शिवभोजन योजनेची ‘लिमिटेड थाळी’

Thali
Thali
Updated on

मुंबई - नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडी सरकारने दहा रुपयांत पोटभर जेवणासाठी कष्टकरी, कामकरी, गरीब, गरजूंसाठी शिवभोजन योजना सुरू केली. योजना चांगली असली तरी वाट्याला आलेल्या ‘शिवभोजन’च्या थाळ्यांची संख्या गरजूंच्या प्रमाणात अतिशय कमी आहे. मुंबई, उपनगरांत मिळून १ हजार ९५० ताटे, तर पुणे आणि चिंचवडमधील १५०० गरिबांना अन्न लाभ होणार आहे. दुर्गम आदिवासी भागातील गडचिरोलीमध्ये मात्र केवळ १५० गरिबांसाठी ही योजना असेल. राज्यातील १८ हजार गरिबांना दुपारी १२ ते २ या  वेळेत शिवभोजन थाळीचा लाभ मिळणार आहे.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मिळून राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने १० रुपयांत ‘शिवभोजन’ ही गरीब व गरजूंसाठी स्वस्त दरात प्रायोगिक तत्त्वावर योजना सुरू केली आहे. योजनेचा शासकीय आदेश आज काढण्यात आला. ही प्रायोगिक तत्त्वावरील योजना असून, या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यात येणार असून, त्या भोजनालयामार्फत रोज किती थाळ्या शासकीय अनुदानप्राप्त भोजनालयातून द्यायच्या, याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. शिवभोजन योजनेचे भोजनालय चालवण्यासाठी सध्या सुरू असलेली खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिलांचे बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट किंवा मेस यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार आहे. योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या संबंधित ठिकाणच्या स्थनिक समित्यांना अधिकार देण्यात आले आहेत. 

राज्यात ५० ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू केली जाणार आहे.  एका केंद्रामध्ये किमान ७५ ते जास्तीत जास्त १५० ताटांची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एका ताटाची किंमत शहरामध्ये ५० रुपये, तर ग्रामीण भागात ३५ रुपये निश्‍चित करण्यात आली आहे. ग्राहकांकडून घेण्यात येणाऱ्या १० रुपयांव्यतिरिक्‍तचे ४० आणि २५ रुपयाचे अनुदान सरकारतर्फे दिले जाणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती थाळी ?
पुणे - १५००
मुंबई शहर - ४५०
मुंबई उपनगर - १५००
ठाणे - १३५०
पालघर - ४५०
रायगड अलिबाग - ४००
रत्नागिरी - ३००
सिंधुदुर्ग - १५० 
नाशिक - १०००
धुळे - ३००
नंदुरबार - ३००
जळगाव - ७००
नगर - ७००
सातारा - ५००
सांगली - ४५०
सोलापूर - ७००
कोल्हापूर - ६००
औरंगाबाद - ५००
जालना - ३००
परभणी - ३००
हिंगोली - २००
बीड - ४००
नांदेड - ५००
उस्मानाबाद - २५०
लातूर -  ४००
बुलडाणा - ४००
अकोला - ३००
वाशीम - ३००
अमरावती - ५००
यवतमाळ - ४५०
वर्धा - २००
भंडारा - २००
गोंदिया - २००
चंद्रपूर - ३५०
गडचिरोली - १५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.