Kanhoji Angre : छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पठ्ठ्यानं ब्रिटीशांना पळता भुई थोडी करून सोडली!

वयाच्या तेराव्या वर्षापासूनच दर्यावरची नोकरी पत्करून त्यांनी साहसाला सुरुवात केली
Kanhoji Angre
Kanhoji Angreesakal
Updated on

Kanhoji Angre : ब्रिटीशांचे कर्दनकाळ ठरलेले अनेक मराठी मावळे आपल्या शिवशाहीत होऊन गेले आहेत. पण, इंग्रजांचे जगणं मुश्किल करणारे, त्यांच्यावर हल्ले करून त्यांच्या जहाज ताब्यात घेणारे. तसेच ब्रिटिशांवर कर लादणारे एकच पराक्रमी व्यक्ती म्हणजे कान्होजी आंग्रे होय.

सरखेल आणि सरसेनापती ही पदवी मिळवणाऱ्या कान्होजी यांच्या ठायी विलक्षण स्वामिनिष्ठा, सैन्यातील शिस्त, सतत वर्तमानाचा ध्यास आणि युद्धनीतीतील चाणाक्षपणा या गुणांची कमतरता नव्हती. कोकण आरमाराची जबाबदारी ज्या खांद्यावर होती ते कान्होजी आंग्रे यांचा आज स्मृतिदीन. त्या निमित्तानेच आज कान्होजींबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेऊयात.

कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी झाला. मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे घराणे हे एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ-शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले.

कान्होजींचं बालपण सुवर्णदुर्ग किल्ल्यावर गेलं. वयाच्या तेराव्या वर्षापासूनच दर्यावरची नोकरी पत्करून त्यांनी साहसाला सुरुवात केली. आपल्या मनगटातील सामर्थ्य सिद्ध करून तरुण वयात सुवर्णदुर्ग किल्ल्याचा किल्लेदार होण्याचा मान त्यांनी मिळवला.

Kanhoji Angre
Bal Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत परश्या! आर्ची म्हणते..

आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती.

भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठीकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते.

१६८८ मध्ये सुवर्णदुर्गचा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेउन फितुरीने किल्ला सिद्दी कासमकड़े सोपवणार असे कळल्यावर कान्होजींनी सिद्दीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला. सिद्दी कासम ह्या औरंगजेबाच्या सेनापतीस कान्होजींच्या अभ्यासपूर्ण योजनेपुढे आणि जिद्दीपुढे हार पत्करावी लागली.

Kanhoji Angre
Chhatrapati Shivaji Maharaj : खिळ्यांपासून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगड मुघलांच्या ताब्यात पडला आणि छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीला जावे लागले. त्या सुमारास कान्होजींचा पराक्रम कोकणपट्टीवर दिसू लागला. इ.स. १६९४–१७०४ च्या दरम्यान त्यांनी पश्चिम किनारपट्टीतील मुघलांकडे गेलेले मराठ्यांचे सर्व किल्ले परत घेतले; शिवाय कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख ठिकाण केले व त्यांनी ‘आपण कोकणकिनाऱ्याचे राजे‘ अशी घोषणा केली.

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्‍नी महाराणी ताराबाई ह्यांनी कान्होजींस आपल्या पक्षात सामील करून घेऊन त्यांना राजमाचीचा किल्ला व भिवंडी प्रांताचा बंदोबस्त करण्यास दिला आणि सरखेल हा किताब कायम केला.

सातारची छत्रपतींची गादी शाहू महाराजांना मिळाली. नंतर छत्रपती शाहू महाराजांनी कान्होजींवर बहिरोपंत पिंगळे ह्या आपल्या पेशव्यास धाडले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही उलट तेच कान्होजींच्या कैदेत पडले.

तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ व कान्होजी ह्यांचे पूर्वीचे मैत्रीचे संबंध लक्षात घेऊन बाळाजी विश्वनाथ ह्या आपल्या पेशव्यास त्यांच्याविरुद्ध धाडले. बाळाजींनी कान्होजींबरोबर तह करून त्यांना छत्रपती शाहू महाराजांच्या पक्षात सामील करून घेतले.

Kanhoji Angre
Chhatrapati Shivaji Maharaj : मॉरिशसमध्ये १४ फुट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाचे अनावरण

२९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रँसिस्को जोस डी सँपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला.

कान्होजींनी आपल्या कारकिर्दीत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. ४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले.

त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राऊन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. १३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि महिला इंग्रजांना परत करण्यात आली.

या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला, आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला.

Kanhoji Angre
Chhatrapati Shivaji Maharaj : राजाराम महाराजांचा विवाह झाला आणि अवघ्या काही दिवसातच स्वराज्यावर...

२६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चांचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करून ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली.

४ जुलै १७२९ मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये त्यांचा पुतळा उभा आहे. एकेकाळी जिथे एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे. या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरवाप्रीत्यर्थ आय एन एस आंग्रे असे नामकरण केले गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.