मोठी बातमी! कागदपत्रे जवळ ठेवा, सोलापूरचे वाहतूक पोलिस करणार 2 सत्रात कारवाई, ऑटोरिक्षांचे खुले परमिटही आता बंद होणार; सोलापूर शहरात 13 हजारांवर रिक्षा

एसटी स्टॅण्ड परिसर, रेल्वे स्थानिक परिसरात रिक्षांची दाटी पाहायला मिळते. शहरातील अन्य कोणकोणत्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी होते अशा रस्त्यांची माहिती संकलित केली जात आहे. १ ऑगस्टपासून त्या रस्त्यांवर दररोज दोन सत्रात कारवाईची विशेष मोहीम राबविली जाणार आहे.
traffic police
traffic policesakal
Updated on

सोलापूर : शहराचा विस्तार, वाढलेली लोकसंख्या, शहरातील रस्ते आणि प्रवाशांची संख्या याच्या तुलनेत ऑटोरिक्षा असायला हव्यात. पण, सध्या सोलापूर शहरात १३ हजारांहून अधिक रिक्षा आहेत. दरवर्षी एक हजारांपर्यंत रिक्षा वाढत आहेत. त्यामुळे बहुतेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी व अन्य वाहनधारकांचा वेळ वाया जाण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आता २०१७ मध्ये खुले झालेले ऑटोरिक्षांचे परमीट बंद होणार आहेत.

नवीन ऑटोरिक्षा घेतल्यानंतर प्रत्येक दोन वर्षांनी फिटनेस तथा योग्यता चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. आठ वर्षांनंतर प्रत्येक वर्षी योग्यता चाचणीचे बंधन आहे. पण, सध्या अनेक अनफिट रिक्षा शहरातून धावत असल्याची वस्तुस्थिती आहे.

दरम्यान, राज्य शासनाने २६ नोव्हेंबर १९९७ रोजी अधिसूचना काढून सोलापूर, नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधील वाढणारी ऑटोरिक्षांची संख्या मर्यादित केली होती. मात्र, २०१७ मध्ये परमीट खुले झाले आणि अमर्याद ऑटोरिक्षा वाढल्या. आता त्यावर पुन्हा निर्बंध घालणे जरुरी असल्याचे प्रस्ताव संबंधित आरटीओ कार्यालयांनी परिवहन आयुक्तालयाकडे पाठविले आहेत. त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून परिवहन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यासाठी हा निर्णय लागू होईल, पण त्या त्या जिल्ह्याचा निर्णय घेण्याचा अधिकार जिल्ह्यातील ‘आरटीई’ समितीला असणार आहे. त्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात.

बेशिस्तांवर आता दररोज दोन सत्रात कारवाई

शहरातील एसटी स्टॅण्ड परिसर, रेल्वे स्थानिक परिसरात रिक्षांची दाटी पाहायला मिळते. शहरातील अन्य कोणकोणत्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी होते अशा रस्त्यांची माहिती संकलित केली जात आहे. १ ऑगस्टपासून त्या रस्त्यांवर दररोज दोन सत्रात (सकाळी व सायंकाळ) मनुष्यबळाची उपलब्धता पाहून कारवाईची विशेष मोहीम राबविली जाणार आहे. त्यात बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

- सुधीर खिराडकर, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर

ऑटोरिक्षांच्या दाटीमुळे प्रवाशांचा वेळ वाया

प्रवासी दिसेल त्याठिकाणी अचानक थांबणे, प्रवाशांसाठी रस्त्यालगतच थांबणे, प्रत्येक रस्त्यांवर एकामागे एक धावणाऱ्या रिक्षांमुळे मागून येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यास अडथळा अशा कारणांमुळे अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी जाणवते. याशिवाय सोलापूर शहरात एन्ट्री केल्यापासून शेवटच्या टोकाला निघेपर्यंत प्रत्येक वाहनधारकाला किमान ५० वेळा तरी ब्रेक लावावाच लागतो, अशी वस्तुस्थिती आहे. सोलापूरसह, पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजी नगर अशा शहरांमधील ही स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा पाच लाख ते त्याहून अधिक लोकसंख्येच्या शहरांमधील वाढत्या रिक्षांवर निर्बंध घातले जाणार आहेत.

शहरातील ऑटोरिक्षांची स्थिती

  • एकूण ऑटोरिक्षा

  • १३,०८९

  • दरमहा वाढणाऱ्या रिक्षा

  • ६५ ते ७०

  • दोन वर्षांतील वाढ

  • १९,००

रिक्षाचे वजन ३५० किलो अन् प्रवाशांचे ओझे ४०० किलो

ऑटोरिक्षांचे ओझे साधारणत: ३५० किलोपर्यंत असते. या रिक्षांना चालक आणि तीन प्रवासी वाहून नेण्यास परवानगी आहे. तरीपण, अनेकजण रिक्षाच्या वजनापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याची वस्तुस्थिती आहे. चालकाशेजारी दोन्ही बाजूला दोन प्रवासी आणि मागे तीन-चार प्रवासी बसलेले असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. प्रवाशांनीही अशा वाहनांमधून प्रवास करताना स्वत:ची सुरक्षितता पाहायला हवी, असे वाहतूक पोलिसांचे मत आहे.

महापालिकेच्या ‘परिवहन’ला रिक्षांचा गराडा

एकेकाळी सोलापूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमात १५० पर्यंत बसगाड्या होत्या. पण, आता २५ गाड्यांवर आलेला परिवहन उपक्रम आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. सकाळी नऊच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध मार्गांवरील प्रवासी नेण्यासाठी तीन-चार बस थांबलेल्या असतात. मात्र, या बसच्या बाजूबाजूला अक्षरश: रिक्षांचाच गराडा पडलेला असतो. त्यामुळे रिकामा सांगाडा घेऊन किंवा एक-दोन प्रवासी घेऊन त्या बसगाड्या रवाना होतात, अशीही वस्तुस्थिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.