पुणे : दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या सकाळी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. पुढील चोवीस तासांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता असून, मुंबईसह कोकणात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, अरबी समुद्रात घोंगावणारे क्यार हे चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याचे संकेतही हवामान खात्याने दिले आहेत.
अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या क्यार चक्रीवादळाची पुढील चोवीस तासांमध्ये तीव्रता वाढून ते तीव्र चक्रीवादळ होणार आहे. त्यानंतरच्या बारा तासांमध्ये अतितीव्र चक्रीवादळ होईल. त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला.
क्यार हे चक्रीवादळ अरबी समुद्रात रत्नागिरीपासून 210 किलोमीटर, तर मुंबईपासून 370 किलोमीटर अंतरावर आहे. ते ओमानच्या दिशेने सरकरण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. या दरम्यान "क्यार'ची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर वाढेल.
पुणे शहर आणि परिसरात सप्टेंबरच्या शेवटी स्थानिक वातावरणाचा परिणाम म्हणून दमदार पाऊस पडला. त्यानंतर वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ऑक्टोबरच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शहरात पावसाच्या सरी पडत आहेत. तर आता क्यार या चक्रीवादळामुळे आलेल्या बाष्पांमुळे शहरात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून पाऊस पडत आहे.
यंदा दिवाळीत थंडी जाणवत नसून पुणेकरांना जुलै-ऑगस्टमध्ये काढलेले रेनकोट, जर्किन, छत्र्या अजूनही वापरत असल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी पुण्यातील रस्त्यांवर दिसत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.