Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भाईंदर येथील भागवत सत्संग आणि सनातन संमेलनाला उपस्थित होते

Breaking Marathi News Updates 30 September 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updatesesakal
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भाईंदर येथील भागवत सत्संग आणि सनातन संमेलनाला उपस्थित होते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भाईंदर येथील भागवत सत्संग आणि सनातन संमेलनाला उपस्थित होते.

कर्वेनगर येथे नदीपात्रात पुन्हा टाकला जातोय भराव

मुठा नदीच्या निळ्या पूर रेषेच्या आतमध्ये कर्वेनगरच्या बाजूने राडारोडा टाकल्याने एकतानगर भागात पुराचे पाणी घुसले होते. पण त्यानंतरही राडारोडा टाकून जमीन तयार केली जात असल्याने पुन्हा एकदा या भागाला पुराचा धोका निर्माण झाला आहे.

बाणेर टेकडीवर नागालँडच्या तरुणाला मारहाण

बाणेर टेकडीवर मित्रासमवेत गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाला टोळक्याने मारहाण करून लुबाडल्याची घडली. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रस्ता ओलांडताना दुचाकीच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

रस्ता ओलांडताना दुचाकीच्या धडकेने तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना येरवड्यातील गुंजन चौक ते शास्त्रीनगर रस्त्यावर घडली. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला आहे.

Indapur Live: इंदापूरमध्ये गोळीबारात तरुण जखमी

इंदापूरमध्ये महाविद्यायलासमोर अज्ञाताकडून गोळीबार झाल्याची घटना घडल्याचे समोर येत आहे. यामध्ये तरुण जखमी झाल्याचेही समजत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस पोहचले असून जखमी तरुणाला हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले आहे.

India Live:  एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग हवाई दलाचे नवे प्रमुख

सोमवारी एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. ते आता एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांची जागा घेतील.

Nagpur Live : नागपुरात आपचा संघाच्या कार्यालयावर मोर्चा

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत याना 5 प्रश्न विचारले होते. त्याच प्रश्नांची उत्तरं मागण्यासाठी नागपुरात आम आदमी पक्षाने आज चिटणीस पार्क ते बडकस चौक मोर्चा काढला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संघ मुख्यालयकडे हा मोर्चा जाणार असतांना मात्र संघ मुख्यालय हे संवेदनशील ठिकाण असल्याने पोलिसांनी मोर्चाला बडकस चौकात थांबविण्यात आला. त्यानंतर दोन प्रतिनिधींनी पोलिसांच्या गाडीतून संघमुख्यालयात नेण्यात आलं. त्यांनी संघ मुख्यालय इथे आपलं निवेदन दिले.

Mumbai Live : अर्थखात्याचा विरोध तरीही महाजनांच्या सूतगिरणीला ३२ कोटींचा निधी

अर्थ खात्यानं विरोध केलेला असला तरीही मंत्री गिरीश महाजनांच्या सूतगिरणीला ३२ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकरावर निशाणा साधला आहे. वारंवार असा प्रकार घडत असून अर्थ खात्यांच्या इशाऱ्याकडं दुर्लक्ष केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास कायदेशीर अडचणी- चंद्रकांत पाटील

कुणबी दाखला देण्यासाठी १० प्रकारचे डॉक्युमेंट लागू होते आता ते ४२ केले. त्यामुळे १ लाख ७६ हजार नोंदी सापडल्या आहेत. याचा फायदा लाखो जणांना होणार आहे. सरसरट मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणं कायदेशीर अडचणीचं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Congress Live: उद्यापासून काँग्रेस घेणार इच्छुकांच्या मुलाखती

१ ॲाक्टोबर पासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु होणार आहेत. उमेदवारांच्या मुलाखतीसाठी काँग्रेसने नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. १ ते ८ ॲाक्टोबरपर्यंत नेते जिल्ह्यात जाऊन घेणार मुलाखती घेणार आहेत.

नवरात्रीमध्ये महाविकास आघाडीचं जागावाटप होणार

महाविकास आघाडीची बैठक गेल्या पाच तासांपासून सुरू असून काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे नेते उपस्थित आहेत. नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यात जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis Live: राहुल गांधींचा खरा चेहरा समोर आला- देवेंद्र फडणवीस

संविधान संपवणार असं फेक नरेटिव्ह काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाने चालवलं होतं, त्यांचाच खरा चेहरा उघड झाला आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याचा जे स्टेटमेंट केलं त्यामुळे यांचा खरा चेहरा आणि खरे दात समोर आले आहेत.

Cotton Farmers  live Updates: २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू

२०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीनं हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.

Mild Tremors Amravati District live Updates: अमरावती जिल्‍हयामध्‍ये भुकंपाचे सौम्‍य धक्‍के

अमरावती जिल्‍हयामध्‍ये जाणवले भुकंपाचे सौम्‍य धक्‍के. भूकंपाचे केंद्र अमरावती जिल्‍हयातील चिखलदरा तालुक्‍यातील अमझरी व टेटु या गावाच्‍या दरम्‍यान असुन 4.2 रिश्‍टर स्‍केल वर नोंद

भारतीय पोलीस सेवा ७६ RR  च्या प्रोबेशनर्सनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेतली भेट 

भारतीय पोलीस सेवा ७६ RR (२०२३ बॅच) च्या प्रोबेशनर्सनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. कायदा आणि सुव्यवस्था राखल्याशिवाय, न्याय सुनिश्चित केल्याशिवाय आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण केल्याशिवाय प्रगती हा अर्थहीन शब्द बनतो असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

देशी गायींच्या चाऱ्यासाठी मदतीचा निर्णय- देवेंद्र फडणवीस 

देशी गायींच्या चाऱ्यासाठी मदतीचा निर्णय घेतला आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

अमरावतीमधील मेळघाटात जाणवले भुकंपाचे सौम्य धक्के

अमरावतीमधील मेळघाटात जाणवले भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे.

Umari Live Update : उमरी शहरातील सर्व मालमत्ताधारकांना नवीन कर आकारणीबाबत पालिकेकडून नोटिसा

उमरी शहरातील सर्व मालमत्ताधारकांना पालिकेने नवीन कर आकारणीबाबत नोटिसा बजावल्या असून, या नोटिसा पाहून शहरातील मालमत्ताधारक नागरिक मात्र हैराण झाले आहे. नागपूर येथील निरको या खासगी कंपनीमार्फत उमरी शहरातील सर्व मालमत्ताधारकांची नवीन फेर कर मूल्यांकन करण्यात आले आहे. संबंधित यंत्रणेकडून शहरातील नागरिकांना मालमत्ता कराच्या नोटीस वाटप करण्यात आल्या आहेत. पंचवार्षिक फेर कर मूल्यांकन विशेष नोटीस असा त्यावर उल्लेख असून, २०२४ ते २०२९ या पाच वर्षांकरिता कर आकारणीसाठी नगरपरिषद हद्दीतील सर्व करपात्र मालमत्तांचे पुनमूल्यांकन करून कर आकारणी प्रस्तावित केल्याचे त्यात नमूद करण्यात आले.

Dharashiv Live Update : चर्मकार समाजाच्या मागण्यांसाठी उद्या आझाद मैदानावर मोर्चा

धाराशिव : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे थकीत कर्ज माफ करावे, संत रविदास महाराज यांच्या नावे विद्यापीठ सुरू करण्यासाठी १०० एकर जमीन व निधी त्वरित द्यावा, यांसह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उद्या (ता. १) राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मोर्चा धडकणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष नितीन शेरखाने यांनी दिली.

शेरखाने म्हणाले, शासनाकडे वारंवार मागण्या केल्या. मात्र, त्यांची पूर्तता झालेली नाही. संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी द्यावी, संत रविदास कौशल्य विकास बार्टी प्रमाणे सुरू करून बार्टीच्या धरतीवर स्वतंत्रपणे केंद्रे सुरू करावीत.

Subhash Sabane LIve : सुभाष साबणेंची अनुपस्थिती ठरली भाजपतील अंतर्गत गटबाजीच्या चर्चेचा विषय

भाजपचे प्राबल्य असलेल्या बिलोली तालुक्यात दोन खासदारांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याचे आयोजक काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेले माजी आमदार जितेश अंतापूरकर होते. या मेळाव्यातून भाजपचे देगलूर विधानसभा प्रमुख माजी आमदार सुभाष साबणे अनुपस्थित असल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपतील अंतर्गत गटबाजी सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर हे देखील भाजपत दाखल झाले. मात्र, मागील पंधरवड्यात खतगावकरांनी राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Nanded Live Update : हणेगाव ग्रामपंचायत शिळवणीचे सरपंच मनोहर देशमुख विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

हणेगाव ग्रामपंचायत शिळवणीचे सरपंच मनोहर देशमुख यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करणे, गावच्या विकासकामात अडथळा निर्माण करणे, दलित वस्तीतील रस्त्यावर अतिक्रमण करणे अशी कारणे अविश्वास प्रस्तावात नमूद आहेत.

ठरावाच्या अनुषंगाने मतदानासाठी तहसीलदारांनी ता.४ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतीत विशेष सभा घेण्यात येणार असल्याचे कळविले आहे. अविश्वास अर्जावर उपसरपंच अनिल राठोड, शोभाबाई देशमुख, मंगेश वंजे, अनिताबाई देशमुख, शीतल सूर्यवंशी, नागनाथ देवकत्ते, अश्विनी देवकत्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Maharashtra Updates Live: आदिवासी आमदारांची समजूत काढण्यासाठी मंत्री विजयकुमार गावितांचे प्रयत्न सुरू

आदिवासी आमदार आमशा पाडवी आक्रमक झाले असून, त्यांनी यापूर्वी १० वेळा बैठक घेतली आहे. त्यांच्या मागणीनुसार पेसा विषयावर तोडगा काढावा लागेल, अशी मागणी आदिवासी नेते हिरामण खोसकर यांनी केली आहे. सध्या सर्व आमदार चर्चा करण्यासाठी उपस्थित असून, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावे, अशी एकमुखी मागणी आमदारांकडून करण्यात येत आहे.

Dhangar reservation Live: आदिवासी समाजातील आमदारांचे धनगर आरक्षणाविरोधात तीव्र आंदोलन

धनगर आरक्षणाच्या विरोधात आदिवासी समाजातील १० आमदारांनी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. नरहरी झिरवळांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन आज मुंबईत मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ होत आहे. या आंदोलनात उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये हेमंत सावरा, काशिराम पावरा, किरण लहामटे यांसारख्या आदिवासी समाजातील प्रमुख आमदारांचा समावेश आहे. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, आदिवासी मंत्री विजयकुमार गावित देखील उपस्थित आहेत.

BJP MLA Nitesh Rane Live : अमरावतीमध्ये भाजप आमदार नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

अमरावतीच्या अचलपूर पोलीस ठाण्यात भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 196 आणि कलम 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान खान अस्लम खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राणेंवर गुन्हा दाखल केला, अशी माहिती विशाल आनंद, एसपी अमरावती यांनी दिली आहे.

देशी गायी 'राज्यमाता - गोमाता' म्हणून घोषित... राज्य सरकारची घोषणा  

वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायीच्या दुधाची मानवी उपयुक्तता,आयुर्वेदिक चिकित्सा पद्धति, पंचगव्य उपचार, शेण गोमूत्र यांच्या सेंद्रिय शेतीतील महत्त्वाचे स्थान यामुळे देशी गायीबाबत निर्णय घेत राज्य सरकारने राज्यमाता गोमाता म्हणून जाहीर केले आहे.

Ajit Pawar Live : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमधे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे एकमेव आमदार कमलेश सिंह भाजपमधे प्रवेश करणार आहेत. 3 ऑक्टोबरला सिंह यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून कमलेश सिंह हे हुसेनाबाद मतदार संघाचे आमदार आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होते. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झारखंड प्रदेशाध्यक्ष आहेत. कमलेश सिंह यांच्यासोबत त्यांचे पुत्र सूर्या सिंह हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Latest Maharashtra News Updates : काँग्रेसचे नगरसेवक माजी महापौर आबा बागुल यांनी घेतली पवारांची भेट

काँग्रेसचे नगरसेवक माजी महापौर आबा बागुल यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. ते पर्वती मतदार संघासाठी इच्छुक असून मतदारसंघाची मागणी केली आहे. यापूर्वीही आबा बागुल यांनी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये मोठा कार्यक्रम पर्वती मतदार संघात आयोजित केला होता. आबा बागुलही राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.

Pune Vilas Lande Meet Sharad Pawar Live:  विलास लांडे चार नगरसेवकांसह पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

विलास लांडे चार नगरसेवकांसह पुन्हा शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. मागील आठवड्यात देखील शरद पवारांची विलास लांडे यांनी भेट घेतली होती. यापूर्वी अजित पवारांसोबत देखील विलास लांडे यांनी भेट घेत केली होती चर्चा, आज पुन्हा शरद पवारांच्या भेटीसाठी विलास लांडे पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

कोणते नगरसेवक शरद पवारांच्या भेटीला?

प्रशांत शितोळे

मयूर कलाटे

मोरेश्वर भोंडवे

विनोद नदे

Tirupati Mandir Live: तिरुपती मंदिरातील लाडू प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

तिरुपती मंदिरातील लाडू बनवताना वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीची भेसळ केल्याप्रकरणी हस्तक्षेप करण्याच्या मागणी करणाऱ्या अनेक जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ३० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

Mumbai Police Live: मुंबई पोलिसांचे BookMyShow ला समन्स

मुंबई पोलिसांच्या EOW ने BookMyShow ची मूळ कंपनी बिग ट्री एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​CEO आशिष हेमराजानी आणि कंपनीचे तांत्रिक प्रमुख यांना समन्स पाठवले आहे. ईओडब्ल्यूने त्यांना यापूर्वी 27 सप्टेंबर रोजी समन्स पाठवले होते परंतु ते एजन्सीसमोर हजर झाले नाहीत. त्यांना आज तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांच्या कथित काळाबाजाराबद्दल वकील अमित व्यास यांनी EOW कडे तक्रार केली होती.

Amritpal Singh LIVE : तुरुंगात असलेला कट्टरपंथी अमृतपालसिंगचे वडील पक्ष स्थापणार

चंडीगड : तुरुंगात असलेला कट्टरपंथी अमृतपालसिंग याचे वडील तारसेम सिंग यांनी रविवारी पंजाबमध्ये राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. अमृतसरमधील प्रसिद्ध सुवर्णमंदिरात प्रार्थना केल्यानंतर त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. सर्व लोकांच्या कल्याणासाठी पक्ष स्थापन केला जाईल. सर्व मानव समान आहेत, या तत्त्वाचे पालन करू, असेही त्यांनी सांगितले. पंजाबमधील आगामी चार विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या घोषणेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Mumbai Local LIVE : पश्चिम रेल्वेच्या तब्बल 150 ते 175 लोकल रद्द; चाकरमान्यांचे होणार हाल

पश्चिम रेल्वेने गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या विस्ताराचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गिकेवर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. दरम्यान, हे काम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले असून त्यापैकी 128 तासांचं काम बाकी आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून 4 ऑक्टोबरपर्यंत 150 ते 175 लोकल रद्द होणार आहेत. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवासांचे हाल होणार आहेत.

Weather Update LIVE : कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह आज पावसाचा अंदाज

पुणे : मॉन्सूनच्या परतीचा प्रवास अडखळला असतानाच, राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. ३०) दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. २४) राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि हरियानाच्या काही भागांतून मॉन्सून परतला. त्यानंतर मात्र मॉन्सून परतीची वाटचाल ‘जैसे थे’ आहे.

Tirupati Laddu Case : तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, याचिकाकर्त्यांची सीबीआय चौकशीची मागणी

नवी दिल्ली : तिरुपती मंदिरातील लाडू बनवताना वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीची भेसळ केल्याप्रकरणी जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या कारण यादीनुसार, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ३० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

Jammu and Kashmir Assembly Elections LIVE : जम्मू-काश्‍मिरात प्रचारतोफा थंडावल्या

जम्मू : जम्मू-काश्‍मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संपला. तीन टप्प्यांत आयोजित केलेल्या या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी मंगळवारी (ता. १) मतदान होत आहे. सात जिल्ह्यांतील ४० मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये जम्मू भागातील जम्मू, उधमपूर, सांबा आणि कथुआ हे जिल्हे, तर उत्तर काश्‍मीरमधील बारामुल्ला, बंदीपोरा आणि कुपवाडा या जिल्ह्यांचा समावेश आहे. ४१५ उमेदवार या टप्प्यात रिंगणात आहेत.

Weather Rain Alert LIVE  : महाराष्ट्रासह 11 राज्यांना आज पावसाचा अलर्ट

आजही काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कच्छच्या आखात आणि पूर्व मध्य प्रदेशाजवळ एक धोकादायक चक्री चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे आज सोमवारीही अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य भारतातील राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणा इत्यादी राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Western Railway Block LIVE : पश्चिम रेल्वेवर आज चार तासांचा मेगाब्लॉक; रेल्वेच्या अनेक लोकल रद्द

Latest Marathi Live Updates 30 September 2024 : पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाची आज साप्ताहिक बैठक आहे. मराठा उपसमितीची बैठकही होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे पालघर, ठाणे मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीची आज बैठक होत आहे. आजही काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. कच्छच्या आखात आणि पूर्व मध्य प्रदेशाजवळ एक धोकादायक चक्री चक्रीवादळ तयार होत आहे. जम्मू-काश्‍मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.