विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे, मात्र या निवडणुकीत मतांची जुळवाजुळव करताना आपल्या पक्षाचे आमदार फुटू नयेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि काँग्रेस वगळता अन्य पक्षांनी त्यांच्या आमदारांची व्यवस्था येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये केली आहे.
विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसताना महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या निवडणुकीत तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्याने रंगत वाढली आहे. विधान परिषदेच्या ११ सदस्यांची मुदत येत्या २७ रोजी संपत आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी शुक्रवारी (ता.१२) मतदान होत आहे. भाजपच्या पाच, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन तर, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येकी एक उमेदवाराने आज अर्ज दाखल केला. त्यामुळे आता ११ जागांसाठी १२ अर्ज आल्याने निवडणूक होणार आहे.
आमदार फुटण्याची शक्यता लक्षात घेता आमदारांची व्यवस्था हॉटेलमध्ये केली असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असतानाही या पक्षाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलेले नाही.
या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा घडमोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीपूर्वी, क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील ११ जागांसाठी उद्या म्हणजेच (१२ जुलै रोजी) मतदान होणार आहे. ११ एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. आमदारांची फुटाफुट रोखण्यासाठी राज्यातील पक्षांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या आमदारांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यास सुरूवात केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी आपापल्या आमदारांची बैठक घेतली. भाजपच्या आमदारांनी पक्षाचे प्रभारी भूपेंद्र यादव यांची पक्ष मुख्यालयात भेट घेतली, तर शिवसेना-ठाकरे गटाचे आमदार हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे जमले. काँग्रेसने आज 11 जुलै रोजी हॉटेल इंटरकॉन्टिनेंटल येथे आमदारांची बैठक आयोजित केली आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील हॉटेल ललितमध्ये राहण्याची सोय केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे सेनेच्या आमदारांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड येथे, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे मुक्काम करण्यात येणार आहे. भाजपनेही आपले आमदार दक्षिण मुंबईतील ताज प्रेसिडेंटमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन वर्षांपूर्वी द्विवार्षिक परिषद निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल लागले होते. या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता, त्याचबरोबर शिवसेनेचे तत्कालीन नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने तत्कालीन महाविकास आघाडीचे (MVA) सरकारही पडले होते.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीने राजेश विटकर आणि शिवाजीराव गर्जे यांना तिकीट दिले आहे, तर सत्ताधारी शिवसेनेने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसने पुन्हा प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेने (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांना तिकीट दिले आहे. विरोधी पक्षाकडून शेतकरी आणि कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनीही उमेदवारी दाखल केली आहे.
27 जुलै रोजी निवृत्त झालेल्या 11 आमदारांपैकी भाजपचे चार, काँग्रेसचे दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिवसेना-(ठाकरे गट), शेतकरी आणि कामगार पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रत्येकी एक आमदार आहे. या 11 आमदारांची निवड आमदारांच्या गुप्त मतदानाद्वारे केली जाते.
MLC निवडणुका 12 जुलै रोजी आमदारांच्या गुप्त मतदानाद्वारे होणार आहेत. विजयी उमेदवाराला निवडून येण्यासाठी 23 प्रथम प्राधान्य मतांची आवश्यकता असणार आहे.
शिवसेना : ताज लँड्स एन्ड (वांद्रे)
राष्ट्रवादी काँग्रेस : हॉटल ललित (विमानतळ)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : आयटीसी ग्रँड मराठा (परळ)
भाजप : प्रेसिडेंट हॉटेल (कफ परेड)
विधान परिषदेसाठी उमेदवार
भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके,
अमित गोरखे, सदाभाऊ खोत
शिवसेना (शिंदे गट ): भावना गवळी, कृपाल तुमाने
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे
काँग्रेस : डॉ. प्रज्ञा सातव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : मिलिंद नार्वेकर
शेकाप : जयंत पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.