मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे सरकार उद्या (११ ऑक्टोबर) रस्त्यावर उतरणार असून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारला या बंदमधून सरकारला इशारा देण्यासाठी जनेतेने स्वतःहून पाठिंबा देण्यासाठी बंदमध्ये सहभागी असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.
लखीमपूर खेरी हिंसाचाराबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत खेद व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली.
‘लखीमपूर’च्या निषेधार्थ आज ‘बंद’
या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही केले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस हे तिन्ही पक्ष या बंद मध्ये सहभागी होणार आहेत.
उद्याच्या बंदबाबत बोलताना काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारविषयी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मागील अनेक महिन्यांपासून देशाच्या कानाकोपऱ्यात शेतकरी आंदोलने होत आहेत. पण केंद्र सरकार शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यायला तयार नाही. केंद्र सरकारने लोकाभिमुख निर्णय घेण्याची गरज आहे. परंतु, त्याऐवजी एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भरधाव वाहनाखाली चिरडले जाते. हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांचा आणि विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. ही दडपशाही लोक सहन करणार नाहीत.’’ शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाविकासआघाडी ने ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. नागरिकांनी सुद्धा शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून या आंदोलनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
‘जुलमी सरकारचा निषेध’
बंदबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी, उद्याचा बंद हा कडकडीत होणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले, ‘‘ जनता या बंदमध्ये निश्चितपणे सहभागी होईल. हा बंद केंद्रातील शेतकरी विरोधी जुलमी सरकारच्या विरोधात आहे. शेत मालाच्या लुटीसाठी कायदे करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांच्या हत्या करत आहेत, या घटनांच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.”
“केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा या घटनेत हात होता, असे इतके दिवस लोक सांगत असताना, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने दोनवेळा हस्तक्षेप केल्यानंतर काल त्यांना अटक केली गेली. आमची मागणी आहे की केंद्रीय गृहराज्यमंत्री जे देशातील गृहखात्याचे मंत्री आहेत. त्यांच्या गृहराज्यात त्यांच्या गावात ही घटना घडली. अगोदर ते शेतकऱ्यांना इशारा देत होते. नंतर लोकांची हत्या करण्यात आली. त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे ही आमची मागणी आहे,” असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले.
राजभवनासमोर आंदोलन
लखीमपुर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ मुंबईतील राजभवनाच्या समोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले काँग्रेस नेत्यांसह मौनव्रत आंदोलन करणार आहेत. त्यांनीच याबाबतची माहिती दिली.
"शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने लखीमपूर खेरी येथे ज्या शेतकऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली त्या घटनेच्या विरोधात निषेधार्थ बंद पुकारलेला आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मागे संपूर्ण देश उभा आहे, हे दाखवण्यासाठी सर्वांनी बंदला पाठिंबा दिला पाहिजे, सहभागी झालं पाहिजे."
- नवाब मलिक, अल्पसंख्यांक मंत्री
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.