Mumbai News: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याचं वातावरण गरम झालं आहे. एकीकडे सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आगपाखड करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे शिवप्रेमी व्यथित झाले आहेत. त्यातच आता पुतळा बनवणाऱ्या जयदीप आपटेंच्या घरी पोलिस दाखल झाले आहेत.
सिंधुदुर्ग गुन्हे शाखेचे पथक जयदीप आपटे यांच्या कल्याणच्या घरी दाखल झालं आहे. गुरुवारी सकाळपासून जयदीप आपटे यांची पत्नी व त्यांच्या नातेवाईकांची शहापूरमध्ये चौकशी सुरु होती.
सायंकाळी चौकशी संपल्यानंतर जयदीप आपटे यांची पत्नी, त्यांची आई घरी परतल्यानंतर आता घरात पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. घराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असतानाच आता या मुद्द्याला राजकीय रंग चढू लागला आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी येथे महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या निषेध मोर्चाच्या निमित्ताने राणे आणि ठाकरे गटांत जोरदार राडा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे येथे निषेध मोर्चासाठी आले होते तर त्याचवेळी खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे हे शेकडो कार्यकर्त्यांसह दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी येथे आल्याने मोठा तणाव निर्माण झाला.
१ सप्टेंबरला जोडे मारो आंदोलन
पुतळा प्रकरणावरून महाविकास आघाडी सत्ताधारी महायुती सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या युती सरकार विरोधात महाविकास आघाडीने १ सप्टेंबर रोजी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन पुकारले आहे. सकाळी हुतात्मा चौकापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढून छत्रपती
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात सर्व शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.