Mahadev Jankar join NDA : मागच्या तीन ते चार वर्षांपासून कायम भाजपला टार्गेट करणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी यू-टर्न घेत भाजपच्या 'एनडीए'सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ''भाजप छोट्या पक्षांना संपवत आहे'' असं सांगणाऱ्या जानकरांना अचानक भाजपप्रेम का उफाळून आलं? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.
शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची एक यादी २२ मार्च रोजी समोर आलेली होती. यामध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे, साताऱ्यातून बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील, शिरुरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके, बीडमधून बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे, वर्ध्यातून अमर काळे आणि माढ्यातून महादेव जानकर यांच्या नावाचा समावेश होता.
महादेव जानकरांनीही स्वतः याबाबत खुलासा करत शरद पवारांकडून माढ्याची जागा मिळाल्याचं सांगितलं होतं. ''महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या कोट्यातून माढ्याची जागा मला देण्याचा निश्चित झालं आहे. राजकारणात कोण कुणाचा शत्रू नसतो की कोण कुणाचा मित्र नसतो'' असं जानकर म्हणाले होते.
एवढंच नाही तर जानकरांनी विद्यमान भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा दोन लाखांच्या फरकाने पराभव होईल, असाही विश्वास व्यक्त केलेला. माझ्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीला ४८ मतदारंसघात फायदा होईल, शरद पवारांनाही माझा फायदा होईल आणि मलाही त्यांचा फायदा होईल.. हे जाणकरांचे शब्द होते.
''भाजपने विधानसभेला केवळ ६ जागा दिल्या होता. परंतु महाविकास आघाडीत २० ते २५ जागा मिळतील. त्यामुळे महाविकास आघाडीसह माझाही फायदा होईल'' असं म्हणणारे जानकर दोनच दिवसांनंतर महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत.
शरद पवारांकडे माढा आणि परभणी लोकसभेची जागा मागणारे जानकर महायुतीत गेल्याने काय फरक पडणार आहे? तर महायुतीमध्ये आता जानकरांना बारामती मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे. बारामती लोकसभात मतदारसंघात धनगर मतांचा प्रभाव आहे. शिवाय ओबीसी मते ते खेचून आणू शकतील. एवढंच नाही तर माढ्याचे भाजप उमेदवार निंबाळकरांना अडचण यामुळे दूर होणार आहे. महायुतीकडून बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उेदवारी मिळेल, अशा चर्चा आहेत. परंतु आता त्यांच्याऐवजी जानकर बारामतीमधून नशीब आजमावतील, असं चित्र दिसून येत आहे.
रविवारी (दि. २४) पुन्हा महायुतीच्या छत्रछायेखाली गेलेल्या जानकरांची भाषा बदलल्याचं दिसून आलं. ते म्हणाले की, भाजप छोट्या पक्षांना संपवत असल्याचा आरोप मी केला होता, हे खरं असलं तरी आता त्यांनी मला लोकसभेची उमेदवारी देण्याचे निश्चित केलं आहे.
मात्र कोणत्या मतदारसंघाचं तिकीट त्यांना देऊ केलंय, याबाबत महादेव जानकरांनी काहीही सांगितलं नाही. महायुतीचे तीन वरिष्ठ नेते त्याबाबत निर्णय घेतील, असं जानकर म्हणाले.
जानकर पुढे म्हणाले की, भाजपने विधान परिषदेवर संधी दिली होती, मंत्रिपदही दिलं होतं. हे विसरता येणार नाही. आता महायुतीचे तीन नेते ठरवतील आणि मला उमेदवारी देतील, मी नक्कीच खासदार होणार आहे, यात शंका नाही. शरद पवार मला वडिलांसारखे आहेत, त्यांच्याशीही माझी चर्चा सुरु होती. परंतु मी आधीपासूनच महायुतीसोबत होतो आणि पुढेही राहणार आहे. असं म्हणत त्यांनी ऐन होळीच्या दिवशी महाविकास आघाडीची धुळवड करत भंडाचा उधळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.