Maratha Reservation : आरक्षणाचा प्रश्न कधी सुटेल, हे सांगा; मनोज जरांगेंचा सरकारला सवाल

मराठा आरक्षणाचा प्रश्न किती दिवसांत सुटणार हे शासनाने आपले लोक येथे पाठवून जाहीर करावे.
manoj jarange patil
manoj jarange patilsakal
Updated on

अंतरवाली सराटी (जि. जालना) - मराठा आरक्षणाचा प्रश्न किती दिवसांत सुटणार हे शासनाने आपले लोक येथे पाठवून जाहीर करावे. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, अशी भूमिका मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सायंकाळी येथे मांडली. ‘जरांगे यांनी उपोषण थांबवले पाहिजे’ असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. त्यावर जरांगे यांनी पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, जरांगेंनी वैद्यकीय उपचार घ्यायला सुरवात केली आहे.

जरांगे म्हणाले, ‘उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. आतापर्यंत ५७ लाख कुणबी नोंदी मिळाल्या. त्याच्या आधारे कायदा किती दिवसांत मंजूर होईल, किती दिवसांत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील, हे सरकारने स्पष्ट करायला हवे. आम्ही दिलेल्या सगेसोयरेच्या व्याख्येप्रमाणे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी. उपोषण स्थगित होईल, पण मागण्यांची अंमलबजावणी किती दिवसांत करणार, लगेच करणार का, असे अनेक प्रश्न आहेत.

त्यावर शासनाने आपले लोक येथे पाठवून भूमिका जाहीर करावी. ओबीसींचे नेते आमचे म्हणणे समजूनच घेत नाहीत. मुळात मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्काच लागत नाही. मराठा हाच कुणबी आहे, कुणबी हाच मराठा आहे, असेही ते म्हणाले.

‘ओएसडीं’वर आरोप

‘मुख्यमंत्र्यांच्या विशेष अधिकाऱ्याने (ओएसडी) अजून काय नवीन षडयंत्र रचले काय माहित? आमच्या काही बांधवांना ते दिल्लीला घेऊन जाऊ लागले आहेत. त्यांनी काय षडयंत्र रचले ते थोड्या दिवसांत उघडे पडेल. मुख्यमंत्र्यांना मी आजही चांगले मानतो. मात्र त्यांचे ‘ओएसडी’ काही लोकांना घेऊन दिल्लीला पळत आहेत. मला किंवा मराठ्यांना बदनाम करण्यासाठी काय साचा बनवला असेल, ते माहित नाही. काही दिवसांत ‘ओएसडीं’चे नाव जाहीर करू,’ असे जरांगे यांनी सांगितले.

जरांगेंवर उपचार सुरू

सरकारने विषय तडीस नेण्याचा शब्द दिला आहे. मंत्री, आमदार मध्यस्थी करीत आहेत. विषय मार्गी लागला नाही तर परत उपचार बंद करीन, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. त्यांची प्रकृती खालावली असून शासन, ग्रामस्थ आणि डॉक्टरांच्या आग्रहामुळे आज पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी वैद्यकीय उपचारांसह सलाइन घेण्यास सुरुवात केली.

खासदार संदीपान भुमरे, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनीही त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. आपल्या मागणीवर सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहे. आरक्षण विषय तडीस नेणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘लोकसभा निवडणुकीअगोदर सरकारने दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम सरकारला दिसले आहेत. सरकार व मंत्री यांचा सन्मान केला असून आता उपचार घेत आहे. आमदार राऊत शासनाचा निरोप घेऊन आले. ते कोणत्या पक्षाचे आहेत यापेक्षा ते सरकार व आमच्यात संपर्क करीत आहेत’ ’ असे जरांगेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

आंदोलनाची धग

- धाराशिव जिल्ह्यात सकल मराठा समाजाची जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवर घोषणाबाजी.

- जरांगेंनी मोबाईलवरून केलेल्या समजावणीनंतर आंदोलक इमारतीवरून उतरले.

खासदार जाधवांचे राज्यपालांना साकडे

परभणीः मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी निर्णय घेण्यास राज्य शासनास सूचना द्यावी, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही पाठींबा दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

जवळा बाजार (जि. हिंगोली): वडद (जि.हिंगोली) येथील गजानन नेव्हल (वय २६) याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (ता. ११) रात्री उशिरा हट्टा पोलिस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. दरम्यान त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

काही गोष्टी सविस्तर कळाल्याशिवाय उपोषण स्थगित करु शकत नाही. असेच तुम्ही खेळवत राहिलात तर मी थेट विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागेन. मुख्यमंत्री आणि सरकारवर आजही विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे शत्रू नाहीत. आमचा सगळ्यांवरच विश्वास आहे. कोणीही आरक्षण द्या, मराठे त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील.

- मनोज जरांगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.