Manoj Jarange Patil : काही झाले तरी मागे हटणार नाही;मनोज जरांगे यांचा निर्धार,मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण

‘‘मराठा आरक्षणावरून सरकारने धोका दिला. आता कारण नको, आरक्षण द्या. वेळ वाढवून दिला तरीही ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे पाचव्यांदा अंतरवाली सराटी येथे उपोषण करावे लागत आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil sakal
Updated on

वडीगोद्री, ता. अंबड, जि. जालना, ता. : ‘‘मराठा आरक्षणावरून सरकारने धोका दिला. आता कारण नको, आरक्षण द्या. वेळ वाढवून दिला तरीही ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे पाचव्यांदा अंतरवाली सराटी येथे उपोषण करावे लागत आहे. तब्येत साथ देत नाही, तरीही आता मागे हटणार नाही. कठोर उपोषण करणार. वैद्यकीय उपचार, पाणी घेणार नाही,’’ असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केला. त्यांनी शनिवारपासून (ता.२०) अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे बेमुदत उपोषण सुरू केले.

मराठा समाजाला इतर मागास वर्ग (ओबीसी) या प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जरांगे यांनी सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी १३ जुलैपर्यंतचा कालावधी दिला होता. परंतु, ती मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. अंतरवाली सराटीतील आंदोलनाला येत्या २९ ऑगस्ट रोजी एक वर्ष होत आहे. या दिवशी समाजबांधवांना बोलावून विधानसभा निवडणुकीत उभे राहायचे की पाडायचे याचा निर्णय घेतला जाईल. प्रकाश आंबेडकर यांची जनजागृती यात्रा सुरू आहे, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी गरजवंतांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले. मराठा समाजाला आरक्षण द्या, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, हैदराबादसह तिन्ही संस्थानचे गॅझेट लागू करा, शिंदे समितीला मुदतवाढ, गुन्हे वापस घेणे, अभ्यासक यांना पगार द्या, मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण द्यावे यासह इतर मागण्यांसाठी जरांगे यांनी केल्या. ‘सरकारला पाहिजे तेवढा वेळ दिला. पण अद्याप शासन निर्णय घेत नाही. कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही. जे प्रमाणपत्र आहे, त्याच्या वैधतेसंदर्भात अडचणी आहेत. ईडब्ल्यूएस बंद करू नका. भरतीसाठी कुणबी प्रमाणपत्र असूनही ते घेतले जात नाही. ईडब्ल्यूएस, एसईबीसी, कुणबी असे तिन्हीही पर्याय मुलांना भरतीसाठी सुरू ठेवा. ‘सगेसोयरे’ बाबतच्या हरकती प्राप्त झाल्या आहेत, त्याबाबत शासनाने पाहावे.

आता ते ‘लाडकी मेव्हणी’ योजनाही आणतील!

सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर टीका करताना जरांगे यांनी माजी खासदाराचे उदाहरण दिले. कुणाचेही नाव न घेता त्यांनी एका महिला खासदाराचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘‘मागे एक महिला खासदार निवडणुकीच्या प्रचारात पिछाडीवर होती. त्यांच्याविरोधात मातब्बर नेते असलेले माजी खासदार उभे होते. यामुळे महिला खासदाराने संपूर्ण जिल्ह्यात साडी आणि मंगळसूत्राचे वाटप केले. यामुळे महिला-पुरुष मतदारांमध्ये विभागणी होऊन घराघरांत कलह निर्माण झाले होते. याप्रकारे आता लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेतून तीच तयारी सुरू आहे. मराठा, ओबीसी, धनगर बांधवांना आपापसांत लढवून यांची लाडकी योजना सुरू आहे. कदाचित ते लाडकी मेव्हणी योजनाही आणतील, असा टोला जरांगे यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

ईबीसी, ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी उमेदवारांकडून परीक्षा शुल्क आणि फीस घेऊ नका, असे आदेश सरकारने दिल्याबद्दल मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारचे कौतुक केले आहे. ज्यांनी परीक्षा शुल्क, फीस भरली आहे त्यांना ते शुल्क परत करा, असे सरकारने म्हटले आहे. यावर जरांगे म्हणाले, की या निर्णयाबद्दल फडणवीस, मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार यांचे मनापासून कौतुक आहे. आता आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देणे सुलभ करावे, अशी विनंती जरांगे यांनी केली.

निवडणूक लढविण्याबाबत...

  • २० ते २७ ऑगस्टदरम्यान राज्यातील सर्व इच्छुकांनी यावे. आपल्याला सर्व जातींची मोट बांधायची आहे

  • १३ ते २० ऑगस्ट दरम्यान बैठका घेणार. मराठा बांधवांनी आपापल्या भागाचा डेटा तयार ठेवावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.