Maharashtra Agriculture Day : तरुणांमुळे शेतीतही आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे युग

शेतीसमोर हवामानापासून ते वीजपंपाला मिळणाऱ्या विजेपर्यंत आणि बियाण्यांपासून बाजारभावापर्यंत समस्या अनेक आहेत. मात्र, आजही बावन्न टक्के लोकांचा आधार शेती हाच आहे.
Spraying by drone
Spraying by droneesakal
Updated on

शेतीसमोर हवामानापासून ते वीजपंपाला मिळणाऱ्या विजेपर्यंत आणि बियाण्यांपासून बाजारभावापर्यंत समस्या अनेक आहेत. मात्र, आजही बावन्न टक्के लोकांचा आधार शेती हाच आहे. तरुण पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीपुढील समस्यांवर उत्तर शोधत आहे. आपल्या पदवीचा, मोबाईल-इंटरनेटचा वापर ते शेतीविकासासाठी, प्रयोगांसाठी करू लागले आहेत. तरुणांमुळेच आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे युग शेतीतही येऊ घातले आहे.

आताच्या पिढीत राज्यात हजारोंच्या संख्येने प्रयोगशील तरुण नावारूपाला आले आहेत. पदवीधर झाल्याने शेतीत ढोरकष्ट करत नाहीत तर आधुनिक अवजारे, हार्वेस्टर, ड्रोन, सेन्सर, संगणक, बायोटेक्नॉलॉजी अशा मार्गांचा वापर करत स्मार्ट वर्क करत आहेत.

याशिवाय पशुसंवर्धन, खते-औषधे दुकानदार, बियाणे कंपन्या, बँका, सहकारी संस्था, बचत गट, शेतकरी कंपन्या, पर्यटन केंद्र, मधपालन, शेळीपालन, अशा विविध क्षेत्रातही शिरले आहेत.

उदाहरणादाखल निंबूतचा दीपक जगताप हा तरुण राज्यातच नव्हे तर तामिळनाडूपर्यंत अंजीर उत्पादकांचा ‘आयडॉल’ बनला आहे. सुनील भगत यांनी ऊस शेतीवर स्वतः संशोधकाप्रमाणे प्रयोग चालविले आहेत. दत्तात्रेय माळशिकारे यांनी सात एकर ऊस काढून चिंचेचे बन उभारले आहे.

राहताचे अमोल भदे आणि बारामतीचे काका मगर आले शेतीचे आयकॉन बनले आहेत. इंदापूरचे तरुण पेरू आणि डाळिंब लागवडीत नावाजले गेले आहेत. तर पुरंदरचे तरुण टोमॅटो, अंजीर, सीताफळ उत्पादनातील आदर्श बनले आहेत. आयटीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून सातारच्या धनंजय मोहितेने रेशीमशेती तर नांदेडचे आयटीतलेच गुलाब व मंजूषा पावडे यांनी दांपत्याने शेवग्याची शेती सुरू केली. नाशिकच्या भारत ज्ञान विज्ञान समुदायच्या तरुणांनी गूळ कारखाना सुरू केला.

नीरा येथील तरुण गूळ निर्यातदार

पिंपरे खुर्दचे तरुण मिरची निर्यातदार तर नीरा गावचे तरुण गूळ निर्यातदार बनलेत. बारामती तालुक्यात तरूणांनी शंभरेक आधुनिक गायगोठे उभारले आहेत. तरुणीही यात मागे नाहीत. उदाहरणादाखल वाणेवाडीच्या सुषमा शिंगटे यांनी डाळिंबात राज्यात सर्वाधिक भाव मिळविला असून गाईंच्या नव्या प्रजातींवर संशोधन करत आहेत.

ड्रोनद्वारे रोगांचा अभ्यास करून फवारणी

तरुणांना भविष्यात शेतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याच्या संधी आहेत. हवामान अंदाज अचूक सांगणारी, डेटा गोळा करणारी, रिमोट सेन्सरव्दारे जमिनीचा पोत सांगणारी, ड्रोनव्दारे रोगांचा अभ्यास करून फवारणी करणारी अशी एआयशी निगडित यंत्रे लवकरच शेतीत पोचणार आहेत. बायोटेक्नॉलॉजीच्या वापराद्वारे रोग प्रतिकारक जनुके असलेली पिके वाढविणे आणि पशुधनात सुधारणा करणे शक्य होऊ लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.