Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
maratha reservation
maratha reservationsakal
Updated on

आमदारांच्या घरांवरील हल्ल्याप्रकरणी २७ जणांना ६ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी|

बीड जिल्ह्यात आमदारांच्या घरांवरील हल्ल्याप्रकरणी २७ जणांना ६ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ११ जणांना न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आलंय. तर अन्य १६ जणांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

राजस्थानमधील काँग्रेसचे प्रमुख नेते सचिन पायलट आणि त्यांच्या पत्नी सारा अब्दुला यांचा घटस्फोट झाला आहे. सचिन पायलट यांनी निवडणूक जाहीरनाम्यात भरलेल्या माहितीवरुन हे उघड झाले आहे.

डेंग्युची लागण झाल्यानं अजितदादांना 101 ताप

 डेंग्युची लागण झाल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सध्या घरच उपचार सुरु आहेत. पण त्यांना प्रचंड विकनेस असून अंगात 101 फॅरनहाईट इतका ताप आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय काकोटे यांनी ही माहिती दिली. अजितदादांना गेल्या चार-पाच दिवसांपासून डेंग्यूचा संसर्ग झाला आहे

मनोज जरांगेंच्या फोननंतर जालन्यात इंटरनेट सेवा पुन्हा सुरु

मराठा आरक्षण आंदोलनानं हिंसक रुप घेतल्यानं संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला फोन केल्यानंतर इंटरनेट सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

निर्णय घेतला नाही तर उद्यापासून जलत्याग करणार; मनोज जरांगे पाटील

सरकारने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. त्यामुळे रात्रीपर्यंत निर्णय घेतला नाही, तर मी जलत्याग करणार आहे. सरकारने विशेष अधिवेशन बोलावून यासंदर्भात निर्णय घ्यावा, असं मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

सुस गावात मराठा आंदोलनाची धग; रस्त्यावर टायर जाळले

पुणे- मराठा आंदोलनाची धग सुस गावात पोहोचली आहे. सुस गावात डॉमिनोज शॉपच्या जवळ रस्त्यावर टायर जाळण्यात आले आहेत. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.

वारकऱ्यांबरोबर शरद पवार यांनी धरला ठेका

वारकऱ्यांबरोबर शरद पवार यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. तुकाराम ग्यानोबा भजनात पवार सहभागी झाले होते. वसई विरारच्या वारकऱ्यांबरोबर पवार भजनात सहभागी झाले होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या‌बाहेर ‌ग्यानबा तुकोबांचा जयघोष करण्यात आला.

लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली येथे टायर जाळून महामार्ग अडवला

मराठा आंदोलनाचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहे. लातूर जिल्ह्यात पानचिंचोली येथे टायर जाळून रस्ता अडवण्यात आला आहे. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचं सांगण्यात येतं.

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी ठाकरे; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे उद्धव ठाकरे आहेत. त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घणाघात केली आहे.

मराठा आंदोलनावरुन फडणवीसांची शाहांसोबत फोनवरुन चर्चा

मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली आहे. राज्यातील स्थितीची माहिती त्यांनी गृहमंत्र्यांना दिली.

जीव पणाला लावू नका; राज ठाकरेंचे जरांगेंना पत्र

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. अनेक ठिकाणी हिंसक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना पत्र लिहिलं असून उपोषण थांबवावं अशी मागणी केली आहे.

नवले पुलावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील दोन तासांपासून पुण्यातील नवले पुलावर आंदोलन सुरु होतं. त्यामुळे या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरुळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न कऱण्यात येत आहेत.

पुण्य़ातील नवले पुलावर दोन तासांपासून आंदोलन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यातील नवले पुलावर मराठा आंदोलकांकडून दोन तासांपासून जास्त वेळ आंदोलन सुरु आहे.

मंत्रिमंडळ बैठक संपली, शिंदे समितीचा अहवाल स्वीकृत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली होती. या बैठकीत न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल स्वीकृत करण्यात आला आहे.

मुंबईचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका लागली कामाला!

मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. त्याअंतर्गत महापालिकेने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांना ‘स्टॉप वर्क’ नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या नोटिसांमुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, उपाययोजना करण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे.

मराठा आरक्षणासाठी विनायक पाटलांचा जिवंत समाधी घेण्याचा निर्णय

मराठा आरक्षणासाठी कवठा गावचे सुपुत्र श्री विनायकरावजी पाटील यांनी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नवले ब्रीजवरती आंदोलकांचा रास्तारोको; गाड्यांच्या लांब रांगच रांगा

नवले ब्रीजवरती मराठा आंदोलकांनी रास्तारोको केला आहे. त्यामुळे गाड्यांच्या लांब रांगच रांगा लागल्या आहेत.

मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी  महामार्ग अडवून वडगाव पुलाजवळ टायर जाळले

मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी  महामार्ग अडवून वडगाव पुलाजवळ टायर जाळण्यात आले आहेत.

शाहू महाराज छत्रपती जरांगेंच्या उपोषणस्थळी; तब्येतीची केली विचारपूस

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे मनोज जरांगे पाटील यांच्याजवळ पोहचले.

राजीनामा दिल्यानंतर हेमंत पाटलांनी धारण केलं मौन व्रत

राजीनामा दिल्यानंतर हेमंत पाटलांनी मौन व्रत धारण केलं आहे. नवीन महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हेमंत पाटील बसले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राज्यपालांच्या भेटीला

मुख्यमंत्री शिंदेंनंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील राज्यपालांच्या भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांनी भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या- मनोज जरांगे

महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या, अर्धवट आरक्षण नको, सरसकट आरक्षण द्या असं मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज घेणार मनोज जरांगे पाटलांची भेट; कोल्हापूरहून जालन्याकडे रवाना

श्रीमंत शाहू महाराज हे आज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे काही पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ

चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. काही भागात नेत्यांच्या गाड्या आणि घरी पेटवून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नेते, मंत्री, आमदारांच्या बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मनोज जरांगे आजपासून पाणी पिणार, आंदोलक हिंसक होत असल्यामुळे घेतला निर्णय

मराठा आंदोलकांच्या आग्रहामुळे मनोज जरांगे आजपासून पाणी पिणार आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. अनेक ठिकाणी जाळपोळी, फोडाफोडीच्या घटना घडल्या आहेत. आंदोलन हिंसक होत असल्याने आंदोलकांच्या आग्रहाने ते पाणी घेणार आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि नेते जयदत्त क्षीरसागर यांचे घर जाळले

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि नेते जयदत्त क्षीरसागर राहत असलेल्या बंगल्याला मराठा आंदोलकांनी आग लावली. बीडमध्ये सुरू असलेल्या जाळपोळीच्या घटनांमुळे बीडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे

मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने नेते, मंत्री, आमदार यांच्या बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षा वाढवली

मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले आहेत. काही भागात नेत्यांच्या गाड्या आणि घरी पेटवून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नेते, मंत्री, आमदारांच्या बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काल बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि नेते जयदत्त क्षीरसागर यांचे बंगले जाळण्यात आले आहेत. शिवाय आमदार प्रकाश सोळंके यांचाही बंगला काल आंदोलकांनी जाळला.

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सातव्या दिवशी सुरु आहे. राज्यभरात मराठा आंदोलन पेटले आहे. अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. राज्यातील परिस्थितीचा आढावा पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दिला. बीड आणि धारशिवमध्ये संचारबंदी, दरम्यान आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यात मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.