महाराष्ट्राची कन्या पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार! 

महाराष्ट्राची कन्या पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार! 
Updated on

सातारा - "एमपीएससी' परीक्षेमधील यश, "सीबीआय'मध्ये अधीक्षकपदी निवड अशा महत्त्वाच्या संधी नाकारत चाकोरीबाहेर जाण्याची जोखीम पत्करणारी महाराष्ट्राची कश्‍मिरा पवार आता पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सल्लागार बनली आहे. साताऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील या 24 वर्षीय युवतीने "मेक इन इंडिया' आणि "ग्रामीण विकास' प्रकल्पांतर्गत केलेल्या कामगिरीची दखल घेतल्याने यापुढे ती आता विविध क्षेत्रांतील योजनांबाबत केंद्र सरकारला सल्ला देणार आहे. 

केंद्र सरकारच्या वतीने विविध क्षेत्रांतील विकासासाठी काही प्रकल्पांच्या स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेत कश्‍मिराने भाग घेतला. त्यात पंतप्रधान कार्यालयाच्या "मेक इन इंडिया' प्रकल्पात तिने प्रथम क्रमांक मिळविला. "मेक इन इंडिया' व ग्रामीण विकास या दोन प्रकल्पांना राष्ट्रपती पुरस्कारही लाभला. तिने तयार केलेल्या "सोशल असिस्टंट प्रोग्राम'ला पेटंट देऊन ही योजना केंद्राच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबविण्यास सुरवात केली. ग्रामीण विकासाच्या प्रकल्पातून तिने सुचविलेल्या "स्मार्ट व्हिलेज'ची योजना उत्तर प्रदेशात राबविण्यास सुरवात झाली आहे. "एमपीएससी'मधून तिची उपजिल्हाधिकारी म्हणून नुकतीच निवडही झाली आहे आणि पंतप्रधान कार्यालयातून राष्ट्रीय सल्लागार म्हणूनही. 

केंद्र सरकारच्या प्रकल्प स्पर्धेतील सहभागानंतर गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीपासून पंतप्रधान कार्यालयातील मुख्य सचिव नृपेन मिश्रा तसेच सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, श्रीकर परदेशी अशा प्रमुख अधिकाऱ्यांच्या संपर्कात कश्‍मिरा असते. साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ती या अधिकाऱ्यांशी विविध विषयांविषयी चर्चा करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिच्याशी संवाद साधला आहे. चीनच्या अनुषंगाने डोकलामबाबत तिने व्यक्त केलेल्या मतांवर आधारित केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेतील प्रश्‍नांना उत्तरे दिली आहेत. डोवाल व मिश्रा हे अधिकारी विविध विषयांची मांडणी करताना कश्‍मिराच्या नावाचा उल्लेख तिने व्यक्त केलेल्या मतांसह करतात. आतापर्यंत साताऱ्यात राहून ती सल्ला देत होती, आता पंतप्रधान कार्यालयातील टीममध्ये राहून ती यापुढे कार्यरत राहणार आहे. 

ग्रामीण भागातील युवक घरी राहून, परंतु अभ्यास आणि मेहनतपूर्वक काय करू शकतो, हेच कश्‍मिराने सिद्ध केले आहे. वडील संदीप हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरी करतात, तर आई मेघा रयत शिक्षण संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्राचार्या आहे. आई-वडिलांची एकुलती एक कन्या आता तिच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राची आणि भारताची कन्या बनणार आहे. केवळ अभ्यासच नव्हे, तर ती ऍथलेटिक्‍समध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवरची खेळाडूही आहे. भरतनाट्यमच्याही तीन परीक्षा तिने दिल्या आहेत. आंतरशालेय वादविवाद स्पर्धेतील ती विजेती आहे. नागरी सेवेसाठी काम करू इच्छिणाऱ्या कला शाखेतील विद्यार्थ्यांना ती मार्गदर्शन करते. अकरावी, बारावीला शास्त्र शाखेचा अभ्यास करणाऱ्या कश्‍मिराने नंतर येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये तिने "स्टुडंट ऑफ द ईअर' किताब मिळविला. सोशिओलॉजी विषयामधून एम.ए. करताना ती शिवाजी विद्यापीठात टॉपर ठरली. विद्यापीठाच्या एकांकिका स्पर्धेत तिने यश मिळविले. 

साताऱ्यात घरी राहूनही निर्धार व अभ्यासपूर्वक पुढे जाता येते. कोणत्याही प्रकारचा क्‍लास न लावता घरीच अभ्यास केल्याचे ती सांगते. केंद्राकडून तिच्यासाठी होणाऱ्या पत्रव्यवहारावर "कश्‍मिरा पवार, महाराष्ट्र' एवढाच पत्ता असतो. तेवढ्या पत्त्यावर तिचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तिला पोचविले जाते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.