कोल्हापूर : विधान परिषदेनंतर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) व माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik)यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी आमदार पी. एन. पाटील व विनय कोरे ( P.N.Patil, Vinay Kore)यांच्यावर तर शिवसेनेची जबाबदारी खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्याकडे देण्याचा निर्णय आज जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीत झाला.
दरम्यान, अर्जांची छाननी झाल्यानंतर पुन्हा इच्छुकांसह व्यापक बैठक घेऊन अंतिम तोडगा काढण्याचा निर्णयही घेण्यात आला. सोमवारपासून इच्छुक असलेल्यांनी अर्ज भरण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
काल (ता. २६) विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर सायंकाळी जिल्हा बँकेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने केली. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा बँकेत प्राथमिक चर्चेसाठी जिल्ह्यातील भाजप वगळता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक जिल्हा बँकेत झाली. बैठकीला मुश्रीफ यांच्यासह पालकमंत्री सतेज पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, विनय कोरे, संचालक भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदी उपस्थित होते.
जिल्हा बँकेसाठी ५ जानेवारीला मतदान होत आहे. बँकेत राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व असले तरी मुश्रीफ यांच्याकडेच बँकेचे नेतृत्त्व आहे. बँकेचीही निवडणूक महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढण्याचा निर्णय मुश्रीफ यांनी जाहीर केला आहे. काही जागांवर ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त जागा बिनविरोध कशा होतील यासाठी चर्चा झाली.
बँकेचीही निवडणूक महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढण्याचा निर्णय मुश्रीफ यांनी जाहीर केला आहे.
माजी आमदार महादेवराव महाडिक हातकणंगले तालुक्यातून विकास संस्था गटात स्वतः संचालक आहेत तर आमदार आवाडे यांचे कार्यकर्ते म्हणून विलास गाताडे आहेत. शिवसेनेचे प्रा. मंडलिक व माजी खासदार निवेदिता माने असे दोन संचालक आहेत. भाजपचे अनिल पाटील पतसंस्था गटातून संचालक आहेत. आमदार प्रकाश आबिटकर यांनीही किमान एक जागा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तर कोरे यांनी प्रक्रिया संस्था गटातील आसुर्लेकर-पाटील यांच्या नावांला विरोध करून प्रदीप पाटील-भुयेकर यांना उमेदवारीची मागणी केली आहे.
सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीनंतर बँकेच्या राजकारणाशी संबंधित महाडिक-आवाडे यांची जबाबदारी पी. एन. व श्री. कोरे यांना तर शिवसेनेची जबाबदारी प्रा. मंडलिक यांच्यावर सोपवून उर्वरित निर्णय छाननीनंतर घेण्याचे ठरले.
गुरुवारी होणार बैठक
आजच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे महादेवराव महाडिक व प्रकाश आवाडे यांच्याशी गुरुवारी (ता. २) पी. एन. व श्री. कोरे चर्चा करणार आहेत. पी. एन. यांच्याकडून सोमवारीच अर्ज भरला जाणार आहे. त्यानंतर ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुलीच्या विवाहासाठी मुंबईला जाणार आहेत. मंगळवारी हा विवाह आहे. बुधवारी ते परत येतील. गुरुवारी सकाळी चौघांची बैठक होणार आहे.
आमदार लंके जिल्हा बँकेत
साधी राहणी आणि कोविड काळात जंबो कोविड सेंटर उभारून राज्यभर प्रसिद्धीला आलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी सायंकाळी शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हा बँकेत हजेरी लावली. विधान परिषदेवर पालकमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ते बँकेत आले होते. त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यामुळे बँकेत जत्रेचे स्वरूप आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.