Solapur News : काँग्रेस अर्थात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत वर्षानुवर्षे काम केलेले शहरातील मातब्बर नेते नाराज होऊन पक्ष सोडण्याच्या तयारी असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही.
अनेक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली. पण, ती पोकळी भरून काढण्याचाही प्रयत्न काँग्रेसकडून झाला नाही, हे विशेष. आता नेत्यांकडून प्रभागासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, संपर्क होत नाही म्हणत अनेकजण नाराज आहेत.
दरम्यान, शहर मध्य विधानसभा मतदारसंघापुरताच उरलेल्या काँग्रेस पक्षाची अवस्था ग्रामीणमध्ये तर खूपच बिकट असल्याची स्थिती आहे. अशा परिस्थितीत आगामी निवडणुकीत काँग्रेस महापालिकेवर सत्ता काबीज करेल का, याचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही, अशी गत आहे.
१९६२ मध्ये मडेप्पा काडादींनी पहिल्यांदा सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणला. त्यानंतर सुरजरतन दमाणी, गंगाधर कुचन, धर्मण्णा सादूल, सुशीलकुमार शिंदे यांना त्याठिकाणी खासदारकीची संधी मिळाली.
मात्र, २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत हातून निसटलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला पुन्हा काबीज करता आला नाही.
दक्षिण सोलापूर व अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात देखील तशीच स्थिती आहे. समाजासह वैयक्तिक ताकद असलेल्या काही नेत्यांनी सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदेंची सोडलेली साथ देखील त्याला कारणीभूत आहे.
महापालिका निवडणुकीतही त्याचा परिणाम दिसून आला. एकापाठोपाठ एक शिंदे कुटुंबीयांची म्हणजेच काँग्रेसची साथ सोडत असतानाही त्यांना थांबविण्याचा कोणीही ठोस प्रयत्न केला नाही.
दुसरीकडे त्या मातब्बर नेत्यांच्या तोडीस तोड दुसरा चेहराही काँग्रेसला जोडता आला नाही. त्यामुळे आता काँग्रेस पदाधिकारी महाविकास आघाडीसाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसची साथ सोडलेले ताकदवान नेते
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यानंतर दक्षिण सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसची ताकद कमी झाली.
तत्पूर्वी, महेश कोठे यांनी शिंदे कुटुंबियाला ‘हात’ दाखवला. त्यांच्या सोबत अमोल शिंदे यांच्यासह काही नगरसेवकांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. तसेच काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर ॲड. यु. एन. बेरिया, नलिनी चंदेले हेही काँग्रेसपासून दुरावले.
‘एमआयएम’च्या माध्यमातून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदेंना तगडे आव्हान दिलेले तौफिक शेख हे देखील काँग्रेसमध्येच होते. आता काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारी, प्रिया माने यांनीही काँग्रेसला ‘हात’ दाखविण्याची तयारी केली आहे.
काँग्रेसधून बाहेर पडलेले त्या नेत्यांची स्वत:ची ताकद देखील आहे. तसेच ‘बसपा’तून वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते झालेले आनंद चंदनशिवे हे सध्या कोणत्या पक्षात नाहीत.
पण, काँग्रेसची शहरातील आवस्था पाहता ते त्या पक्षात जाण्याची शक्यता कमीच मानली जात आहे. माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून चंदनशिवे राष्ट्रवादीत जातील, अशी स्थिती आहे.
‘पंढरपूर-मंगळवेढ्या’च्या बदल्यात कोणता मतदारसंघ?
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिला. त्याठिकाणी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेले भारत भालके हे आमदार होते. पण, त्यांच्या निधनानंतर तेथे भाजपचे समाधान आवताडे आमदार झाले.
आता त्या मतदासंघाच्या बदल्यात कोणताच मतदारसंघ काँग्रेसला मिळालेला नाही. पक्षाची ताकद असणारा मतदारसंघ जिल्ह्यात कोणताही नसल्याने काँग्रेसने तशी मागणी देखील केली नसल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे ‘शहर मध्य’मध्ये आमदार प्रणिती शिंदेंनी विजयाची हॅटट्रिक केली, पण उर्वरित मतदारसंघ काँग्रेसला राखता आले नाहीत. सोलापूर लोकसभा व शहर मध्य, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत.
केंद्रीय मंत्रीपदावर असलेल्या सुशीलकुमार शिंदेंनाही सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा पराभवाचा झटका बसला आहे. जनतेने दोनदा नाकारल्यानंतरही सुशीलकुमार शिंदे तिसऱ्यांदा निवडणूक लढतील का, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस नेत्यांकडे देखील नाही.
भाजप मात्र निश्चितपणे या मतदारसंघात नवीन चेहऱ्याला संधी देईल, अशी खात्रिलायक सूत्रांची माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.