‘आम्ही 162’; विरोधकांनी दाखवली एकजूट

 Maharashtra  162 MLAs  come together to show strength
Maharashtra 162 MLAs come together to show strength
Updated on

मुंबई -  भाजपने अजित पवारांशी हातमिळवणी करीत अचानक सरकार स्थापन केल्यामुळे संतापलेल्या महाविकास आघाडीने आज थेट जनतेच्या न्यायालयात १६२ आमदारांचे शक्‍तिप्रदर्शन करीत सत्ताधारी भाजप सरकारला आव्हान दिले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी येथील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये संविधानाला साक्ष ठेवत एकजुटीची आणि निष्ठेची शपथ घेतली.

बहुमत सिद्ध करण्यासाठी जनतेच्या दरबारात आमदारांसमोर जात महाविकास आघाडीने आमदारांवरीलही नैतिक दबाव वाढविला आहे. महाविकास आघाडीतच असल्याचा दावा केलेले तिन्ही पक्षांचे आमदार आज प्रथमच मुंबईतील ग्रॅंड हयात हॉटलमध्ये एकत्र येत त्यांनी शक्‍तिप्रदर्शन केले. 

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. तिन्ही पक्षांचे मिळून १६२ हून अधिक आमदार उपस्थित होते, असा दावा यावेळी करण्यात आला. 

 विधान भवनाच्या बाहेर बहुमत सिद्ध करण्याला काहीही वैधानिक आधार नसला, तरी हा लढा जनतेच्या दरबारात नेण्याची खेळी महाविकास आघाडीने केली आहे. विधान भवनात बहुमत सिद्ध करण्यास भाजपला आठ दिवसांचा वेळ मिळाल्यानंतर आमदारांची फोडाफोडी होण्याची दाट शक्‍यता महाविकास आघाडीला वाटते आहे. भाजपकडून ‘ऑपरेशन कमळ’ सुरू असल्याचे सूतोवाचही दिले जात असल्याने महाविकास आघाडीला त्यांच्या आमदारांना अक्षरश: सुरक्षित सांभाळून ठेवावे लागत आहे. आमदारांचा इतर कोणाशीही संपर्क होणार नाही, त्यांनी मोबाईलवरदेखील कोणाशी बोलू नये, याची कमालीची खबरदारी घ्यावी लागत आहे. आमदारांचा अपरिचित व्यक्‍तींशी संपर्क होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे. मात्र, विधानभवनात बहुमत ठरावाच्या वेळी महाविकास आघाडीचे आमदार आमिषाला आणि दबावाला बळी पडण्याची शक्‍यता लक्षात घेऊन या आमदारांवरदेखील नैतिक दबावाचे बळ राहावे, यासाठी विरोधकांनी जनतेसमोर आमदारांना नेत शक्‍तिप्रदर्शन केले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज सर्वोच्च न्यायालयातदेखील १६२ आमदारांच्या स्वाक्षरी, फोटोसह प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्या प्रतिज्ञापत्राची फार दखल घेतली नव्हती. मात्र, महाविकास आघाडीकडे १६२ आमदार असून, राज्यपालांनी आम्हाला परवानगी दिली, तर दहा मिनिटांच्या आत सर्व आमदारांची राजभवनावर ओळखपरेड झाली तरी आमची तयारी असल्याचा दावा आज सकाळीच खा. संजय राऊत यांनी केला होता. मात्र, विधान भवनात आणि राजभवनातदेखील ताबडतोब बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाने अद्याप परवानगी दिलेली नसल्याने महाविकास आघाडीने अखेरीस जनतेच्या दरबारात जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. 

पवारसाहेबांशी एकनिष्ठ : धनंजय मुंडे
‘शपथविधी झाला त्या दिवशी मी दुपारी एक वाजेपर्यंत झोपलो होतो. त्यामुळे माझ्या बंगल्यातून आमदारांना फोन गेल्याचे आणि तिथे कोण कोण आले, याबाबत मला माहिती नव्हती,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज पत्रकारांना सांगितले. अजित पवारांवरील माझे प्रेम हा वेगळा विषय असून, त्याआधीही मी पक्षाशी आणि शरद पवारसाहेबांशी एकनिष्ठ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीत गट-तट नाहीत, आम्ही एक आहोत, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

नक्की आमदार किती?
हॉटेल ग्रॅंड हयातमध्ये १६२ हून अधिक आमदार जमले होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला असला, तरी ‘हॉटेलमध्ये आलेल्या आमदारांची संख्या आज मोजली का?’ असे विचारले असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. यावरून तिन्ही पक्षांचे मिळून १४० च्या आसपासच आमदार उपस्थित होते, अशी चर्चा सुरू झाली. भाजप नेते नारायण राणे यांनी तर केवळ १३० आमदार हॉटेलमध्ये आले होते, असा दावा केला.

संपूर्ण राज्यात  ‘हाय ॲलर्ट’ जारी
मुंबई - राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात ‘हाय ॲलर्ट’ जारी करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था चोख राहण्यासाठी हे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येते. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा नाट्यमयरीत्या शपथविधी झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. याचा विचार करून ‘हाय ॲलर्ट’ जारी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.