मुंबई : खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत व्हावा यासाठी एकनाथ शिंदे गट दिवसेंदिवस अधिकाधिक आक्रमक होत असून शिवसेनेला धक्का देण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख पदाला मात्र यात धक्का न लावता एकनाथ शिंदे यांची प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे आजच्या बैठकीला शिवसेनेचे १२ खासदार ऑनलाइन उपस्थित असल्याची माहिती आहे.
आजच्या बैठकीत शिंदेगटाच्या उपनेतेपदी उदय सामंत, गुलाबराव पाटील, आढळराव पाटील, विजय नहाटा, यशवंत जाधव यासारख्या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर शिंदे गटातील आमदारांची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या काही खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती असल्याचे सांगण्यात येते. शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याचे सांगण्यात येते.
या बैठकीत शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तर, नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड करण्यात आली.
‘एनडीए’मध्येच
दरम्यान, शिवसेना अजूनही राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्येच (‘एनडीए’)आहे, असा पवित्रा एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या शिवसेना खासदारांनी घेतला आहे. ‘एनडीए’च्या सभासदत्वाचा राजीनामा शिवसेनेने दिलेला नाही, अरविंद सावंत यांनी फक्त मंत्रिपद सोडले, शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडीचा (‘यूपीए’) घटक नाही, असा शिंदे गटाचा युक्तिवाद आहे.
एकनाथ शिंदेसोबतचे खासदार
राहुल शेवाळे, भावना गवळी, प्रतापराव जाधव, संजय मंडलिक, कृपाल तुमाने, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, श्रीरंग बारणे आणि डॉ. श्रीकांत शिंदे
राष्ट्रीय पातळीवरही फूट
शिवसेनेत राष्ट्रीय पातळीवरही फूट पडली असून लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांची नेमणूक होण्याची शक्यता आहे, तर पक्ष प्रतोदपदी भावना गवळी यांनाच कायम ठेवण्यात येणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नसली तरी तसे पत्र लोकसभा अध्यक्षांना उद्या देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर निर्णय होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या बारा खासदारांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर हे सहा अद्यापही ‘मातोश्री’शी एकनिष्ठ आहेत.
बारा खासदार शिंदे गटासोबत
नवी दिल्ली : शिवसेनेची विद्यमान राष्ट्रीय कार्यकारिणी एकनाथ शिंदे यांनी बरखास्त करून नवी कार्यकारिणी जाहीर केल्याने शिवसेना संसदीय पक्षामध्ये फूट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोकसभेतील शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटासोबत गेले आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे उद्या (ता.१९) दिल्लीमध्ये येणार असून ते समर्थक खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या सर्व प्रकाराची ‘कॉमेडी सर्कस सिझन- टू’ अशा शब्दांत खिल्ली उडविली आहे. शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष असून फुटीर गटाला राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार नाही, असा दावाही त्यांनी आज दिल्लीत केला. शिवसेनेचे ११ खासदार (एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे वगळता) संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या गोटातून करण्यात आला होता. तसेच हे खासदार शिवसेना नेतृत्वाने शिंदे गटाशी जुळवून घ्यावे यामताचे असल्याची चर्चा होती. शिंदे गटाने लोकसभेत राहुल शेवाळे यांना गटनेतेपदी नेमले असून प्रतोदपदी भावना गवळी राहणार असल्याचेही म्हटले आहे. यामुळे लोकसभेमध्ये शिवसेनेच्या खासदारांमध्ये फूट पडली असून १२ खासदारांच्या गटाला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (ता.१९) पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नव्या नियुक्त्यांचे पत्र या गटातर्फे उद्या लोकसभा अध्यक्षांना दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या गटाची स्वतंत्र बैठकही दिल्लीत झाल्याचे समजते.
सहा खासदार उद्धव यांच्या पाठीशी
शिवसेनेचे लोकसभेतील १८ खासदारांपैकी विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, गजानन कीर्तिकर, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ आहेत. खासदार किर्तीकर मुंबईत असून उर्वरित खासदारांची शिंदे गटाने नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी बैठकही झाली. राज्यसभेतील खासदार अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी यावेळी उपस्थित होते.
संजय राऊत म्हणाले
- फुटीरगटाला कार्यकारिणी बरखास्तीचा अधिकार नाही
- सीझन ‘वन’ विधिमंडळात झाला, ‘टू’ आता दिल्लीत
- आमदारांच्या अपात्रतेबाबत २० तारखेला सुनावणी
- शिवसेनेची याचिका नियम, कायद्याच्या आधारे मजबूत
- भीतीपोटी शिंदे गट संभ्रम निर्माण करण्याचे काम करतो
- फुटीरगटाला पक्ष म्हणून मान्यता मिळालेली नाही
- आमदार सांभाळण्यासाठीची ही धडपड सुरू आहे.
- शिवसेनेचे नेतेमंडळ बाळासाहेब आणि कार्यकारिणीने निर्माण केले
- शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून नेमले
- शिवसेना हा गट नव्हे तर नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे.
विधिमंडळात जी फूट पडली त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. लोकसभेमध्ये कोणी असा प्रयत्न करत असेल तर त्यांना फुटीर म्हणावे लागेल. या क्षणी आम्ही मानतो की, लोकसभेतील शिवसेना एकसंध आहे. स्वतः विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची त्यांनी घेतलेली शपथ बेकायदा आहे.
- संजय राऊत, नेते शिवसेना
शिवसेनेचे लोकसभाध्यक्षांना पत्र
शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत यांनी सायंकाळी उशिरा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले आहे. त्यात त्यांनी आपण गटनेते आणि राजन विचारे प्रतोद हे पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी आहेत, अन्य कोणत्याही खासदाराचा पक्षादेश, पत्र किंवा विनंतीला महत्त्व दिले जाऊ नये, असे म्हटले आहे.
शिवसेनेची टीका
न्यायालयाच्या सुनावणीच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली. ‘‘शिवसेना संपविण्याचे कारस्थान महाराष्ट्राला मान्य होणार नाही. त्यामुळे शिवसेना संपविण्याचा भाजपचा डाव कधीच यशस्वी होणार नाही,’’ असे मत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.