Monsoon Session: दोन्ही सभागृहांचं आजचं कामकाज स्थगिती; दिवसभरात काय चर्चा झाल्या जाणून घ्या एका क्लीकवर

Monsoon Session LIVE
Monsoon Session LIVESakal
Updated on

विधानसभेचं आजचं कामकाजच संपलं

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. विधानपरिषदेनंतर आता विधानसभेचं देखील आजचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. यानंतर पुढील कामकाज सोमवारी, २४ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरु होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.

विधानपरिषदेचे आजचे कामकाज संपले

विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून आजचे कामकाज संपले आहे. सोमवारी पुन्हा अधिवेशनाच्या कामाला सुरूवात होईल.

इर्शाळवाडी दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन

इर्शाळवाडी दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृदात निवेदन दिले आहेत. ही घटना खूप दुर्दैवी आहे. यामध्ये आत्तापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला असून १०९ लोकांची ओळख पटली आहे. मी कालपासून घटनास्थळी होतो, तेथील मृतांच्या नातेवाईकांना भेटलो, त्यांना धीर दिला, माणुसकी दाखवली. हे दृश्य खूप भयानक होती. राज्यात ज्या ज्या ठिकाणी दरड प्रवण क्षेत्र आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. येथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांचे कायमचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी सहकारी भूमिका घेतली, अशा परिस्थितीतही त्यांनी माणुसकी दाखवली. असं मुख्यमंत्री म्हणाले.

प्राजक्त तनपुरे आणि उदय सामंत यांच्यात वाद

५०० चौरस फूट घराना मालमत्ता कर माफ करण्याचा प्रश्नावर प्राजक्त तनपुरे आणि उदय सामंत यांच्यात वाद

प्राजक्त तनपुरे यांनी या प्रश्नावर बोलताना आघाडी सरकार असताना निर्णय झालं होतं पण तुम्ही मध्येच गुवाहाटी गेलात ,त्यामुळे अधिकारी पण सुट्टी टाकून निघून गेले नाहीतर हा निर्णय तेव्हाच झालं होता असा टोला मारला

यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांना सुनावले

गुवाहाटी विषय काढायची गरज नव्हती

तुम्ही वेळेत अजित पवार यांच्याकडे गेले असते तर ही वेळ आली नसती

आम्ही पण इतकी वर्ष राजकारणात आहोत आम्हाला पण सगळ्यांचं माहित आहे

आम्ही गुवाहाटी गेलो हे झोबल तुम्हाला

मी राजकीय बोलत नाही,

विमानतळावरून आदित्य ठाकरे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात वाद

विमानतळाच्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले... त्यानंतर ते कॅबिनेट बैठकीला गेल्याने विमानतळ प्राधिकरण खाते तात्पुरते गुलाबराव पाटील यांच्याकडे दिले. उपमुख्यमंत्री गेल्यावर अपेक्षित उत्तर न मिळाल्याने इतर आमदारांनी नाराजी व्यक्त केली.

आदित्य ठाकरे यांनी खाते बदल आणि मंत्र्यांकडे पक्का अभ्यास नसतो असे विधान केले त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.

"शेतकऱ्याचा मुलगा आहे कुठे काय पिकते उगवते त्याचा मला अभ्यास आहे. तुम्हाला विमानतळ माहिती असेल" असं गुलाबराव पाटील म्हणाले.

इर्शाळवाडी दुर्घटना, शेतकरी प्रश्नावर नाना पटोले -

मानवी आधाराने इर्शाळवाडीमध्ये उपाययोजना होऊ शकत नाहीत. काल दिवसभर मुख्यमंत्री घटनास्थळी होते, ते पण काही करू शकले नाहीत. जी मदत दिली आहे ती अत्यल्प आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री यांनी उपाययोजना केली पाहिजे. असं फक्त एक गाव नाहीये तर अनेक गावे आहेत. त्यांचे देखील स्थलांतर करायला हवं.

त्याचबरोबर राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. कापूस अजून शेतकऱ्यांच्या घरी आहे. शेतकऱ्यांनी जो कापूस विकलाय त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत असं नाना पटोले सभागृहात म्हणाले.

विरोधीपक्षनेता कोण? नाना पटोलेंचं स्पष्टीकरण

इर्शळवाडी दुर्घटनेवरही नाना पटोले यांना सभागृहात मुद्दा उपस्थित केला आहे. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आपली भूमिका बजावत आहे आणि सरकारला धारेवर धरत आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही असं ते म्हणाले आहेत.

CJI यांच्या विरोधात बोललं जातंय, याबाबत आम्ही राज्यपालांकडे जाणार

भाजपला सत्तेची मस्ती आलेली आहे. त्यांच्यावर CJI यांनीसुद्धा ताशेरे ओढलेत. त्यावर भाजप आमदारांनी सुद्धा CJI यांच्यावर ताशेरे ओढले, आता यांची एवढी हिंमत झाली आहे. मणिपूर प्रकरणी चंद्रचूड साहेबांनी चिंता व्यक्त केली. भाजपच्या राज्यात महिलांना नग्न करून धिंड काढून मानवतेला काळिमा फसण्याचं काम केलं जातंय. आपल्या देशाला कलंक लावण्याचे काम मणिपूरमध्ये केलं जातंय. भारताचा एक भाग जळत असताना पंतप्रधान मोदी एक शब्दही बोलले नाही. 78 दिवसानंतर काल त्यांनी एक शब्द काढला. कोणाला सोडणार नाही असं बोलले... डबल इंजिन सरकार यावं म्हणून मणिपूर मध्ये सत्ता द्या असं त्यांनी सांगितलं. CJI यांच्या विरोधात बोललं जातंय. याबाबत आम्ही राज्यपालांकडे विषय घेऊन जाऊ असं काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले.

नवी मुंबई विमानतळ पुढच्या वर्षी सुरू होईल

नवी मुंबईचं विमानतळ पुढच्या वर्षी सुरू होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. त्याचबरोबर कराड शहरासारख्या मध्यवर्ती ठिकाणीसुद्धा विमानतळाची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले.

पालकमंत्र्यांना महापालिकेत केबीन का दिली?

पालकमंत्र्यांना मुंबई महापालिकेत केबीन का दिली? ही केबीन २४ तासांच्या आत खाली करावी... असा प्रश्न आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानभवनाच्या प्रांगणात माध्यमांना बोलताना उपस्थित केला. आता बीएमसीत सुद्धा अतिक्रमण करायचं आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी त्यांनी केली.

लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आज सभागृहात गोंधळ केला. समान नागरी कायदा आणण्याच्या आधी मणिपूरकडे लक्ष द्या असं म्हणत विरोधकांनी गोंधळ केला आणि या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे. सोमवारी पुन्हा कामकाज सुरू होणार आहे.

भाई जगताप यांची वाक्य पटलावरून काढण्याचे नीलम गोऱ्हे यांचे आदेश

मणिपूरचा प्रश्न उपस्थित करत आमदार भाई जगताप यांनी "पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का?" असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सभागृहात गोंधळ झाला असून भाई जगताप यांची वाक्य पटलावरून काढण्याचे आदेश नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

विधानपरिषदेत मणिपूर घटनेवरून विरोधकांचा गोंधळ

मणिपुरच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू करत गोंधळ केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्घटनेबाबत विधानपरिषदेत विरोधकांकडून मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

इर्शाळवाडी घटनेवर नाना पटोले

काल इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडली. पण आताची स्थिती काय आहे याची माहिती आज दिली नाही. कोकणातील हजारो गावांत अशी धोकादायक परिस्थिती आहे. त्या गावात वीज नाही, रस्ते नाही यावर चर्चा केली पाहिजे. या घटनेतील मृतांना ५ लाखांची मदत देण्यात आली आहे. पण सध्याची तेथील परिस्थिती पाहून पाच लाखांत काही होणार नाही. ही रक्कम सरकारने वाढवून दिली पाहिजे असं काँग्रेसचे नाना पटोले सभागृहात म्हणाले आहेत.

मिशन झिरो ड्रॉप आऊट मोहीम

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात दाखल करण्यासाठी मिशन झिरो ड्रॉप आऊट ही मोहीम राज्य सरकारने राबवली आहे. ही मोहीम ५ जुलै २०२२ ते २० जुलै २०२२ कालावधीत राबवली. राज्यात २०२२-२३ मध्ये ४६५० मुले आणि ४६७५ मुली असे एकूण ९३०५ बालके शाळाबाह्य आढळून आली. २०२२-२३ मध्ये आढळून आलेल्या ९३०५ मुलांपैकी ९००४ बालके शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आली, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

शाळाबाह्य मुलांची संख्या याबाबत प्रश्नोत्तरे सुरू असताना भाजप आमदार सुनील राणे यांनी विधान केले. "शाळांमध्ये विद्यार्थी गणवेश आणि मध्यान्ह भोजन साठी येतात. पण देण्यात येणारी खिचडी ही दगडाने फोडावी अशी असते त्यात अळ्या असतात. असं असेल तर ही योजना बंद करावी." यावर शालेय शिक्षण मंत्री केसरकर उत्तर दिले असून दोन महिन्यात सुधारित मध्यान्ह भोजन योजना आणू असं आश्वासन दिले.

सभात्याग केल्यानंतर वर्षा गायकवाड म्हणाल्या...

मणिपूर अत्याचारासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी आम्हाला सभागृहात बोलू दिलं नाही. अध्यक्षांनी आमचं म्हणणं ऐकलं नाही, महिलांना संरक्षण दिलं पाहिजे असं मत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्यासोबत यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांनीसुद्धा सभात्याग केला आहे.

"ही घटना लज्जास्पद आहे. फक्त मणिपूरचाच विषय नाही, तर जगातल्या भारताच्या प्रतिमेचा विषय आहे, या प्रकरणावर मोदी सुद्धा संसदेत बोलायला तयार नाहीत" असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. तर खऱ्या अर्थाने या देशात लोकशाही शिल्लक आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा पद्धतीने मुस्कटदाबी करण्यात येत असल्याचं मत वर्षा गायकवाड यांनी मांडलं आहे.

विधानसभा कामकाज सुरू, विरोधक आक्रमक

विधानसभेत विरोधकांचा सभात्याग

मणिपूर मध्ये महिलेवर झालेल्या अन्याया विरोधात प्रस्ताव मांडला पाहिजे असं म्हणत यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड सभागृहात आक्रमक झाल्या आहेत.

"मी नाकारले नाही, आपल्याकडे नियम आहेत. तुम्ही प्रस्ताव मांडा मग बघू... तुम्ही प्रस्ताव मांडणार नाही आणि चर्चा मागणार असे होणार नाही" असं अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

"महिलांवर अत्याचार करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अत्याचारी सरकारचा धिक्कार असो, मौनी बाब सरकारचा धिक्कार असो" महिला आमदार वेल मध्ये बोलत आहेत. काही विरोधकांनी सभात्याग केला आहे. तर "तुम्ही मला नोटीस दिली नाही, प्रस्ताव दिला नाही, तुम्ही महत्वाचा विषय मांडला आहे. पण जोपर्यंत प्रस्ताव दिला नाही तोपर्यंत चर्चा होणार नाही" असं नार्वेकर यांनी सांगितलं.

विधानपरिषदेतून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्यासंदर्भात, अनुदान आणि नुकसानी संदर्भात खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला असून याबद्दल सरकारचं काय नियोजन आहे? शेतकऱ्यांना तुम्ही मदत करणार आहात की नाही? असा सवाल केला आहे.

त्याचबरोबर शेतकरी आत्महत्या संदर्भातला मुद्दाही त्यांनी विधानपरिषदेत मांडला आहे. शेतकऱ्यांना लागणाऱ्या खते, कीटकनाशके यांच्यावरील जीएसटी कमी कसा करता येईल यावर सरकारने विचार करावा. अनेक शेतकऱ्यांना बनावट खते वाटप करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं, यावेळी सरकार काय करत होतं? त्यावर तुम्ही काय कारवाई करणार? या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार की नाही? असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.

तुम्ही शेतकऱ्यांना २४ तास वीज देऊ अशी घोषणा केली होती. पण किमान १२ तास तरी चांगली वीज द्या असंही ते म्हणाले.

विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांचे आंदोलन

मणिपूर येथील आत्याचारासंदर्भात विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरू केलं आहे. त्यामध्ये सरकारविरोधात घोषणा दिल्या जात आहेत. "उलट्या काळजाच्या थंड रक्ताच्या केंद्र सरकारचा धिक्कार, भारतवासिंयो हम शरमिंदा है, मणिपूर मैं हैवानियत जिंदा है" अशा आशयाचे पोस्टर धरून महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं आहे.

इर्शाळवाडी दुर्घटनेसंदर्भात अनिल पाटील म्हणाले...

इर्शाळवाडी येथे सकाळी 6.30 पासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या गावात 48 कुटुंब आणि 288 लोकं राहत होती. आत्तापर्यंत 119 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. तर यामध्ये 16 जणांचा मृत्यू झालाय. सकाळपासून पाऊस सुरू आहे त्यामुळे तिथला मलबा हटवण्यात अडचण येत आहे. मॅन्युअली काम सुरू असल्याची माहिती मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे नेते विधानसभा अध्यक्षांना भेटणार

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर आमदार आज विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटणार आहेत. यावेळी व्हीप, निलंबनासाठी दाखल केलेले अर्ज आणि कारवाई याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

मंत्रिमंडळाची दुपारी होणार बैठक

राज्यभरातील विविध भागात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर इर्शाळवाडी दुर्घटना आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी १ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.

अजित पवार मंत्रालयात दाखल

विधानभवनात जाण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात दाखल झाले आहेत. काल त्यांनी कंट्रोल रूममधून इर्शाळवाडी येथील परिस्थितीचा अंदाज घेतला होता.

अधिवेशनाचा पाचवा दिवस

आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. काल इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेवरून सभागृहात माहिती देण्यात आली होती. आत्तापर्यंत या दुर्घटनेमध्ये १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून १०० पेक्षा जास्त लोकं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. काल सायंकाळच्या दरम्यान थांबवण्यात आलेले बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मुसळधार पाऊस आणि घटनास्थळी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे बचावकार्याला अडथळे येत असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.