कृष्णाकाठी भोसले गटच ठरला बाहुबली!

कृष्णाकाठी भोसले गटच ठरला बाहुबली!
Updated on

इस्लामपूर (सांगली) : संपूर्ण राज्यातील साखर कारखानदारीचे लक्ष वेधून घेतलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात (Yashwantrao Mohite Krishna Cooperative Sugar Factory) डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने विरोधी संस्थापक व रयत पॅनेलचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत सत्ता कायम राखली. आजवरच्या ‘कृष्णा’च्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय असून, या निवडणुकीचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चांगलाच प्रभाव जाणवेल. या मोठ्या विजयाने भोसले गट कऱ्हाड तालुक्याच्या राजकारणात बाहुबलीच्या भूमिकेत गेला आहे, तर मोठा गाजावाजा करून निवडणुकीला सामोरे गेलेल्या संस्थापकचे अविनाश मोहिते, उदयसिंह पाटील-उंडाळकर, रयतचे डॉ. इंद्रजित मोहिते व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

कारखान्याचा स्वच्छ कारभार, उसाला चांगला दर, कोरोना काळात कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सुमारे १५ हजार लोकांच्यावर मोफत उपचार, भोसले गटाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात केलेले अपार कष्ट, डॉ. सुरेश भोसले यांची शांत व संयमी भूमिका या सर्वांचा जुळून आलेला एकत्रित संगम कृष्णा कारखाना निवडणुकीत सहकार पॅनेलला भरघोस मतांनी विजयी करून गेला. ही निवडणूक कऱ्हाड तालुक्याच्या राजकीय पटलावरील येणाऱ्या निवडणुकांत भोसले गटाची ताकद वाढवणारी ठरली आहे. विरोधकांनी केलेल्या टोकाच्या आरोपांना संयमाने उत्तर देत डॉ. सुरेश भोसले यांनी आपला तोल ढळू दिला नाही. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य मानावे लागेल.

कऱ्हाड तालुक्यात भोसले गटाची गेल्या काही वर्षांपासून वाढणारी ताकद कमी करण्यासाठी विरोधकांनी काही झाले तरी कृष्णा कारखाना भोसले गटाच्या ताब्यातून काढून घ्यायचा असा चंग बांधला होता. मात्र, सभासदांनी भोसले गटाच्या कारभाराला पसंती देत विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली. या निवडणुकीत भोसलेंना रोखण्यासाठी कऱ्हाड तालुक्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम व ॲड. उदयसिंह पाटील - उंडाळकर या काँग्रेसच्या नेत्यांनी गोकूळ दूध संघाच्या धर्तीवर भोसले विरोधकांना एकत्र आणत आघाडी स्थापन करण्याचे प्रारंभी प्रयत्न केले. मात्र, या घडामोडीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे नेते प्रारंभीपासूनच दोन हात लांब राहिले. त्यांनी राष्ट्रवादी म्हणून कोणतीही हालचाल केली नाही किंवा त्यांना या घडामोडीत कुठेही बेरजेत न घेतल्याचे दिसून आले.

अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या अर्ज भरण्याच्या अगोदर एक महिना चर्चेसाठी बैठकावर बैठका झाल्या. मात्र, त्याला अध्यक्षपद व कोणाचे किती संचालक या वाटाघाटीवरून मूर्त स्वरूप आले नाही. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था झाली. भोसलेंनी याचा नेमका फायदा उठवत वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांच्या पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांना आपल्या पॅनेलमध्ये संधी दिली. याबरोबरच काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील व महाडिक गटाच्या इंदुमती जाखले यांनाही सहकार पॅनेलमध्ये समाविष्ट केले. त्यामुळे वाळवा तालुक्यात पक्षीय राजकारण गळून पडले. या उलट विधानसभेनंतर एकत्र आलेल्या पृथ्वीराज चव्हाण व उंडाळकर गटात संस्थापक, की रयत पॅनेल यावरून उभी दरी पडली.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या काही समर्थकांनी डॉ. इंद्रजित मोहिते यांची, तर काहींनी अविनाश मोहिते यांची पाठराखण केली. नेहमीच सोईस्कर भूमिका घेणाऱ्या उंडाळकर गटाने अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलला पाठिंबा दिला. व्यासपीठावर उंडाळकर संस्थापक पॅनेलकडे दिसून आले, मात्र त्यांच्या समर्थकांनी अविनाश मोहितेंना मदत केल्याचे दिसले नाही, तर पृथ्वीराज चव्हाणांनी या निवडणूक प्रक्रियेपासून स्वतःला दूर ठेवले. कऱ्हाड तालुक्यात गाववार पॅनेलनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली असता उंडाळकर व पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थकांनी सहकार पॅनेललाच जास्त मदत केल्याचे दिसून येते. याबरोबर इंद्रजित मोहिते यांच्या पतसंस्थेचा व उंडाळकरांचा रयत कारखाना अथणी शुगरला चालवायला दिलेला मुद्दा सहकार पॅनेलच्या पथ्यावर पडला. भोसलेंच्या सर्व संस्था सक्षमपणे सुरू असल्याने सभासदांनी भोसलेंना पसंती दिली.

काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम यांनी स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पडत्या काळात यशवंतराव मोहिते यांनी केलेली साथ आजही न विसरता रयत पॅनेलची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेत डॉ. इंद्रजित मोहितेंचे समर्थन केले. मात्र, वाळवा व कऱ्हाड तालुक्यांत त्यांचा असलेला तोकडा संपर्क इंद्रजित मोहिते यांना तारू शकला नाही. एकूणच सहकारी साखर कारखानदारीत कारखाना कसा चालला, दर कसा दिला, भविष्यातील कारखान्याची गरज ओळखून सभासदांनी नेत्यांच्या बेडुकउड्यांना साफ नाकारत सहकार पॅनेलला अगदी विश्वासाने भरघोस मतांनी निवडून देत इतिहास रचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.