Kalyan-Palghar Lok Sabha Election: कल्याण लोकसभा मतदारसंघातला संघर्ष संपत नाही तोवर आता पालघर मतदारसंघावरुन पुन्हा एकदा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत नवा वाद रंगणार असल्याचं दिसतंय. कारण, शिवसेना शिंदे गटाकडून खासदारकी लढवण्याच्या दृष्टीकोनातूनही पालघरमध्ये जय्यत तयारी सुरु झाली आहे.
आगामी लोकसभा निवडणूक धनुष्यबाण चिन्हावरच लढवण्याचा मानस शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. त्याचं झालं असं की, २०१८ साली खासदार चिंतामण वनगा यांचं निधन झालं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं राजेंद्र गावित यांना काँग्रेस पक्षातून आयात केलं होतं. या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत पालघरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्यामुळे भाजपात गेलेल्या राजेंद्र गावित यांना शिवसेनेतून ही निवडणूक लढवावी लागली. तिथे ते विजयी झाले. पण २०२२ साली शिवसेनेत शिंदेंनी ऐतिहासिक बंडखोरी केल्यानंतर गावितांनीही शिंदे गटाची वाट धरली.
तरी, आता येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पालघरची जागा पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. त्यामुळे आता कल्याणमध्ये जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अन् डॉ. श्रीकांत शिंदेंच्या जागेवर भाजप शिंदेंच्या शिवसेनेची अडचण करत आहे. तशीच काहीशी खेळी पालघरमध्येही सुरु असल्याचं बोललं जातंय. पालघरची जागा पुन्हा मिळवून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं भाजपनं तिथं पक्ष बांधणी आणि विधानसभा तसेच लोकसभा संपर्क कार्यालय सुरु केलंय.
याशिवाय येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांना संघटनात्मक महत्वाच्या जबाबदाऱ्या देऊन आणि केंद्रीय मंत्री किंवा राज्याचे मंत्री दौऱ्यावर असताना त्यांच्या व्यासपीठावर भाजपकडून स्थान दिलं जातंय. त्यातच पालघर जिल्ह्याच्या स्थानिक लोकप्रतिनिधींसह शिवसेनेतले काही इच्छुक भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
त्यामुळे पालघरची लोकसभा जागा शिवसेनेला नाकारली तर त्याचं नुकसान शिंदेंना बसणार असं दिसतंय. कारण, येत्या विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीवरही लोकसभा निवडणुकीचा परिणाम होईल अशी शक्यता आहे.
त्यामुळे शिवसेना ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख नरेश म्हस्केही आक्रमक झालेले दिसताहेत. नुकतंच त्यांनी पालघर विधानसभा क्षेत्रातल्या ५४ बूथच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांसाठी चिंचणीजवळ शिवदूत मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी म्हस्केंनी आजचे खासदार राजेंद्र गावित हे येत्या २०२४ च्या निवडणुकीत निवडून येणारे भावी खासदार आहेत, असं म्हणत पालघर लोकसभेची जागा शिंदे गटाकडूनच लढवण्यात येईल हे अधोरेखित केलं. त्यामुळे पालघरची जागा आता नेमकी कुणाला मिळते हे पाहणं महत्वाचं असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.