Eknath Shinde Meets Amit Shah: महायुतीच्या दिल्लीत झालेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीत भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सामावून घेण्यासाठी त्याग करण्याची तयारी दाखवली असून १६०ऐवजी १५० जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्षांतील इच्छुकांना सामावून घेण्यासाठी त्यांना अनुक्रमे ८० ते ८५ आणि ५० ते ५५ जागा दिल्या जातील.
भाजपचे कार्यकर्ते शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाऊ लागले आहेत. आज अंधेरी पूर्वसाठी मुरजी पटेल या भाजप उमेदवाराने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली, तर नांदेडचे माजी खासदार भाजप नेते प्रतापराव चिखलीकर यांनी अजित पवार गटात प्रवेश करत लोहा मतदारसंघाची उमेदवारी स्वीकारली. विद्यमान परिस्थितीत परस्परांसाठी मैत्रीपूर्ण वातावरण तयार करताना कुठेही बंडखोरी होऊ नये याची
काटेकोर काळजी घ्या, असे अंजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डोळ्यात घातले असल्याने आता तिन्ही पक्ष बंडखोरी रोखण्याच्या कामाला लागणार आहेत. एकमेकांच्या जागा पाडण्यात नुकसान आहे, असे अमित शहा यांनी निक्षून सांगितले असल्याचे समजते.