Loksabha Election : कॉँग्रेस १५, राष्ट्रवादी ११, तर ठाकरे गट २२ जागा तर वंचितला... महाविकास आघाडीचे जागावाटपाबाबत एकमत?

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मागील महिनाभरात बैठका घेऊन जागा वाटप निश्चित केलेल्या आढाव्याचा अहवाल तिन्ही पक्षांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे सादर केला आहे.
mahavikas aghadi
mahavikas aghadisakal
Updated on

मुंबई - महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मागील महिनाभरात बैठका घेऊन जागा वाटप निश्चित केलेल्या आढाव्याचा अहवाल तिन्ही पक्षांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे सादर केला आहे.

तिन्ही पक्षांनी स्वतंत्र अहवाल दिले असले तरी राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) ११, कॉँग्रेस १५ आणि २२ जागा शिवसेना ठाकरे गटाने लढवाव्यात यावर एकमत झाले आहे. या जागांमधूनच वंचित बहुजन पक्षाला चार जागा देण्याची तयारी आघाडीने दाखवली आहे. तसेच अजून काही जागांवर अदलाबदल होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची बैठक सहा मार्चला मुंबईत होत आहे.

या बैठकीत ज्या जागांवर एकमत झालेले नाही, ज्या जागा अदलाबदली करावयाच्या आहेत आणि वंचितला द्यावयाच्या जागा यावर चर्चा होणार आहे. ही बैठक येत्या आठवड्यातच होणार आहे. यासाठीचा अहवाल प्रत्येक पक्षाने स्वतंत्र दिला आहे. ज्यामध्ये वारंवार बैठका घेऊनही मार्ग निघाला नाही, अशा प्रश्नांवर वरिष्ठांनी निर्णय घ्यावा, असे ठरले आहे.या बैठकीत प्रमुख चर्चा वंचितच्या जागा वाटपावर होणार आहे.

वंचितला महाविकास आघाडीकडून सहा जागा हव्या आहेत, अशी चर्चा असली तरी अद्याप त्यांनी तशी मागणी केलेली नाही. महाविकास आघाडीने ‘वंचित’साठी अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई आणि मराठवाड्यातील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील एक जागा देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र त्याबदल्यात या तिन्ही जागांमध्ये आपापसात दोन तीन जागांवर अदलाबदली होणार आहे.

मुंबईतील वायव्य आणि उत्तर मुंबई मतदार संघावर पण कॉँग्रेसने दावा केला होता. मात्र आता उत्तर मुंबई मतदारसंघ कॉँग्रेस लढवणार आहे. तर वायव्य मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे. विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांना याच मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

अडचणीच्या जागांबाबत वरिष्ठ निर्णय घेणार

पुढील जागा कुणी लढवाव्यात यावर वरिष्ठांच्या बैठकीत चर्चा होणार आहे. कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराजांनी कॉँग्रेसच्या तिकिटावर लढविण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र २०१९ ला ही जागा शिवसेनेचे खा. संजय मंडलिक यांनी जिंकली होती. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा कॉँग्रेस लढणार असेल तर कॉँग्रेसची पारंपरिक सांगलीची जागा आम्हाला मिळावी, असा आग्रह धरला आहे. यासाठी कॉँग्रेस तयार नसल्याने हा पेच वरिष्ठ सोडवणार आहेत.

महाविकास आघाडीमध्ये दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर कॉँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन अशा तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. मागासवर्गीय मतदारांची लक्षणीय संख्या असल्याने या मतदारसंघाकडे कॉँग्रेस आणि वंचितचे विशेष लक्ष आहे. तर मागच्या लोकसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेने जिंकली असल्याने शिवसेना ही जागा सोडण्यास फार उत्सुक नाही.

दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून मुंबई कॉँग्रेसच्या अध्यक्षा आ. वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यास कॉँग्रेस उत्सुक आहे. तर शिवसेनेचे माजी खासदार अनिल देसाई यांच्यासाठी ठाकरे गटालाही दक्षिण मध्य मुंबई हवी आहे. वंचित बहुजन आघाडीकडे या जागेसाठी कोण उमेदवार आहे हे ठरल्यावरच वंचितला ही जागा द्यायची की नाही हे ठरणार आहे. वंचितने जर सुजात आंबेडकर यांना दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडी आनंदाने ही जागा वंचितला सोडण्यास तयार आहे.

आघाडीतील घटक पक्षात रस्सीखेच

धनगर समाजाचे प्राबल्य असल्याने लोकसभेच्या माढा मतदारसंघातून महादेव जानकर यांच्या नावाची आघाडीमध्ये चर्चा झाली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून पक्षातील एक वरिष्ठ नेता देखील निवडणूक लढविण्यास उत्सुक आहे. त्यामुळे या दोन्ही नावांवर चर्चा होणार आहे.

आघाडीच्या जागावाटपात भिवंडी लोकसभा मतदारसंघ कॉँग्रेसकडे गेला आहे, मात्र त्यांच्याकडे प्रभावी उमेदवार नाही. मात्र राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे बाळामामा म्हात्रे हे उमेदवार आहेत. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघ कोणी लढवायचा यावर चर्चा होईल.विदर्भातील रामटेक आणि अमरावती या दोन्ही जागांवर कॉँग्रेसने दावा केला आहे.

मात्र शिवसेना ठाकरे गटाची या दोनपैकी एक जागा मिळावी असा आग्रह आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्याला आली आहे. आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या माकपने ही जागा डाव्या पक्षांना सोडली जावी, अशी मागणी केली आहे. दिंडोरीची जागा माकपला द्यायची का याचा निर्णय शरद पवार घेणार आहेत.

राजू शेट्टींचे ‘एकला चलो रे’

बहे (जि. सांगली) - ‘लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. युती-आघाडीच्या कोणी कितीही वावड्या उठवू देत,’ असे सांगत माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज ‘एकला चलो रे’चा नारा दिला. हातकणंगले लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार असल्याचे शेट्टी यांनी जाहीर केले. ‘निवडणूक सोपी नाही. ती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकविलेल्या गनिमी काव्याने लढावी लागणार आहे,’ असे शेट्टी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.