Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाला शरद पवारांचा विरोध; राहुल गांधी अन् सुप्रिया सुळेंवरही टीका

‘मराठा आरक्षणाचे शरद पवार हेच सर्वांत मोठे विरोधक आहेत. स्वत:चे नेतेपद शाबूत ठेवण्यासाठी त्यांना सर्वच समाजांना आपापसांत झुंजवत ठेवायचे आहे,’
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal
Updated on

नागपूर - ‘मराठा आरक्षणाचे शरद पवार हेच सर्वांत मोठे विरोधक आहेत. स्वत:चे नेतेपद शाबूत ठेवण्यासाठी त्यांना सर्वच समाजांना आपापसांत झुंजवत ठेवायचे आहे,’ असा घणाघाती आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, ‘शरद पवार यांच्या मनात असते तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते. मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी केले होते. याचा अर्थ कोणाला आरक्षण हवे आणि नको हे दिसून येते.’ ‘मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. मात्र, ओबीसींवर अन्याय होणार नाही.

महाराष्ट्रात ज्यावेळी आपले सरकार होते, त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. ते आपण आपल्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात टिकविलेही होते. हे आरक्षण देताना ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, काहीही झाले तरी चालेल,’ असे फडणवीस म्हणाले.

‘इंडिया’कडे अजेंडाच नाही

‘महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना फक्त सत्तेच्या राजकारणात अस्तित्व टिकवायचे आहे. देशाचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात याची खात्री जनतेला आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत देश पुन्हा मोदीजींच्या हातात द्यायचा आहे. ही निवडणूक भाजपसाठी नाहीतर भारतासाठी लढायची आहे. सध्या इंडिया आघाडीकडून मोदींना हरविण्याची भावना तयार केली जात आहे. त्यांच्यासमोर अजेंडा नाही. ते देशासाठी नाही, गरिबी निर्मूलनासाठी नाही तर कुटुंब वाचविण्यासाठी पुढे आले आहेत,’ असे फडणवीस म्हणाले.

राहुल गांधी हे आपल्यासाठी वरदानच

राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेले वरदान आहे. विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा, असे सांगत फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. सगळीकडे काँग्रेसची अवस्था अशीच आहे. काँग्रेसने केवळ स्वत:चा विचार केला. काँग्रेसचे नेते मोठे झाले पक्ष लहान झाला. भाजपमध्ये सगळ्यात ताकदवान हा सामान्य कार्यकर्ता असल्याचे फडणवीस म्हणाले.

शरद पवार यांच्याविषयी गैरसमज निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर टीका करीत आहेत. पवार यांनी नेहमीच मराठा समाजाच्या भल्याचे निर्णय घेतले आणि ओबीसी समाजालाही न्याय देण्याचा प्रयत्न केला. खरेतर देवेंद्र फडणवीस नव्याने ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत ती मंडळी १९९९पासून २०१४ पर्यंत सत्तेत होती, फडणवीस यांनी त्यांना जाब विचारायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पवारांच्या जिवावर सत्ता उपभोगलेली मंडळी पवारांवर खोटे आरोप होत असताना गप्प कसे काय बसू शकतात? शरद पवार १९९४ पर्यंत मुख्यमंत्री होते आणि मराठा आरक्षणाचा विषय अलीकडचा आहे, त्यामुळे पवारांचे नाव घेऊन टीका करणे हा निव्वळ कांगावा आहे.

- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

जिंकणाऱ्यालाच उमेदवारी देणार - तावडे

केंद्रात असो वा राज्यात ज्याच्याकडे जिंकण्याची क्षमता आहे, त्यालाच उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला असल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज सांगितले. भाजपच्या बैठकीसाठी नागपूरला आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना तीन राज्यांच्या निवडणुकीत मोदींची गॅरंटी सर्वाधिक प्रभावी ठरल्याचे नमूद केले.

महाराष्ट्रात भाजपसोबत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेत तिकीट वाटप कसे करणार? याबाबत विचारणा केली असता तावडे यांनी सर्वांच्या पाच वर्षांच्या ट्रॅक रेकॉर्डसह निवडणूक जिंकण्याच्या क्षमतेसोबत सामाजिक, राजकीय समीकरणे तपासली जात असल्याचे नमूद केले.

राज्यात प्रस्थापितांनी घाबरू नये

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसविण्यात आले होते. मात्र, हे सर्व मुख्यमंत्री अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. प्रस्थापितांना घरी बसविल्या जात आहे, हा गैरसमज आहे. प्रत्येक राज्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांना घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. पंतप्रधान मोदी यांची कामगिरी, त्याला तळागाळातून मिळत असलेला प्रतिसाद बघूनच चारशेचा आकडा काढण्यात आला आहे. तीन राज्यांतील विजय हा त्याचाच एक भाग होता, असेही त्यांनी नमूद केले.

दक्षिणेवर विशेष लक्ष

देशात भाजपची सत्ता असली तरी दक्षिणेतील राज्यांत फारसे यश मिळाले नाही. हे बघून लोकसभेच्या आगामी निवडणुकीत दक्षिणेकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे तावडे यांनी सांगितले. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार आम्हाला सोडून लालूप्रसाद यांच्यासोबत गेले असले तरी मतदार आमच्या सोबतच आहे. तिथे भाजप चमत्कार घडविणार असल्याचे भाकीत तावडेंनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.