव्हती, नाहीतर मोठा अनर्थ झाला असता असे तेथील नागरिक सांगत होते.

दीड तास लागले बल्कर उचलायला

साधारणतः २० टन माल भरलेला सिमेंटचा बल्कर अंगावर पडल्याने तिघांचा जागीच चिरडून मृत्यू झाला होता. कमानीखालील मुलगी प्रज्ञाचा मृत्यू झाल्याचे समजले, पण बल्करखाली नेमके कितीजण अडकले आहेत, याचा काहीच अंदाज येत नव्हता. त्याखालून रक्त वाहत होते, त्यामुळे पाच-सहाजण असावेत अशी भीती व्यक्त करण्यात आली. वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चार क्रेन बोलावले. तब्बल दीड तास लागले तो बल्कर उचलून बाजूला करायला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.