Kartiki Ekadashi : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात चार लाख भाविक

‘जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा’, या भावनेने कार्तिकी यात्रेच्या आनंद सोहळ्यातील सुख अनुभवण्यासाठी आणि विठुरायाच्या दर्शनाने तृप्त होण्यासाठी सुमारे चार लाखांहून अधिक भाविक येथे दाखल झाले आहेत.
Kartiki Ekadashi
Kartiki Ekadashisakal
Updated on

पंढरपूर - ‘जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा’, या भावनेने कार्तिकी यात्रेच्या आनंद सोहळ्यातील सुख अनुभवण्यासाठी आणि विठुरायाच्या दर्शनाने तृप्त होण्यासाठी सुमारे चार लाखांहून अधिक भाविक येथे दाखल झाले आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज अकरा तास लागत होते. शहरातील सर्व लॉज, मठ, धर्मशाळा वारकऱ्यांच्या गर्दीमुळे हाऊसफुल झाल्या आहेत. तरीही, यंदा यात्रेकरुंच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे जाणवत आहे.

कार्तिकी यात्रेसाठी विविध भागातून निघालेल्या पायी दिंड्या येथे पोचल्या असून जिकडे पहावे तिकडे हाती भगवी पताका, कपाळी गंध आणि मुखी ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत निघालेले वारकरी दिसत आहेत. आलेल्या प्रत्येकाला सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.

वारकऱ्यांच्या गर्दीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरासह प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागेचे वाळवंट आणि नदीच्या पैलतीरावरील 65 एकर परिसर भक्तीमय झाला आहे. परंतु कार्तिकी यात्रेत दरवर्षी एव्हढी गर्दी होते तेव्हढी गर्दी यंदा दिसत नाही. राज्याच्या काही भागातील दुष्काळी परिस्थिती आणि काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान याचा परिणाम यात्रेवर झाला आहे.

या संदर्भात गेल्या वीस वर्षांपासून कार्तिकी यात्रेला येत असलेले रामचंद्र यादव, हरिभाऊ पवार म्हणाले, दरवर्षी आम्ही कार्तिकी यात्रेला येतो. यंदा यात्रेसाठी अधिक चांगले नियोजन दिसत आहे. परंतु दरवर्षीच्या तुलनेत यंदा वारकऱ्यांची संख्या कमी असल्याचे जाणवत आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेल्या हणमंत रामप्पा वडार (रा. हंचीनाल, बसवन बागेवाडी, विजापूर) यांना विचारले असता ते म्हणाले, मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता आठव्या क्रमांकाच्या पत्राशेडमध्ये दर्शन रांगेत उभा राहिलो होतो. तब्बल अकरा तासानंतर आज सकाळी साडेनऊ वाजता विठुरायाचे दर्शन झाले.

चंद्रभागेत पाणी न पोचल्याने गैरसोय

वारकऱ्यांच्या दृष्टीने चंद्रभागा नदी स्नानाला अतिशय महत्त्व आहे. अवघीची तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया तसेच पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे, अशा संतोक्ती आहेत. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनाआधी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी वारकरी आतुरलेले असतात. तथापि गेल्या काही दिवसांपासून चंद्रभागेच्या पात्रात डबक्याप्रमाणे पाणी साचलेले होते.

यात्रेत वारकऱ्यांच्या स्नानाची सोय व्हावी यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. परंतु आज सकाळपर्यंत पंढरपूरपर्यंत पाणी पोचले नव्हते. त्यामुळे कार्तिकी दशमी दिवशी चंद्रभागेत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी आलेल्या लाखो भाविकांना साठलेल्या पाण्यातच स्नान करावे लागत होते.

स्नानासाठी नदीवर आलेले सुरेश सोमा मंचेकर (रा. देवधे ता. लांजा जि.रत्नागिरी) म्हणाले, नदी पात्रात अत्यल्प पाणी असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. नाइलाजास्तव अशा पाण्यातच आम्हाला स्नान करावे लागले.

मठ, धर्मशाळांमधून टाळ मृदंगाचा गरज

चंद्रभागा नदीत स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन वारकरी गडबडीने विठुरायाच्या दर्शन रांगेकडे जात होते. वाळवंट तसेच शहरातील विविध मठ आणि धर्मशाळांमधून टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी तल्लीन झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज संपूर्ण पंढरी जणू भक्तिरसात तल्लीन झाल्याचा अनुभव येत होता. राज्यासह परराज्यातील आबालवृद्धांनी वारीसाठी आज पंढरीत गर्दी केली होती.

बाजारपेठ सज्ज पण तुलनेने उलाढाल कामी

आषाढी आणि कार्तिकी यात्रा काळात चुरमुरे, बत्तासे, पेढे, साखरकांड्या, विविध देवतांचे फोटोफ्रेम, कुंकू, बुक्का यासह प्रासादिक वस्तूंची मोठी उलाढाल होत असते. यात्रेसाठी स्थानिक व्यापाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे गेल्या पंधरा दिवसांपासून जय्यत तयारी केली आहे. तथापि गेल्या चार दिवसात म्हणावा तसा व्यापार झालेला नाही.

धार्मिक ग्रंथाचे विक्रेते कृष्णा कांगे आणि घोंगडीचे व्यापारी राजाभाऊ उराडे म्हणाले, यंदा दिवाळीपासून भाविकांची गर्दी होती. परंतु ऐन कार्तिकी यात्रेत मात्र दरवर्षीच्या तुलनेने पंचवीस टक्के सुद्धा व्यापार झालेला नाही.

अतिक्रमणांविषयी व्यापाऱ्यांची नाराजी

पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाकडून गेल्या दोन दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली जात आहेत. व्यापाऱ्यांनी देखील प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका घेतली. परंतु आज सकाळी स्थानिक व्यापारी दुकानाच्या बाहेर जिथे अतिक्रमण करत होते, त्या जागेवर परगावाहून आलेल्या शेकडो विक्रेत्यांनी रस्त्यांवर दुकाने थाटली होती. आणि अशा विक्रेत्यांना रस्त्यावर बसण्यास मज्जाव न करता त्यांच्याकडून कर वसुली केली जात होती. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.