पुणे : सिंधुदुर्ग, रत्नागिरीला आज पावसाने अक्षरश: झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. विदर्भातही नागपूर, गडचिरोलीमध्ये चांगलाच पाऊस कोसळला आहे.
खारेपाटणला पुराचा वेढा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून आज सायंकाळी खारेपाटण शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. तेरेखोलने इशारा पातळी ओलांडल्यामुळे बांदा बाजारपेठेला देखील पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. सुख आणि तेरेखोल या दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून या दोन्ही नद्या रात्री धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील काही मार्गावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जिल्ह्याच्या सर्व भागांत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. गड नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव परिसरातही अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे तेथील काही पुलावरून पाणी वाहत आहे. बांदा-आंबोली मार्गावर देखील काही ठिकाणी पुराचे पाणी आहे. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
रत्नागिरीत कोसळधार
रत्नागिरी जिल्ह्यात आज दिवसभर प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळला. खेड तालुक्यातील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत असून लांज्यातील काजळी नदीही धोका पातळीच्या जवळ आहे. याशिवाय राजापुरात कोदवली, संगमेश्वरमध्ये शास्त्री आणि लांज्यात मुचकुंदी या नद्यांच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. रत्नागिरीत भातशेतीचे नुकसान झाले आहे.
पंचगंगेच्या पातळीत वाढ
कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वभागांत पावसाची संततधार तिसऱ्या दिवशीही सुरू होती. धरणक्षेत्रातही पावसाची दमदार बरसात झाल्याने नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून आज रात्रीत इशारा पातळी ओलांडली जाण्याचा अंदाज आहे.
विदर्भालाही झोडपले
पावसाने आज विदर्भालाही झोडपले. गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे गडचिरोली-आरमोरी, गडचिरोली-मूल, आलापल्ली-भामरागड, भामरागड-एटापल्ली, आलापल्ली-सिरोंचा या प्रमुख मार्गांसह ३१ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे शेकडो गावांचा संपर्क अद्यापही तुटलेलाच आहे. नागपूर शहरातही पावसाचा जोर कायम असून आज तीन जण वाहून गेले. त्यापैकी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत.
मुंबई-ठाण्यात संततधार
नवी मुंबई आणि ठाणे परिसरात आज संततधार ते मुसळधार असा पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. ठाणे शहरातील वंदना सिनेमा, मासुंदा तलाव कळवा, मुंब्रा, दिवा याबरोबरच भिवंडी, मुरबाड, उल्हासनगर, शहापूर आणि कल्याण डोंबिवली परिसरातील सखल भागात पाणी साचले. नवी मुंबईत संध्याकाळनंतर पावसाचा जोर ओसरला.
पुण्या-मुंबईसह राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंतच्या सरासरीएवढा पाऊस पडला आहे. राज्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडला असून, १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक आणि विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याची माहिती हवामान खात्याने रविवारी दिली.
प्रशासनाला सावधानतेचा इशारा
मुंबई : मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलिस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सावध राहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. सर्व प्रशासनाने अलर्ट राहावे, हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
नद्यांनी पातळी ओलांडली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कणकवलीतील नद्यांनी पातळी ओलांडली; अनेक मार्ग पाण्याखाली
रत्नागिरीत मुसळधार; संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, खेडमध्ये पूर
सांगलीत वारणा नदीचे पात्र भरले, कृष्णेचीही पातळी १८ फुटांवर
कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली
ठाणे, नवी मुंबईत मुसळधार, अनेक रस्त्यांवर पाणी साचले
बेलापूरला अडकलेल्या ६० पर्यटकांची सुटका
नागपुरात दमदार पाऊस; दोन जणांचा मृत्यू
यवतमाळमध्ये वर्धा नदीला पूर
भंडाऱ्यात गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडले
गडचिरोलीत मुसळधार, चार राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक ठप्प
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.