Loksabha Election Result 2024 : महाविकास आघाडीची मुसंडी! पंकजा मुंडे पराभूत; नगरमध्ये नीलेश लंके ‘जाएंट किलर’

देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसभेच्या जागा असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून, सत्ताधारी महायुतीला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
mahavikas aghadi
mahavikas aghadisakal
Updated on

मुंबई - देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसभेच्या जागा असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून, सत्ताधारी महायुतीला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. राज्यातील ४८ जागांपैकी महाविकास आघाडीला ३०, तर महायुतीला १७ आणि अपक्षाला एक जागा मिळाली आहे. भारतीय जनता पक्षाला गतवेळेपेक्षा तेरा जागांचे नुकसान सोसावे लागले आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिला असला तरी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने कौल दिला आहे.

काँग्रेसला १३, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला अाठ अशा महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. भाजपला ९, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला सात आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला एक अशा १७ जागा मिळाल्या आहेत. सांगलीतून अपक्ष विशाल पाटील यांनी बाजी मारली आहे.

तिघे मंत्री पराभूत

नितीन गडकरी, पीयूष गोयल, कपिल पाटील, रावसाहेब दानवे, नारायण राणे आणि डॉ. भारती पवार हे केंद्रीय मंत्री निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी गडकरी, पीयूष गोयल आणि नारायण राणे हे तिघे निवडून आले असून, अन्य तिघांना पराभवाचा सामना करावा लागला.

पंकजा मुंडे पराभूत

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा पराभव केला. बजरंग सोनवणेंना सहा लाख ८१ हजार ५६९ मते मिळाली. तर, पंकजा मुंडे यांना सहा लाख ७४ हजार मते मिळाली. बजरंग सोनवणे ६५८५ मतांनी विजयी झाले. भाजपने या निवडणुकीत सलग दोनदा खासदार राहीलेल्या डॉ. प्रीतम मुंडेंची उमेदवारी टाळून पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरविले होते.

पंकजा मुंडे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. केंद्रात व राज्यातील सत्ता, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह भाजप आमदार सुरेश धस, लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा तसेच राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे तसेच खासदार डॉ. प्रीतम मुंडे आदी अर्धा डझन माजी आमदरांची फौज मैदानात होती. तरीही त्यांचा पराभव झाला.

सुप्रिया सुळे, मोहोळ, कोल्हे विजयी

देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी तब्बल एक लाख ५३ हजार मतांनी तर, शिरूर मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांनी एक लाख ४१ हजार मतांनी दणदणीत विजय मिळविला. मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी ९६ हजार ६१५ मतांनी विजय मिळवून हॅट्‍ट्रीक केली तर, पुण्यातून भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ एक लाख २२ हजार मतांनी विजयी झाले.

बारामतीमधील निवडणुकीत शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आव्हान दिले होते. सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा यांना या निवडणुकीत उभे केले होते. नणंद-भावजय या निवडणुकीत समोरासमोर होत्या. अजित पवार यांनी सुनेत्रा यांच्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. भावनिक मुद्यांवर झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी शरद पवार यांच्यावर विश्वास कायम ठेवला.

शिरूरमध्ये मतदारांना डॉ. कोल्हे यांची ‘संभाजी महाराजांची’ प्रतिमा भावली.

पुणे शहरात मोहोळ यांच्यासमोर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी आव्हान निर्माण केले होते. धंगेकर यांनी सुरवातीच्या तीन-चार फेऱ्यांत आघाडी मिळविली होती. तेव्हा भाजपच्या गोटात काही वेळ चिंता निर्माण झाली होती. परंतु, त्यानंतरच्या सलग फेऱ्यांत आघाडी घेत मोहोळ यांनी सहज विजय साध्य केला.

लंके ‘जायंट किलर’

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नीलेश लंके हे जाएंट किलर ठरले. त्यांनी विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा पराभव केला.

जिल्ह्यातील अहमदनगर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी विजयश्री खेचून आणली. दोन्ही मतदारसंघांत सत्तांतर झाले. हा निकाल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा धक्का देणारा ठरला.

अहमदनगरमध्ये नीलेश लंके यांना ६ लाख २४ हजार ७९७ मते मिळून ते विजयी झाले. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना ५ लाख ९५ हजार ८६८ मते मिळाली. एकूण २८ हजार ९२९ मताधिक्यांनी लंके विजयी झाले.

शिर्डीमध्ये वाकचौरे यांना ४ लाख ७५ हजार ६३७ मते मिळून ते विजयी झाले. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना ४ लाख २५ हजार ४९८ मते मिळून ते दोन नंबरवर राहिले.

शाहू महाराजांचा विजय

कोल्हापुरातून काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि साताऱ्यातून भाजपचे उदयनराजे भोसले हे राजघराण्याशी संबंधित दोन्ही उमेदवार विजयी झाले असून शाहू महाराज पहिल्यांदाच तर उदयनराजे तिसऱ्यांदा लोकसभेत जात आहेत.

विद्यमान २१ खासदारांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. प्रमुख पराभूत उमेदवारांमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, प्रख्यात वकील उज्ज्वल निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आदींचा समावेश आहे.

जात प्रमाणपत्रावरून उच्च न्यायालयाने निवड रद्द केलेल्या नवनीत राणा यांना निवडणुकीचा अर्ज भरण्यादिवशी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला, मात्र लोकांनी त्यांचा पराभव केला. दुसरीकडे जात पडताळणी समितीने चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र रद्द केलेल्या रामटेकच्या रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना निवडून देऊन तेथील मतदारांनी त्यांच्यावरील अन्यायाचे परिमार्जन केले आहे.

२०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजधानी मुंबईतील सहापैकी सहा जागा जिंकणाऱ्या महायुतीला मोठा दणका बसला असून सहापैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. उत्तर मुंबई व वायव्य मुंबई अशा दोन जागा महायुतीला मिळाल्या आहेत.

२०१९च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला (एनडीए) ४१ जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत राणाही निवडून येताच भाजपच्या गोटात गेल्या होत्या. अशा ४२ जागा असलेल्या महायुतीला (एनडीए) या निवडणुकीत २२ जागांचे नुकसान झाले असून त्यामुळेच भारतीय जनता पक्षाचा केंद्रात स्वबळावर सत्ता गाठण्याचा मार्ग खडतर बनला.

मविआचा विदर्भावर झेंडा

हेवीवेट नेते नितीन गडकरी यांच्या विजयाची हॅटट्रिक तर सुधीर मुनगंटीवार, नवनीत राणा, प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांच्या पराभवाची नामुष्की यावेळी विदर्भाने अनुभवली. तर अमर काळेंच्या रूपाने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विदर्भात खाते उघडण्याची परवानगी मतदारांनी दिली.

देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, संजय राठोड, परिणय फुके, प्रफुल्ल पटेल, धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतेपणाच्या जादूला नकार देत सुनील केदार, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्या करिश्म्याला मतदारांनी पसंती दिली. महाविकास आघाडीने विदर्भात तुफान घोडदौड केली. दहा जागांपैकी आघाडीला ७ जागांवर विजय मिळवता आला. केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक आणि अमरावती या दोन्ही मतदारसंघांसह भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली-चिमूर या पाच मतदारसंघातून काँग्रेसला खासदार मिळाले. तर भाजपला नागपूर आणि अकोला येथून केवळ दोन खासदार मिळाले.

शिंदे शिवसेनेला बुलडाणा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला यवतमाळ-वाशीम तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला वर्धेतून प्रत्येकी एक खासदार मिळाले. युवा शेतकरी नेते रविकांत तुपकर विजयी झाले नसले तरी त्यांनी त्यांच्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली.

भाजपचे दिग्गज नेते आणि मराठी अस्मितेचे पंतप्रधान पदाचे दावेदार असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. काँग्रेसने या मतदारसंघातून आमदार विकास ठाकरे यांना उतरवले होते. आघाडीत नसले तरी वंचित बहुजनचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केवळ या एकमेव मतदारसंघात आपला उमेदवार न देता काँग्रेसला समर्थन दिले.

त्यामुळे दलित आणि मुस्लिम मतांचा कौल निर्णायक ठरू शकतो, असे दिसत असताना विकासपुरुष ठरलेले गडकरी यांचा मुकाबला करण्यास विकास ठाकरे अपुरे पडले. पाच लाखांच्या फरकांचा त्यांचा दावा सफल झाला नसला तरी विजयाची माळ गडकरी यांच्या गळ्यात पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.