Beed Health Facility News: ग्रामीण आरोग्याची धुरा खांद्यावर असलेल्या आरोग्य सेविकांच्या खांद्यावर आता जन्मापासून मृत्यूपर्यंतची आणि डाटा एंट्री ऑपरेटरची व लॅब टेक्निशीअनचीही कामे मागे लागली आहेत. उपचार बाजूला अन् त्यांना १६ प्रकारची कामे करावी लागतात. विशेष म्हणजे १७५०० लोकसंख्येमागे केवळ एक आरोग्य सेविका, असे चित्र आहे. पाच हजार लोकसंख्येमागे एक आरोग्य सेविका असावे, असा राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेचा दंडक आहे.
जिल्ह्यात ३० लाख लोकसंख्येला केवळ १७१ आरोग्य सेविका आहेत. जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र तर २९७ उपकेंद्र असून, आरोग्य सेविकांची संख्या १७१ आहे. त्यामुळे ‘पांढरा रंग अन् कायम कामात दंग’ असे चित्र आहे. आरोग्य विभागाने आता आरोग्य सेविकांवर डाटा एंट्रीसारखे तांत्रिक कामेही लावली आहेत. म्हणजे आरोग्य सेवेचे प्रशिक्षण घ्यायचे अन् संगणकीय कामे करायची, असे आरोग्य विभागाच्या धोरणामुळे आरोग्य सेविका तर तणावाखाली आहेतच. शिवाय यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणाही कोलमडली आहे. जिल्ह्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील आरोग्य सेविकांची ३२४ पदे रिक्त आहेत.
आरोग्य सेविकांची ५५ ते ६० टक्के रिक्त पदे हे राज्यातील सर्वत्र चित्र आहे. विशेष म्हणजे २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर ही पदे मंजूर आहेत. लोकांवर प्रथमोपचार करणाऱ्या आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत या आरोग्य सेविकांची नेमणूक असते. मात्र, हळूहळू या संवर्गावरील कामांचा भार वाढला आणि पदांची संख्या घटत गेली. शासन रोज नवा उपक्रम हाती घेते आणि त्याचा पहिला भार या सेविकांवर पडतो. त्यामुळे शासनाचे उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणीही अशक्यच आहे.
पुरुषांनाही पडतात भारी
पुरुष आरोग्य सेवक केवळ साथ रोग नियंत्रण येवढीच कामे करतात. लसीकरण, गर्भवती स्त्रियांच्या भेटी त्यांना नको वाटतात. मात्र, ज्या आरोग्य केंद्रात पुरुष आरोग्य सेवकाचे पद रिक्त आहे, तिथे मात्र त्यांची जबाबदारी आरोग्य सेविका चोख पार पाडतात.
प्रशिक्षण आरोग्य सेवेचे काम डाटा एंट्रीचे
प्रथमोचाराचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या परिसेविका ग्रामीण आरोग्य यंत्रणेत आरोग्य सेविका पदावर नोकरीत आहेत. आता बदलत्या धोरणात त्यांच्यामागे डाटा एंट्रीसारख्या तांत्रिक व झंजटीच्या कामाचाही भार पडत आहे. आरसीएच ऑनलाइन करणे, एचएमआयए, डएचआयएस ऑनलाइन करणे, युवीन पोर्टलला नियमित लसीकरण ऑनलाइन करणे, आभा हेल्थ कार्ड ऑनलाइन काढणे, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे फॉर्म ऑनलाइन व्हेरिफाय करणे अशी डाटा एंट्री कामेही या संवर्गावर लादली जात असतील तर त्या आरोग्य सेवा कधी व कशा देणार, हा प्रश्न आहे.(Latest Marathi News)
ही कामे करावी लागतात
गरोदर मातांची नोंदणी, लसीच्या मात्रा व कॅल्शिअम गोळ्या
वजन, उंची, एचबी, शुगर, लघवी आदी तपासण्या.
गृहभेटी करुन त्यांचे कार्ड अद्ययावत करणे.
शून्य ते १६ वर्षांपर्यंतच्या बालकांचे लसीकरण.
क्षयरोग, कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम.
कुटुंब कल्याण कार्यक्रमांची उद्दिष्टपूर्ती.
जंतनाशक मोहीम.
१८ वर्षांवरील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी.
जन्म नोंद, मृत्यू नोंदीबाबत आशांची बैठक.
उपकेंद्र स्तरावरची सर्व रजिस्टर अद्ययावत ठेवणे.
ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी.
ॲनिमिया मुक्त भारत अभियान.
एनसीडी तसेच आयुष्यमान भव कार्यक्रम
साथ रोग सर्वेक्षण
जननी सुरक्षा सुरक्षा व प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.