MP Supriya Sule : ...तर महाराष्ट्र सरकारकडे पगार देण्याइतकेही पैसे राहणार नाहीत

'सध्या महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या व धोरणाच्याबाबतीत संकटात सापडला आहे. अडीच लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज, त्याचे व्याज वाढले आहे.
Supriya Sule
Supriya SuleSakal
Updated on

पुणे - 'सध्या महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या व धोरणाच्याबाबतीत संकटात सापडला आहे. अडीच लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज, त्याचे व्याज वाढले आहे. कंत्राटदार, शिक्षक, आशा सेविका पैशांसाठी आंदोलन करत आहेत. महिला सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले आहे, हे असेच सुरू राहिले तर काही महिन्यांनी महाराष्ट्र सरकारकडे पगार देण्याइतकेही पैसे राहणार नाहीत' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने निसर्ग कार्यालय येथे बुधवारी पुणे शहर व जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल सुळे म्हणाल्या, 'राज्य सरकार एकीकडे कामांचे कंत्राट देत आहे, कितीतरी कंत्राटदारांचे ४० हजार कोटी रुपये प्रलंबित असल्याचे सांगत आहे, असे असताना ४८ हजार कोटी रुपयांच्या पुण्याच्या रिंगरोडचे बजेट ते आणत आहेत.

इतकेच नव्हे, तर पुण्याच्या रिंगरोडच्या कामासाठीचा खर्च दुप्पट वाढला आहे. एकीकडे लोकांना कामाचे ४० हजार कोटी रुपये देण्यासाठी नाहीत आणि दुसरीकडे रिंगरोड बांधण्यासाठी २० हजार कोटी रुपयांची जादा रक्कम कुठून येणार? असे काही करू नये, हे त्यांच्या कॅबिनेटच्या फायनान्स नोटमध्ये लिहिले आहे.'

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सुळे म्हणाल्या, 'देवेंद्र फडणवीस यांनी हरियाणापेक्षा थोडा वेळ महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी द्यायला पाहिजे होता, तेव्हा कदाचित बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरण, बदलापूर प्रकरणातील लेक यांची सुरक्षितता झाली असती, ललित पाटीलचे ड्रग्ज प्रकरण, पोर्शे अपघात प्रकरणात कारवाई झाली असती तर बहिण म्हणून मी स्वतः फडणवीस यांना हार घातला असता, त्यांना ओवाळले असते.'

मुख्यमंत्रिपदाच्या मुद्याबाबत सुळे म्हणाल्या, 'महाविकास आघाडी टीम म्हणून जे सांगेल, ते आम्हाला मान्य आहे. लोकसभेला आम्ही जिथे लढलो, तिथे कॉंग्रेस व शिवसेनेने मोठ्या ताकदी, निष्ठेने आम्हाला मदत केली. आम्हीही त्यांना तेवढीच मदत केली. आम्ही एकमेकांसाठी कष्टाची पराकाष्ठा केलेली आहे. आमच्याकडून तितकेच काम विधानसभेला केले जाईल. आम्हाला राज्य येणे महत्त्वाचे आहे.'

'डंके की चोट पे' पुढच्या दरवाजाने या

'अजित पवार किंवा भाजपबरोबर काम करणाऱ्या प्रत्येकाला मी सांगितले आहे, पाठीमागच्या दरवाजाने येऊ नका, यायचेच असेल तर "डंके की चोट पे' पुढच्या दरवाजाने या. अजित पवार, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांना अगोदर विचारा, मगच या' असे सुळे यांनी स्पष्ट सांगितले. पक्ष सोडून गेलेले ३-४ लोक वगळता, बहुतांश लोक मला भेटतात, त्यांचे कुटुंब भेटतात. अजित पवार यांच्याबरोबर गेलेले ९५ टक्के लोक मला पुण्यात, दिल्लीत नियमीत भेटत असल्याचेही सुळे यांनी आवर्जून सांगितले.

सुळे म्हणाल्या,

- पक्षाच्या मुलाखतींसाठी १६०० अर्ज, ९५ टक्के इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण

- महाराष्ट्रातील जनता संघर्षाच्या काळात पक्षाच्या पाठीशी उभी राहिली

- फुले-शाहु-आंबेडकरी विचारसरणीच जनतेने निश्‍चित केली

- महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढला पाहिजे

- महिला आरक्षण बिलाचा निर्णय लवकर व्हावा

- उमेदवारी न मिळालेल्या प्रत्येक इच्छुक, कार्यकर्त्यांचे संघटन व अन्य निवडणुकांद्वारे होणार पुनर्वसन

- इच्छुक उमेदवारांमध्ये डॉक्‍टर, इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअरचाही समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.