अरे तुम्हाला आमच्याच बापजाद्यांनीच मोठ केलेय, चारचाकीत आमच्याच बापजाद्यांनी बसवलंय.
फलटण शहर : राज्यातील मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची आम्ही मागणी केली होती. या मागणीनुसार कार्यवाही करण्यासाठी सरकारने तीस दिवसांची मुदत मागितली होती. आपण त्यांना दहा दिवस वाढीव दिले. ती मुदत आता २२ तारखेला संपत आहे. आता वाटेत कोणीतरी मला म्हणाले, सरकार आणखी मुदत मागणार. मात्र, दिली तेवढी मुदत भरपूर झाली, असे स्पष्ट मत मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी व्यक्त केले.
आता एका तासाचीही मुदत वाढ देणार नाही, असा इशारा मराठायोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी फलटण येथील सभेत राज्य सरकारला दिला. फलटण येथे सकल मराठा समाजातर्फे आयोजित सभेत ते बोलत होते. प्रारंभी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यानंतर व्यासपीठावर असणाऱ्या जिजाऊ कन्यांनी त्यांचे औक्षण करत प्रभू श्रीरामाची प्रतिमा भेट दिली.
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी आम्ही आरक्षण मागतोय. ते घेतल्याशिवाय आता थांबायचे नाही. यापूर्वी दोन घटकांसाठीचे आरक्षण जाहीर झाले. त्या वेळी ना कागदपत्रे, ना अहवाल, ना समिती. मग मराठा समाजालाच आरक्षण देताना या सगळ्या गोष्टी का हव्यात. काही जण म्हणतात, मी ठराविक जणांना उद्देशून बोलतो.
जो मराठा आरक्षणाला विरोध करेल, त्याला सुटी नाही, ही माझी भूमिका आहे. गावगाड्यात मराठा आणि ओबीसी समाज दररोज एक असतो. त्यांनाही वाटते मराठ्यांना आरक्षण मिळावे; पण काही जण दिशाभूल करत आहेत. अरे तुम्हाला आमच्याच बापजाद्यांनीच मोठ केलेय, चारचाकीत आमच्याच बापजाद्यांनी बसवलंय. त्यामुळे आता आम्हाला आरक्षण मिळत असताना तुम्ही आडवे पडू नका, अशी माझी हात जोडून विनंती आहे.’’
आरक्षण टप्प्यात आलेय आणि ते शांततेच्या मार्गानेच मिळेल. त्यामुळे कोणीही उग्र भूमिका घ्यायची नाही, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी या वेळी उपस्थित मराठा समाजाला केले.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या.
तुमच आरक्षण तुम्ही घ्या... आमचे आम्हाला द्या.
पुन्हा अशी संधी नाही... मागे हटू नका, गाफील राहू नका, झोपू नका.
पुढच्या पिढीच्या पदरात एकजुटीने आरक्षणाचे पुण्य टाकूया.
गावागावांत जाऊन एकजूट करा, पथके नेमा, २२ तारखेनंतरच्या आंदोलनाची तयारी करा.
पुढील आंदोलन शांततेत होईल. उग्र आंदोलनास माझा पाठिंबा नाही.
आरक्षण घेतल्याशिवाय पिढ्यान् पिढ्यांची खदखद क्षमणार नाही.
आत्महत्या करू नका. तरुणच राहिले नाही, तर आरक्षणाचा फायदा काय.
बोलल्याप्रमाणे मुदत दिली. आता आमचा मान राखा. अंत पाहू नका.
मनोज जरांगे-पाटील यांच्या फलटण येथील सभेसाठी पाटण येथून मराठा बांधव मोठ्या संख्येने आले होते. पाटणमधील मराठा समाजातर्फे जरांगे-पाटील यांना सभेसाठीची वेळ, तारीख मागणी करणारे पत्र त्यांना देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.