Latest Political News: विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीच्या हालचालींनाही वेग आला असून, उद्या मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात छत्रपती संभाजीनगरात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यात जागावाटपाचा विषय अजेंड्यावर असून, मराठवाड्याच्या जागावाटपाचे याच बैठकीत अंतिम स्वरूप निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे.
मराठवाड्यातील भाजपच्या सुमारे एक हजार पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला अमित शहा मंगळवारी (ता. २४) दुपारी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर पंचतारांकित हॉटेलात ही बैठक होणार आहे. आधी या बैठकीचा कार्यक्रम निश्चित नव्हता. पण, सोमवारी दुपारी मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा निश्चित झाला आणि सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही दौरा निश्चित झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या बैठकीसाठी शहरातच असणार आहेत. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही हजर राहतील.