विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकी देणारे संदेश पाठवून अफवा पसरविल्याचा प्रकार नुकताच घडला. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्रीकांत वडगावकर (वय ३७) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाइन्सच्या समाज माध्यमातील खात्यावर ॲडम अलांझा नावाने संदेश पाठविण्यात आला होता. त्या संदेशात विमानात बाँम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत पोलिसांनी ॲडम अलांझा १००० या नावे असलेल्या समाज माध्यमाच्या खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारचा दुसरा धमकीचा संदेश २००८ बाँम्बिंग या खात्यावरून विस्तारा एअरलाइन्स कंपनीला पाठविण्यात आला होता. अशा अफवांमुळे विमान सेवेवर परिणाम झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.