मुंबईः जालन्याच्या अंतरवाली गावामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं आहे. तब्बल सतराव्या दिवशी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडलं. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश महाजन, संदीपान भूमरे, अर्जुन खोतकर, राजेश टोपे यांची उपस्थिती होती.
उपोषण सोडताना जरांगे म्हणाले की, सरकारने एक महिन्याचा वेळ दिलेला आहे. तरी त्यांनी आणखी दहा दिवस घ्यावेत. परंतु मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मराठ्यांना एकनाथ शिंदे हेच आरक्षण देऊ शकतील, ते नसतील तर आमचं काही खरं नाही. त्यामुळे मी मागे लागून आरक्षण पदरात पाडून घेणार आहे, असं जरांगे म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने गठीत केलेली समिती आरक्षणासाठी काम करत असून त्यांची एक बैठकसुद्धा झालेली आहे. ही समिती मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीच्या पुराव्यांची पडताळणी करणार आहे. त्यानंतर आरक्षणाचा मार्ग सुकर होईल, असं शिंदे म्हणाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट करुन मराठा समाजासाठी आजपर्यंत त्यांनी काय काय केलं याबद्दल सांगितलं आहे. मराठा आरक्षण, सारथीच्या सुविधा आणि भरती प्रक्रियेतील संधी याचा उल्लेख त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये केलाय.
देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकार्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे. मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा.
सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही. मात्र, सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या. आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु आहे.
भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.