पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत यंदा महाराष्ट्रातील तरुणांनी कमाल केली. दर वेळेस ८ ते १० टक्के तरुणांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होत असताना यंदा हे प्रमाण थेट १२ टक्क्यांपर्यंत गेल्याने महाराष्ट्राची शान वाढली आहे. यंदाच्या परीक्षेत ७६१ पैकी ९१ जण यशस्वी झाल्याचे समोर आले आहे.
‘यूपीएससी’मध्ये उत्तर भारत आणि दक्षीण भारतातील विद्यार्थ्यांचे यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी या परीक्षांमध्ये यशस्वी होत नसल्याची ओरड कायम केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षापासून ही स्थिती बदलत आहे. गेल्यावर्षी यूपीएससीच्या अंतिम निकालात ८२९ जणांमध्ये महाराष्ट्रातील ५४ जणांनी बाजी मारली होती. यंदा ही संख्या वाढली आहे.
गेल्या दीड वर्षापासून देशभरात कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना अशा आव्हानात्मक काळात विद्यार्थ्यांनी उपलब्ध साहित्याद्वारे व आॅनलाइन मार्गदर्शनाच्या माध्यमातून अभ्यास केला होता. या परीक्षा ठरलेल्या नियोजनात सुरक्षीत वातावरणात पार पडल्या पाहिजेत यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगानेही कंबर कसली होती. त्यास यश आल्याचे दिसून येत आहे.
‘यूपीएससी’च्या परीक्षेच्या तयारीसाठी अनेक विद्यार्थी पुण्यात वास्तव्यास असतात. राज्यातील अनेक तरुण-तरुणी अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगून दिल्ली गाठतात. ही विद्यार्थ्याची संख्या वाढत असताना यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते दरवर्षी या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८ ते १० टक्के इतके असते. मात्र, यंदा हे प्रमाण वाढून १२ टक्क्यापर्यंत गेले आहे.
रँक घसरला पण कामगिरी सुधारली
यंदाच्या परीक्षेत पहिल्या ३० मध्ये एकाही मराठी उमेदवाराला स्थान मिळू शकले नाही. गेल्यावर्षी नेहा भोसलेने देशात १५ वा व राज्यात पहिला क्रमांक पटकावला होता. यंदा मृणाली जोशी देशात ३६ व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. टॉप रॅक मिळवता आले नसले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील अधिकारी बनणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चौपटीने वाढली आहे. गेल्यावर्षी ५४ उमेदवार पात्र ठरले होते, पण यंदा ही संख्या ९१ वर गेली असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आशादायक चित्र आहे.
‘‘दरवर्षी सरासरी महाराष्ट्रातील ८ ते १० ट्क्के उमेदवार अधिकारी बनतात, पण यंदा हे प्रमाण वाढले आहे. अशा यशाची आता महाराष्ट्राला सवय करून घ्यावी लागणार आहे. एक अंकी रँक मध्ये महाराष्ट्रातील तरुण नाहीत. पण टॉप १० मध्ये आलेले व इतरांच्या गुणांमध्ये फार काही अंतर नाही. त्यामुळे रँककडे बघण्यापेक्षा जे यश मिळाले आहे ते महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या काळात यूपीएससीने ज्या पद्धतीने परीक्षा घेतल्या यातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) धडा घेतला पाहिजे.’’
- अविनाश धर्माधिकारी, संचालक, चाणक्य मंडल परिवार
गेल्या दोन वर्षातील यूपीएससीतील यश
वर्ष - निवड झालेले उमेदवार
२०२० - ५४
२०२१ - ९१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.