मुंबई : एसटी महामंडळात कर्तव्य बजावताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी वारंवार एसटी मुख्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. सुरुवातीला राज्यातील ३७ उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले; मात्र कोरोनामुळे ते बंद पडले. तेव्हापासून कोरोनाचे कारण देत अखेरच्या सहा दिवसांचे प्रशिक्षण अर्ध्यावर सोडून अनुकंपा उमेदवारांचा जीव महामंडळाने टांगणीला लावला आहे.
वाहतूक निरीक्षक, भांडारपाल, लेखाकार, प्रभारक आदी पदांसाठी एसटी महामंडळाने अनुकंपा तत्त्वावर भरती प्रक्रिया राबवली होती. त्यासाठी सुरुवातीला ३७ उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यानुसार गेल्या वर्षी १६ मार्च रोजी प्रशिक्षण सुरू करण्यात आले; मात्र पुढे कोरोनामुळे प्रशिक्षण अनिश्चित कालावधीसाठी थांबवण्यात आले.
दरम्यान, गेल्या वर्षी २६ ऑक्टोबरला प्रशिक्षण सुरू करून या वर्षी १७ एप्रिलला पुन्हा थांबवण्यात आले. मात्र, कोरोनाचे कारण देत महामंडळाने अखेरच्या सहा दिवसांचे प्रशिक्षण आणि नियुक्त्या अडवून ठेवल्या आहेत. महामंडळाने या पूर्वी एकदा प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आश्वासन उमेदवारांना दिले होते. पुण्याच्या भोसरी येथील मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेला उर्वरित सहा दिवसांचे प्रशिक्षण १९ ते २४ एप्रिल रोजी घेण्याची सूचनाही दिली होती; मात्र पुन्हा महामंडळाने कोरोनाचे कारण देत प्रशिक्षण प्रलंबित ठेवले आहे. महामंडळाकडून अद्याप प्रशिक्षण पूर्ण केले जात नसल्याने उमेदवारांना महामंडळाच्या मुख्यालयाच्या नाहक चकरा माराव्या लागत आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाले असते तर किमान आता नोकरी मिळाली असती, अशी भावना उमेदवारांनी व्यक्त केली.
वडील गेल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. प्रशिक्षणाअभावी नियुक्त्या रखडल्याने प्रत्येक उमेदवाराची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत.
- अनुकंपा प्रशिक्षणार्थी
कोरोनामुळे प्रशिक्षण बंद करण्यात आले होते; मात्र लवकरच अनुकंपा उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण केले जाणार आहे.
- माधव काळे, महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.