हनुमान जन्मस्थानावरून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक संघर्षाचा नवा अध्याय

वाल्मीकी रामायणामध्ये हनुमानांनी आपल्या जन्माबद्दल माता सीतेला वृत्तान्त सांगितला असल्याचा दावा स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी केला आहे.
Hanuman
Hanumanesakal
Updated on

त्र्यंबकेश्‍वर/अंजनेरी : वाल्मीकी रामायणाचा आधार घेत शंकराचार्यांच्या उपस्थितीत किष्किंधा पर्वत हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा कर्नाटकमधील किष्किंधा हनुमान जन्मस्थळ ट्रस्टचे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी केला, तोही ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या तीर्थक्षेत्री त्र्यंबकेश्‍वरमध्ये. त्यामुळे हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून नावारूपाला आलेल्या अंजनेरीमधील ग्रामस्थ, आखाडा परिषद आणि तमाम ब्रह्मवृंद संतप्त झाले आहेत. अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्यासंबंधी स्कंद, ब्रह्म, विष्णुपुराण, नवनाथसार, त्र्यंबकमाहात्म्य, संत एकनाथ महाराजांचे भावार्थ रामायण याचा दाखला देण्यात आला आहे. स्वामी गोविंदानंदांच्या दाव्याला धार्मिक पुराव्याच्या आधारे उत्तर दिले जाईल आणि प्रसंगी याप्रश्‍नी न्यायालयात जाऊन दाद मागण्यात येईल, असा निर्धार साधु-महंत आणि तमाम नागरिकांनी केला आहे. त्यामुळे याप्रश्‍नी स्वामी गोविंदानंदांची सोमवार (ता. ३०)ची नाशिकमधील शोभायात्रा आणि मंगळवारी (ता. ३१) होणारी धर्मसभा याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Hanuman
"आम्ही इशारा दिला होता"; गायक मुसेवालाच्या हत्येवरुन भाजपचं 'आप'वर टीकास्त्र

स्वामी गोविंदानंद यांच्या दाव्यानंतर रविवारी (ता. २९) सकाळी अंजनेरी येथील अंजनीमाता आणि बालहनुमान मंदिरात महंत अशोकबाबा, बेझे येथील श्रीराम शक्तिपीठ संस्थानचे पीठाधीश्‍वर स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक झाली. त्यासाठी श्रीनाथनंद सरस्वती, सिद्धेश्‍वरानंद सरस्वती, सुदर्शनानंद सरस्वती, रामानंद सरस्वती, विश्‍वेश्‍वरानंद सरस्वती, शिवानंद सरस्वती, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कमळू कडाळी, माजी उपसरपंच गणेश चव्हाण, पोलिसपाटील संजय चव्हाण, रमेश चव्हाण, शंकर चव्हाण, राजू बदादे, वामन गवळी आदी उपस्थित होते.

‘श्रद्धेशिवाय साधना होऊ शकत नाही,’ असे सांगत सिंहस्थ कुंभमेळा भरतो, माता सीतेचे हरण, गौतमी ऋषी आणि अंजनीमातेची तपश्‍चर्या असे सारे संदर्भ असताना हनुमानरायांचा जन्म किष्किंधा येथे कसा होऊ शकतो, अशी संतप्त भावना बैठकीत व्यक्त झाली. त्यातून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटकमधील संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे.

न्यायालयात दाद मागण्याचा इशारा

बैठकीनंतर सर्वांनी मंदिरात जाऊन अंजनीमाता आणि हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. हनुमान जन्मस्थळासाठी स्वार्थापोटी दावा केला जात असल्याने स्वामी गोविंदानंद सरस्वती यांचा निषेध करण्यात आला. वेळप्रसंगी पोलिसांमध्ये तक्रार देण्यापासून जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी न्यायालयात जाण्याची वेळ आली, तरीही न्यायालयात दाद मागण्याची तयारी असल्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.
त्याच वेळी संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथ, सावता माळी, चोखा मेळा, गोरा कुंभार या संतांनी आम्हाला शिकवण दिली असल्याने कुणाच्याही म्हणण्यावर आम्ही विश्‍वास ठेवणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. अंजनेरी हे स्थान दुर्लक्षित झाल्याने जन्मस्थळाचे दावे होत असल्याची भावना व्यक्त करत असताना हनुमानाच्या जन्मस्थळाबद्दल शंभर गावांनी ठराव दिल्याची आठवण करून देण्यात आली.

Hanuman
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता कधीच येणार नाही - संजय राऊत


स्पष्ट उल्लेख स्कंदपुराणात

वाल्मीकी रामायणामध्ये हनुमानांनी आपल्या जन्माबद्दल माता सीतेला वृत्तान्त सांगितला असल्याचा दावा स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी केला आहे. त्यावर जुना आखाड्याचे पिनकेश्‍वर गिरी महाराज यांनी वाल्मीकी रामायणामध्ये स्पष्ट उल्लेख नसल्याचे सांगून स्कंदपुराणात स्पष्ट उल्लेख असल्याने अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ आहे, हे सिद्ध करण्याची आम्हाला आवश्‍यकता भासत नाही, तर उलटपक्षी आता स्वामी गोविंदानंद सरस्वती यांना सिद्ध करावे लागेल, असे सांगितले. भोंग्यापाठोपाठ हनुमान चालिसा झाली आणि आता हनुमान जन्मस्थळाचा वाद उकरून काढून महत्त्व वाढवून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. एवढेच नव्हे, तर किष्किंधामध्ये जन्मस्थळाच्या नावाखाली बाराशे कोटींच्या प्रकल्पाविषयी स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी दिलेल्या माहितीकडे ग्रामस्थांनी अंगुलीनिर्देश केला.

अंजनेरी येथील अंजनी माता आणि बाल हनुमानची मूर्ती.
अंजनेरी येथील अंजनी माता आणि बाल हनुमानची मूर्ती.esakal


हे सारे चुकीचे कसे ठरविणार?

स्थानिक रहिवासी राजाराम चव्हाण यांनी किल्ल्यावर आढळणारे पौराणिक अवशेष, काट्या मारुती, सूर्याला गिळायला हनुमंतराय निघाले असताना त्यांचा पाय पडल्याने तयार झालेला तलाव, ऋषीमुख ही तपोभूमी, अंजनीमातेने पुत्रप्राप्तीसाठी केलेली तपश्‍चर्या, नवनाथ ग्रंथातील उल्लेख असे सारे कसे चुकीचे ठरवणार, असे म्हटले.

न्यायालयात दावा करावा

अंजनेरीमधील बैठकीनंतर ग्रामस्थ आणि उपस्थितीत साधू-संत-महंत हे त्र्यंबकेश्‍वरमध्ये पोचले. ज्योतिर्लिंग मंदिरासमोर आखाडा परिषदेचे सचिव महंत उदयगिरी महाराज त्यांच्यासमवेत उपस्थित झाले. याही वेळेत उपस्थित प्रत्येकाने अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा पुनरुच्चार केला. स्वामी गोविंदानंद सरस्वती यांना हनुमान जन्मस्थळाचा दावा करायचा असल्यास तो न्यायालयात करावा, असेही साधु-संत-महंतांनी स्पष्ट केले.

Hanuman
देशात बनावट नोटांची संख्या वाढली, विरोधकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल


सारे काही स्वार्थासाठी चाललंय

शंकराचार्यांनी किष्किंधा हे हनुमान जन्मस्थळ असा निर्णय कसा घेतला, असा प्रश्‍न उपस्थित करून आखाडा परिषदेचे सचिव महंत उदयगिरी महाराज म्हणाले, की चार पीठांपैकी एका पीठाला शंकराचार्य नाहीत. त्यामुळे धर्मसभेला सगळे शंकराचार्य उपस्थित राहणार आहेत का, हा खरा प्रश्‍न आहे. म्हणूनच स्वामी गोविंदानंद सरस्वती यांच्या धर्मसभेला फारसा अर्थ नाही. त्या धर्मसभेला आम्ही महत्त्व देत नाही. उलटपक्षी त्यांचे धर्माविषयीचे ज्ञान तपासावे लागेल. सगळे काही स्वार्थासाठी चालले आहे. गौतम ऋषी, ब्रह्मगिरी, अंजनीमाता तपश्‍चर्या अशा साऱ्या गोष्टी अंजनेरीमधील हनुमान जन्मस्थळाशी निगडित असताना कुणीही काहीही तर्क काढणे व्यर्थ आहे.

स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी नाशिकमध्ये सोमवारी शोभायात्रा काढण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी ते किष्किंधाहून हनुमान रथ घेऊन त्र्यंबकेश्‍वरमध्ये आले आहेत. मंगळवारी (ता. ३१) धर्मसभा घेऊन धर्ममार्तंडांशी चर्चा करण्याची तयारी स्वामींनी दर्शविली आहे. अंजनेरीचे ग्रामस्थ आणि आखाडा परिषदेने घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमधील स्वामींच्या कार्यक्रमाविषयीची उत्सुकता वाढली आहे. अंजनेरीवासीय आणि आखाडा परिषदेच्या साधु-संत-महंतांच्या संतप्त भावनांनंतर स्वामी गोविंदानंद सरस्वती यांची भेट घेण्यासाठी गेल्यावर त्र्यंबकेश्‍वरमध्ये त्यांचा मुक्काम असलेल्या ठिकाणी कुणीही उपस्थित नव्हते. लॅपटॉप, बॅगा अशा साऱ्या वस्तू उघड्यावर ठेवून बाहेर गेले होते. किष्किंधाहून आणलेला हनुमान रथ निवासस्थानाबाहेरील बाजूला दरवाजासमोर उभा करण्यात आलेला होता.


''अंजनीमाता तपोभूमी परिसरात स्वामी गोविंदानंद सरस्वती आले होते. त्या वेळी त्यांनी अंजनीमातेची तपोभूमी अंजनेरी असल्याचे मान्य केले. त्या वेळी त्यांना अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे आपण सांगितले आहे. किष्किंधानगरी, शबरीधाम, सुग्रीव गुफा असे वेगवेगळे संदर्भ अंजनेरी परिसराशी जोडले गेल्याने कर्नाटकमधील किष्किंधा हे हनुमान महाराजांचे जन्मस्थळ नाही, तर अंजनेरी हेच आहे.'' - महंत अशोकबाबा, अंजनीमाता व बालहनुमान मंदिर, अंजनेरी

''इतिहास साक्षी आहे. प्रत्यक्षात घडून गेलेल्या घटना नाकारून चालणार नाही. पंचवटीतील सीतामायेचे हरण, प्रभू रामचंद्र आणि शबरीमातेची भेट, किष्किंधानगरीचा दाखविलेला मार्ग असे विविध संदर्भ अंजनेरीशी जोडले गेले आहेत. त्यामुळे अंजनेरी हे हनुमान जन्मस्थळ असल्याबाबतचा पुरावा देण्याची आम्हाला आवश्‍यकता भासत नाही. न्यायालयात जावे लागले, तरीही आम्ही सिद्ध करू. तेरा आखाड्यांनी हनुमंतांची जन्मभूमी अंजनेरी म्हटले आहे.'' - स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती महाराज, पीठाधीश्‍वर, श्रीराम शक्तिपीठ संस्थान, बेझे

''पुराण आणि ग्रंथांतील अंजनेरी हे हनुमान जन्मस्थळासंबंधीचे संदर्भ आपणाला खोटे ठरवता येत नाहीत. नवनाथ ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील ओवी ७२ ते १०५ मध्ये यासंबंधीचा उल्लेख आहे. त्र्यंबकेश्‍वरजवळ ब्रह्मगिरी आणि त्याच्या शेजारी ऋषीमुख पर्वत म्हणजे आताचा अंजनेरी पर्वत, शंभर कुंडांपैकी सूर्यकुंड असे शंभर दाखले उपलब्ध आहेत. ताम्रपटही उपलब्ध आहे.'' - पिनकेश्‍वर गिरी महाराज, त्र्यंबकेश्‍वर

Hanuman
मास्क्ड आधार म्हणजे नेमकं काय ? ते कसं वापराल

''सरकारी कागदपत्रांमध्ये किष्किंधा नगरी, पंपासरोवर, कुसेगाव यासंबंधीची नोंद आहे. गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्‍चर्या केली. कन्या अंजनीमातेने तपश्‍चर्या केली. एवढे सगळे असताना हनुमंतराय जन्म घ्यायला कर्नाटकमधील किष्किंधा पर्वतावर कशाला जातील? त्यामुळे वेळ आल्यास आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.'' - कमळू कडाळी, माजी सदस्य, जिल्हा परिषद, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.