सोलापूर : येथील शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात रविवारी मध्यरात्री राज मेमोरीयल शाळेसमोरील गोकुळ नगरातील एका अंधाऱ्या खोलीत पाकिटात पैसे वाटप सुरु होते. याची खबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांच्या कार्यकर्त्यांना मिळाली आणि त्यांनी लगचेच त्याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी काही पाकिटे व त्यात ५०० रुपयांच्या नोटा घातलेल्या आढळल्या. उपस्थितांनी व्हिडिओ तयार केला आणि गोंधळ निर्माण होत असतानाच एमआयडीसी पोलिस त्याठिकाणी दाखल झाले. घटनास्थळावरून ८० हजार रुपयांची रोकड सापडली असून पोलिसांनी या प्रकरणी वकिली व्यवसाय करणाऱ्या रोहन सुनील सोमा (रा. योगेश्वर नगर, जुने विडी घरकूल) याच्यसविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी महापौर महेश कोठे व भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात लढत आहे. यावेळी भाजपच्याच माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पक्षाचा राजीनामा देऊन उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस पहायला मिळत आहे. या मतदारसंघात चार टर्म आमदार राहिलेले विद्यमान आमदार विजयी होणार की यापूर्वीच्या पराभवाचा वचपा कोठे काढणार, याची उत्सुकता आहे. दरम्यान, प्रचाराची सांगता आज (सोमवारी) सायंकाळी सहा वाजता संपणार असून तत्पूर्वी, या मतदारसंघात पैसे वाटप करताना भाजपचा कार्यकर्ता सापडल्याचे व्हिडिओमध्ये पहायला मिळत आहे.
एसीपींची रात्री साडेबारा वाजता घटनास्थळी भेट
विडी घरकूल परिसरातील गोकूळ नगरातील राज मेमोरीयल शाळेजवळ पैसे वाटप होत असल्याचा व्हिडिओ वाऱ्यासारखा शहरभर पसरला. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलिस निरीक्षक विजय खोमणे, सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव व गणेश इंगळे यांनी रविवारी रात्री साडेबारा वाजता भेट दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.