राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघ्या काही तासांचा काळ शिल्लक असताना वर्षा बंगल्यावर काल (मंगळवारी १३ फेब्रुवारी) मध्यरात्री महायुतीची खलबतं झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवारांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली. या बैठकीत एक मोठा निर्णय झाल्याची शक्यता आहे.
तर या रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली त्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यसभेच्या उमेदवारांची माहिती उद्या तुम्हाला समजेल. आम्ही काल बैठकीत चर्चा केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या कोणत्या जागा कोणत्या पक्षाने लढवायच्या, त्या सदंर्भात या बैठकीत चर्चा झाली. पुढचे प्रचाराचे तंत्र असेल. कुठे सभा घेण्यात येणार, सुरूवात कधी आणि कोणत्या ठिकाणावरून करायची याची चर्चा या बैठकीत झाली, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागा असून सर्वच जागांवर महायुतीने उमेदवार उतरवण्याचा प्लॅन असल्याची माहिती आहे. मात्र, त्यासाठी उमेदवार कोणते? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आज (बुधवारी) महायुतीकडून उमेदवाराची यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्या भाजपमधील एन्ट्रीनंतर राज्यसभेचं गणित बदललं आहे. भाजप राज्यसभेसाठी चार उमेदवार देण्याची तयारी करत आहे.
याशिवाय अजित पवार गट आणि शिंदे गट प्रत्येकी १ जागेवर उमेदवार उतरवणार असल्याची चर्चा आहे. महायुतीच्या या गणितामुळे महाविकास आघाडीला राज्यसभेत एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. आज महायुतीच्या उमेदवाराची यादी समोर येण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.