Maharashtra Weather Update : राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय

कोकणात मुसळधार : मुंबईसह मराठवाड्यातही हजेरी
Maharashtra Monsoon 2022 Weather Updates
Maharashtra Monsoon 2022 Weather Updatesesakal
Updated on

औरंगाबाद/रत्नागिरी - काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात माॅन्सून आज पुन्हा चांगलाच सक्रिय झाला. मुंबईसह कोकण, मराठवाड्यातील बहुतांश भागात तसेच साताऱ्यातही रविवारी पाऊस झाला. मराठवाड्यातील हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यांतील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. औरंगाबाद, परभणी, नांदेडमध्ये हलका पाऊस झाला. जालना शहरात दुपारी तीनच्या सुमारास जोरदार सरी कोसळल्या.

हिंगोली शहर व तालुक्यातील अनेक गावांत आज मुसळधार पाऊस झाला. औंढा नागनाथ, कळमनुरी, वसमत तालुक्यातील काही गावांत पाऊस झाला. नर्सी नामदेव येथून वाहणाऱ्या कयाधू नदीला पूर आल्याने कोल्हापुरी बंधाऱ्याजवळील छोट्या पुलावरून पाणी वाहिले. त्यामुळे नर्सी ते कडती हा मार्ग ठप्प होता. बीड जिल्ह्यात आज दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. लातूर, उस्मानाबादमध्ये दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर दोन तास जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी झाले.

रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपले

रत्नागिरी : हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत रविवारी मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. गुहागर, चिपळूण, खेडसह रत्नागिरी तालुक्यात चार ठिकाणी दरडी कोसळल्या; तर पाच ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. दापोली, रत्नागिरीत घरांचे नुकसान झाले.

राधानगरी धरण ८२ टक्के भरले

राधानगरी (जि.कोल्हापूर) : राधानगरी तालुक्यातील सर्व धरण क्षेत्रावर आज सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी कायम राहिली. यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून राधानगरी धरण ८२ टक्के म्हणजे सात टीएमसी भरले आहे.

सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस

सातारा : पावसाने रविवारी सकाळपासून जिल्‍ह्याच्‍या पश्‍चिम भागात सर्वदूर हजेरी लावली. सातारा, जावळी, वाई, महाबळेश्‍‍वर, पाचगणीसह इतर भागांना दमदार पावसाने झोडपून काढले.

पावसाचा जोर कायम राहणार

पुणे : राज्यात पावसाची स्थिती पुढील चार दिवस अशीच कायम राहणार असून सोमवारी (त. ८) कोकण व मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे २७० मिलिमीटर आणि कणकवलीत २१८ मिलिमीटर इतकी झाली. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हा दक्षिणेकडे कायम असून दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यातच वायव्य बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

या जिल्ह्यांत अलर्ट

  • रेड अलर्ट ः रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा

  • ऑरेंज अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर

  • यलो अलर्ट : नाशिक, परभणी, नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, वाशीम, अकोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.