rain
rainsakal

कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर जरी कायम असला तरी विदर्भ आणि मराठवड्यात तो काहीसा कमी झाला आहे.
Published on
Summary

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर जरी कायम असला तरी विदर्भ आणि मराठवड्यात तो काहीसा कमी झाला आहे.

पुणे - पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर जरी कायम असला तरी विदर्भ आणि मराठवड्यात तो काहीसा कमी झाला आहे. पुणे, सातारा, रायगड जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पावसाने अक्षरशः धुमशान घातले आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ताम्हिणी येथे २३० मिलिमीटर, तसेच दावडी येथे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मॉन्सून सक्रिय असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा सुरूच आहे. गुरूवार (ता. १५) उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) कायम आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची, तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून, हा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, ठळक कमी दाब क्षेत्राचे केंद्र, सिधी, अंबिकापूर, जमशेदपूर, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. ईशान्य अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, पश्‍चिम बंगाल ते बांगलादेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्र गोव्याच्या किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

गुरूवारी उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा (येलो अलर्ट) अंदाज आहे. तर विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्र

वायव्य मध्य प्रदेशात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्यकडे सरकणारी ही प्रणाली परत मागे फिरून उत्तर प्रदेशकडे जाण्याचे संकेत आहेत. पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर प्रदेशाकडे जाताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

राज्यातील पावसाचा इशारा :

मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) -

पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) -

मुंबई, रत्नागिरी, नंदूरबार, सातारा, कोल्हापूर.

पुण्यात ऑरेंज अलर्ट -

बुधवारी सकाळपासूनच शहर व परिसरात दिवसभर आकाश प्रामुख्याने ढगाळ तर बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी लावली होती. गुरूवारी (ता.१५) शहरात अशी स्थिती कायम राहणार असून, घाटमाथ्यावर मुसळधार ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.